scorecardresearch

नैराश्याची समस्या वाढती!

कोविड १९ महासाथीने एकलकोंडेपणा, भवितव्याविषयी अनिश्चितता, नात्यांमधील तणाव, भीती, चिंता आदींमध्ये भरच पडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

चेन्नई : नैराश्य विकाराचे (डिप्रेशन) प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असून, ही एक मोठी आंतरराष्ट्रीय समस्या होऊ पहात आहे. त्याला प्रतिबंध घालण्यास जागतिक स्तरावर अपयश येत असल्याची माहिती लॅन्सेट आणि जागतिक मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने नेमलेल्या नैराश्य विकारावरील आयोगातर्फे नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात देण्यात आली आहे.

या अहवालानुसार दरवर्षी जगभरातील ५ टक्के प्रौढ व्यक्ती नैराश्याने ग्रासत असल्याचा अंदाज आहे. तरीही या वाढत्या जागतिक समस्येची दखल अपेक्षित गांभीर्याने घेतली जात नाही. याविषयी असलेली अपुरी माहिती, मानसिक विकारांविषयी व्यापक सामाजिक जाणिवेचा अभाव व पुरेशा आर्थिक दुर्बलतेमुळे या विकाराचे, निदान, उपचार आणि त्याला प्रतिबंध करण्यास मर्यादा येत आहेत. बहुतेकांना हा विकार झाला आहे, याचे निदानही झालेले नसते. त्यामुळे त्यांच्यावर या विकारातून मुक्तीसाठी सुयोग्य उपचारही होत नाहीत.  समृद्ध देशांत नैराश्याने ग्रस्त असलेल्या ५० टक्के रुग्णांचा यात समावेश होतो. विकसनशील किंवा अविकसित देशांत हे प्रमाणे ८० ते ९० टक्के एवढे प्रचंड आहे.

कोविड १९ महासाथीने एकलकोंडेपणा, भवितव्याविषयी अनिश्चितता, नात्यांमधील तणाव, भीती, चिंता आदींमध्ये भरच पडली. याशिवाय आरोग्यसेवेची अपुरी सोय किंवा ती न मिळण्यामुळे अनेकांना या विकाराचा विळखा पडत आहे. हा अभ्यास अहवाल २५ तज्ज्ञांनी तयार केला आहे. यात ११ देशांतील मेंदूविकार तज्ज्ञांपासून नैराश्य विकारावर प्रभावी उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे. या आयोगाच्या अध्यक्षा प्रा. हेलन हेरमन म्हणाल्या, ‘‘नैराश्य हे एक जागतिक आरोग्य संकट आहे. आयोगाद्वारे जागतिक स्तरावर प्रभावी मानसिक आरोग्य सेवा आणि प्रतिबंधासाठी जागृती निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचे  कार्य सुरू आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rise in depression becoming a major international problem zws