scorecardresearch

उतारवयातील लठ्ठपणा कमी करणाऱ्या संयुगाचा शोध

‘इंटिग्रेटेड फिजिऑलॉजी अँड मॉलेक्युलर मेडिसीन लॅबोरेटरी’ या संस्थेतील संशोधक डॉ. वॅग्नर डांटस यांनी लिहिलेल्या शोधनिबंधात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

बॅटन रूज (लुझिआना) : ‘बीएएम१५’ नावाचे रासायनिक संयुग वाढत्या वयातील लठ्ठपणा किंवा चरबीच्या ऊतींमधील वाढीमुळे उतारवयात होणारी स्नायूंची हानी टाळू शकते, असे एका नव्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

या संशोधनातील निष्कर्ष ‘जर्नल ऑफ कॅशेक्सिया, सारकोपेनिया अँड मसल’ या वैद्यकशास्त्राशी संबंधित घडामोडींच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ‘इंटिग्रेटेड फिजिऑलॉजी अँड मॉलेक्युलर मेडिसीन लॅबोरेटरी’ या संस्थेतील संशोधक डॉ. वॅग्नर डांटस यांनी लिहिलेल्या शोधनिबंधात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

वृद्ध, लठ्ठ उंदरांची चरबी आणि त्यांचे वजन कमी करण्यास, स्नायू बळकट करण्यास, वयाशी संबंधित दाह कमी करण्यास आणि शारिरीक क्रिया वाढविण्यासाठी मदत करणारी संयुगे संशोधकांनी शोधून काढली आहेत.

लठ्ठपणा असलेल्या तरुण प्रौढांमध्ये स्नायूंचे वस्तुमान कमी होणे ही चिंतेची बाब नसते. तथापि, वयानुसार मात्र त्यात बदल होतो. वाढलेल्या वयाबरोबर आलेला लठ्ठपणा वृद्धांच्या स्नायूंचे नुकसान करतो. त्यांच्यातील सक्रियता कमी होते. परिणामी, शरीर सावरताना अडचण येणे, पक्षाघात, हृदयविकार संभवतात. त्याचबरोबर अकाली मृत्यूचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे वाढत्या वयातील वजन कमी करण्यास, स्नायूंची शक्ती वाढवून सक्रिय ठेवण्यास ‘बीएएम१५’सारखी रासायनिक संयुगे उपयोगी ठरतील, असे या अभ्यासात म्हटले आहे.

वृद्ध उंदीर आणि ६०-६५ वर्षांच्या व्यक्ती यांच्यातील लठ्ठपणा आणि स्नायूंमधील अशक्तपणा या समस्या जवळजवळ सारख्याच असतात. ‘बीएएम१५’ हे रासायनिक संयुग लठ्ठपणा असलेल्या वृद्ध उंदरांना देण्यात आले आणि त्यांच्या अन्नात चरबीयुक्त आहाराचा अधिक समावेश करण्यात आला. ‘बीएएम१५’ दिलेल्या उंदरांचे वजन कमी झाले. शिवाय, ते अधिक मजबूत आणि सक्रिय झाले.   ‘बीएएम१५’ हे संयुग म्हणजे ‘चमत्कारिक औषध’ नाही, परंतु त्याची परिणामकारकता निश्चित करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Researchers discover compound preventing muscle loss and weight gain in older zws