Hot Water For High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशन ही जगातील अत्यंत सामान्य पण धोकादायक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. प्रौढांबरोबर आता किशोरवयीन मुलांमध्येही ही समस्या वाढत आहे. ज्या लोकांचा ब्लड प्रेशर सतत जास्त असतो, त्यांना हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर ते दृष्टी कमी होण्यासारख्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हाय बीपीची सर्वात मोठी अडचण म्हणजे सुरुवातीच्या काळात बहुतांश लोकांना कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत. याच कारणामुळे याला बहुदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. वैद्यकीय अहवालांनुसार, भारतात मोठ्या संख्येने लोकांना हाय बीपीचा त्रास आहे, पण त्यांना याची कल्पनाच नाही. हे प्रमाण सुमारे २५% ते २८% प्रौढांमध्ये दिसून येते आणि यातील ६०% पेक्षा जास्त प्रकरणांचे निदानच होत नाही किंवा त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाहीत.
सकाळी गरम पाणी प्यायल्याने बीपी नियंत्रित होऊ शकतो का?
सोशल मीडियावर ब्लड प्रेशरबाबत अनेक दावे केले जातात. अनेक इन्फ्लुएन्सर्स म्हणतात की, रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होते. अनेक लोक याला नैसर्गिक उपाय मानून अवलंब करू लागतात. परंतु प्रश्न असा आहे की, केवळ गरम पाणी प्यायल्याने खरोखरच हाय ब्लड प्रेशर नियंत्रित होऊ शकते का?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी गरम पाणी पिणे पचनसंस्था सुधारण्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते.
गरम पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होते का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्याच्या दिवसांत गरम पाणी पिण्याने काही काळासाठी ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते, असे अनेक अहवालांतून समोर आले आहे. तथापि, केवळ गरम पाणी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर पूर्णपणे कमी होते, असा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.
गरम पाणी प्यायल्याने रक्ताच्या धमन्या रुंदावतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुलभ होतो आणि काही काळासाठी ब्लड प्रेशर कमी होते.
गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतरही अनेक लोकांना ब्लड प्रेशरमध्ये आराम मिळू शकतो.
गरम पाणी पिण्याचे ‘हे’ परिणाम
गरम पाणी शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि काही लोकांमध्ये मानसिक ताण कमी करण्यास मदत करू शकते. गरम पाणी प्यायल्याने अनेकांना आरामदायी वाटते.
पण अतिशय गरम पाणी पिणे हानिकारक ठरू शकते, कारण यामुळे तोंड आणि अन्ननलिकेला इजा पोहोचू शकते. म्हणूनच हलके कोमट पाणी पिणे नेहमी उत्तम मानले जाते.
ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करणे सर्वात महत्त्वाचे आहे:
रोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा आणि मीठाचे सेवन मर्यादित ठेवा.
ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
वजन नियंत्रणात ठेवा. धूम्रपान आणि दारूच्या सेवनापासून दूर राहा.
गरम पाणी, लसूण, मेथी किंवा इतर घरगुती उपाय देखील काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतात.
