Right Way to Take Bath: अंघोळ हा आपल्या दैनंदिन दिनक्रमातील एक महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळ्यात थंड पाण्याने, तर हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करायला अनेकांना आवडते. काही जण तर अंघोळीच्या पाण्यात डिटॉलसारखे अँटिसेप्टिक लिक्विड मिसळतात. असे केल्याने शरीरावरील जीवाणू नष्ट होतील आणि त्वचा स्वच्छ राहील, असे त्यांना वाटते. पण अंघोळ करण्याची ही पद्धत खरंच योग्य आहे का? गरम पाणी, थंड पाणी की डिटॉल मिसळलेले पाणी, त्वचेसाठी नेमके काय चांगले?
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अंकुर सरीन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंघोळीच्या वेगवेगळ्या सवयींबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, अंघोळ करताना पाण्याचे तापमान आणि त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया, अंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात…
१. गरम पाण्याने अंघोळ करणे त्वचेसाठी योग्य आहे का?
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो. मात्र, अतिशय गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते. डॉ. अंकुर सरीन यांनी गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीला १० पैकी २ गुण दिले आहेत. अतिगरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, लालसरपणा आणि जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच त्वचेचा नैसर्गिक संरक्षणात्मक थरही कमकुवत होऊ शकतो. तेव्हा अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा. अंघोळीनंतर त्वचा हलकी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
२. थंड पाण्याने अंघोळ करणे किती फायदेशीर?
काही लोकांना थंड पाण्याने अंघोळ केल्यावर ताजेतवाने वाटते, तर काहींना हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे कठीण जाते. थंड पाण्याने अंघोळ करणे प्रत्येकासाठीच सर्वोत्तम आहे, असं होत नाही. थंड पाण्याची सहनशीलता व्यक्तीनुसार बदलते. अतिथंड पाण्यामुळे काही लोकांना अस्वस्थता जाणवू शकते. हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अचानक अतिथंड पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. अशावेळी आपल्या शरीराला सहन होईल अशा तापमानाचे पाणी निवडा. थंड पाण्याने अंघोळ केल्यानेच त्वचा अधिक निरोगी राहते, असे समजू नका.
३. अंघोळीच्या पाण्यात डिटॉल मिसळणे टाळावे का?
अनेक घरांमध्ये अंघोळीच्या पाण्यात डेटॉल सोल्यूशन मिसळण्याची सवय असते. असे केल्याने त्वचेवरील जीवाणू नष्ट होतील आणि संसर्ग टाळता येईल, असा अनेकांचा समज आहे. मात्र, नियमित अंघोळीसाठी प्रत्येक वेळी अँटिसेप्टिक लिक्विड वापरण्याची गरज नसते. काही अँटिसेप्टिक उत्पादनांचा चुकीचा वापर केल्यास त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. तसेच संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना खाज, जळजळ किंवा लालसरपणाचा त्रास होऊ शकतो. तेव्हा नियमित स्वच्छतेसाठी त्वचेला अनुकूल साबण किंवा बॉडी वॉश वापरणे पुरेसे असते. अँटिसेप्टिकचा वापर करायचा असल्यास उत्पादनावरील सूचना पाळा. ते अंघोळीच्या पाण्यात मिसळण्यासाठी सुरक्षित आहे का, हे तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचा अनावश्यक वापर करू नका.
४. दिवसातून दोनदा अंघोळ करणे चांगले की वाईट?
काही लोकांना सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळा अंघोळ करण्याची सवय असते. मात्र, प्रत्येकाने दिवसातून दोनदा अंघोळ केलीच पाहिजे, असे नाही. तुम्ही दिवसभर किती शारीरिक मेहनत करता, किती घाम येतो, हवामान कसे आहे आणि तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे, यावर अंघोळीची गरज अवलंबून असते. उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्यास किंवा व्यायाम केल्यानंतर अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, वारंवार अंघोळ करणे, प्रत्येक वेळी साबण वापरणे किंवा अतिगरम पाण्याचा वापर करणे यामुळे त्वचा कोरडी पडू शकते.
तेव्हा शरीराच्या आणि त्वचेच्या गरजेनुसार अंघोळ करा. दिवसातून दोनदा अंघोळ करत असाल, तर सौम्य क्लिन्झर वापरा आणि त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा.
५. अंघोळीनंतर शरीराला तेल लावावे का?
अंघोळीनंतर त्वचेवर तेल किंवा मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होऊ शकते. विशेषतः कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींना अंघोळीनंतर त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अंघोळीनंतर त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. अशा वेळी मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. अंघोळीनंतर टॉवेलने त्वचा हलक्या हाताने पुसा. त्वचा पूर्णपणे कोरडी होण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावा. तेल वापरणार असाल, तर त्वचेला अनुकूल असलेले तेल निवडा. तेलामुळे खाज, पुरळ किंवा जळजळ होत असल्यास त्याचा वापर थांबवा.
त्वचेची काळजी घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- अंघोळीसाठी अतिगरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.
- त्वचा स्वच्छ करण्यासाठी सौम्य साबण किंवा बॉडी वॉश निवडा.
- अंघोळीच्या पाण्यात डिटॉल किंवा इतर अँटिसेप्टिक स्वतःहून मिसळण्याची सवय टाळा.
- अंघोळीनंतर त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा.
- त्वचेवर सतत खाज, लालसरपणा किंवा जळजळ होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केवळ अंघोळ करणे पुरेसे नाही, तर ती योग्य पद्धतीने करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याचे योग्य तापमान निवडणे, अनावश्यक अँटिसेप्टिकचा वापर टाळणे आणि अंघोळीनंतर त्वचेची काळजी घेणे या साध्या सवयी त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.
