Rice vs Roti What’s Better in Summer? उन्हाळ्याची तीव्रता अजूनही अनेक भागांत कायम आहे. कडक ऊन, वाढलेली उष्णता आणि सतत जाणवणारा उकाडा यांमुळे शरीर लवकर थकते. अशा वातावरणात खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. विशेषतः दुपारच्या जेवणात काय खावं, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही जण पोळीला प्राधान्य देतात, तर काही जण भात खाणं अधिक योग्य मानतात. मात्र, उन्हाळ्यात या दोन्हींपैकी शरीरासाठी अधिक फायदेशीर काय ठरू शकतं, याबाबत अनेकांना उत्सुकता असते.

उन्हाळ्यात शरीराची पचनक्रिया अनेकदा मंदावते. त्यामुळे जड पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस होणे, अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकते. अशा वेळी हलकं आणि सहज पचणारं अन्न खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. पण, भारतीयांच्या रोजच्या जेवणातील दोन प्रमुख पदार्थ असलेल्या पोळी आणि भात यापैकी कोणता पर्याय अधिक योग्य ठरतो?

पचनासाठी कोणता पर्याय अधिक सोईचा?

आरोग्यविषयक माहितीनुसार, भातामध्ये गव्हाच्या पोळीच्या तुलनेत तंतुमय घटक म्हणजेच फायबर कमी प्रमाणात असते. त्यामुळे भात पचवण्यासाठी शरीराला तुलनेने कमी मेहनत घ्यावी लागते. विशेषतः उन्हाळ्यात ज्यांना पोट फुगणे, अॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाचा त्रास होत असेल, त्यांच्यासाठी दुपारच्या वेळी भात खाणे अधिक सोईचे ठरू शकते.

अनेकांना जेवणानंतर जडपणा जाणवतो. अशा परिस्थितीत भात हा हलका पर्याय मानला जातो. त्यामुळे दुपारच्या उष्ण वातावरणात शरीरावर अतिरिक्त ताण पडत नाही.

शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यात भात पुढे?

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. पाण्याने समृद्ध असलेले अन्नपदार्थ शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

भात शिजवताना तो मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतो. त्यामुळे दुपारच्या जेवणात भाताचा समावेश केल्यास शरीराला काही प्रमाणात अतिरिक्त द्रव मिळू शकतो. दुसरीकडे पोळी तुलनेने कोरडी असते आणि ती पचवताना शरीरातील पाण्याचा अधिक वापर होऊ शकतो. त्यामुळे उष्ण हवामानात भात हा शरीराला थोडी अधिक थंडावा देणारा पर्याय मानला जातो.

पोळीचे फायदे दुर्लक्ष न करण्याजोगे

भात पचायला सोपा असला तरी पोळीतील पौष्टिक घटकांमुळे पोळीकडे दुर्लक्ष करता येत नाही. संपूर्ण गव्हापासून तयार केलेल्या पोळीमध्ये तंतुमय घटक, प्रथिने आणि फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी आवश्यक खनिजे अधिक प्रमाणात असतात.

त्याशिवाय पोळीचा ग्लायसेमिक निर्देशांक भाताच्या तुलनेत कमी असतो. याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी पोळी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

मग दुपारच्या जेवणासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?

उन्हाळ्यातील दुपारच्या जेवणासाठी अनेक आरोग्यतज्ज्ञ भाताला किंचित अधिक योग्य मानतात. कारण- तो हलका, सहज पचणारा आणि शरीराला थंडावा देणारा असू शकतो; मात्र याचा अर्थ पोळी पूर्णपणे टाळावी, असा नाही.

जर तुम्ही भात खात असाल, तर त्यासोबत डाळ, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि कोशिंबीर यांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे किंवा मधुमेह असलेले लोक भाताचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकतात. अशा वेळी ब्राऊन राईससारखा पर्यायही निवडता येऊ शकतो.

शेवटी, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज वेगळी असते. त्यामुळे आहाराची निवड ही वय, आरोग्यस्थिती, शारीरिक हालचाल आणि जीवनशैली लक्षात घेऊन करणे महत्त्वाचे आहे. मात्र एक गोष्ट नक्की, उन्हाळ्यात दुपारचे जेवण जितके हलके, संतुलित आणि सहज पचणारे असेल तितके शरीर अधिक ताजेतवाने आणि निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.