Restless Legs Syndrome Signs : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापैकी सर्वांत सामान्य बाब म्हणजे निद्रानाश. झोपल्यानंतर अनेकांना पायांमध्ये विचित्र संवेदना, मुंग्या येणे किंवा अस्वस्थता जाणवते. यावेळी तासन् तास पाय दुखल्याने झोपेवर परिणाम होतो. जर झोपेचे प्रमाण कमी झाले, तर थकवा, चिडचिड, एकाग्रता कमी होणे आणि हृदयाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही एक किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण- ही रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची लक्षणे असू शकतात.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम म्हणजे काय?

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रात्रीच्या वेळी अस्वस्थता, मुंग्या येणे किंवा पाय ओढल्यासारखा वाटतो. ही समस्या लोहाची कमतरता, नसांमधील समस्या, मधुमेह, ताण किंवा कमी झोपेच्या सवयींशी संबंधित असू शकते. आरोग्यदायी जीवनशैली आणि वैद्यकीय सल्ल्याने यावर नियंत्रण मिळवता येते.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची लक्षणे काय?

रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची सर्वांत सामान्य लक्षणे म्हणजे पायांमध्ये मुंग्या येणं, सुई टोचल्याप्रमाणे वेदना, जळजळ किंवा जडपणा. जेव्हा लोक विश्रांती घेतात किंवा झोपण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ही अस्वस्थता वाढते. बरेच लोक रात्री उठतात आणि त्यांच्या पायांना थोडा आराम मिळावा म्हणून वारंवार फिरतात. त्यामुळे केवळ झोपेवरच परिणाम होत नाही, तर ताणही वाढतो.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम का होतो?

हा आजार अनेक कारणांमुळे होऊ शकतो. लोह किंवा मॅग्नेशियमची कमतरता हे त्यामागचे एक प्रमुख कारण मानले जाते. मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार किंवा थायरॉईडच्या समस्या असलेल्या लोकांमध्येही ही स्थिती अधिक सामान्य आहे. जास्त ताण, जास्त कॅफिनचे सेवन आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरण्याची सवयदेखील या समस्येस कारणीभूत ठरू शकते.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोमपासून आराम कसा मिळवायचा?

रेस्टलेस लेग्स सिंड्रोमपासून आराम मिळविण्यासाठी तुम्ही स्वत:ला काही सोप्या सवयी लावून घेऊ शकता. झोपण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग, पायांना मालिश आणि कोमट पाण्याने पाय धुणे यांमुळे आराम मिळू शकतो. चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा. पालक, बीट, गूळ व मसूर यांसारखे लोहयुक्त पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. जर ही समस्या कायम राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य तपासणी केल्यासच मूळ कारण समजू शकेल. कधी कधी औषधे किंवा पूरक आहारांची आवश्यकता असू शकते.