Uric Acid Home Remedies: चालताना टाचांमध्ये वेदना होणे, पायांच्या बोटांच्या सांध्यांमध्ये दुखणे किंवा घोटे आणि गुडघ्यांमध्ये वेदना, सूज व त्वचेवर लालसरपणा जाणवणे ही वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडशी संबंधित लक्षणे असू शकतात. खराब जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि अवेळी खाण्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू शकते.

अशा परिस्थितीत युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यासोबतच काही आयुर्वेदिक उपायांबाबतही चर्चा केली जाते. त्यापैकीच एक म्हणजे सकाळी प्यायले जाणारे एक साधे पांढरे पाणी. मात्र, हे नेमकं कोणतं पाणी आहे आणि ते कसं तयार करायचं, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.

प्युरिन म्हणजे काय?

प्युरिन हे शरीरातील पेशींमध्ये आढळणारे नैसर्गिक रासायनिक संयुग आहे. शरीरातील विविध प्रक्रियांमध्ये त्याची भूमिका असते. प्युरिन काही खाद्यपदार्थ आणि पेयांमधूनही शरीरात जाते.

शरीरात प्युरिनचे विघटन झाल्यानंतर युरिक अ‍ॅसिड तयार होते. सामान्य परिस्थितीत मूत्रपिंड हे युरिक अ‍ॅसिड लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकण्याचे काम करतात. मात्र, शरीरात युरिक अ‍ॅसिड जास्त तयार झाले किंवा मूत्रपिंडांना ते पुरेशा प्रमाणात बाहेर टाकता आले नाही, तर रक्तातील त्याची पातळी वाढू शकते.

यामुळे काही व्यक्तींमध्ये सांध्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे स्फटिक जमा होऊन गाउटसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढल्याचे निदान झाल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

युरिक अ‍ॅसिड वाढण्याची कारणे कोणती?

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आहारातील प्युरिनचे प्रमाण, शरीरातील चयापचय, मूत्रपिंडांचे कार्य आणि जीवनशैली यांचा त्यावर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे केवळ एक पदार्थ किंवा एक पेय घेतल्याने युरिक अ‍ॅसिडची समस्या कायमची दूर होईल, असे मानणे योग्य नाही. आहारातील बदल, पुरेसे पाणी पिणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि डॉक्टरांनी सांगितलेले उपचार यांना महत्त्व आहे.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. चंचल शर्मा यांच्या मते, पांढरं पाणी केवळ युरिक ॲसिडच्या समस्येत मदत करत नाही, तर संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत करते. याशिवाय, हे पाणी प्यायल्याने युरिक ॲसिडच्या समस्येसोबतच त्वचा आणि पचनाशी संबंधित विविध समस्यांमध्येही मदत होऊ शकते. त्यामुळे युरिक ॲसिडची पातळी वाढल्याची समस्या असल्यास हे पाणी पिण्यास सुरुवात करावी, असे त्या सांगतात.

मग ‘हे’ पांढरं पाणी नेमकं कोणतं?

या उपायामध्ये सांगितलेले पांढरे पाणी म्हणजे तांदळाचे पाणी. युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी तांदळाचे पाणी तयार करण्याकरिता, प्रथम तांदूळ शिजवून त्याचे पाणी गाळून घ्या. तांदळाच्या पाण्यात थोडे काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला. हे पाणी दररोज प्या.

महत्त्वाचे: युरिक अ‍ॅसिड वाढणे, सांध्यांना सूज किंवा तीव्र वेदना यांसारखी लक्षणे असल्यास स्वतःहून उपचार सुरू करू नका. ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे.