Over The Counter Medicines Risk: हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी आणि खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक वाढलेले दिसते. हिवाळ्यात खोकला येतो तेव्हा अनेकदा मेडिकल स्टोरमधूनच डॉक्टरांचा सल्ला न घेता साधारण औषधे खरेदी केली जातात. आजकाल सर्दी आणि खोकल्याची औषधे रंगीबेरंगी पॅकेजिंगमध्ये उपलब्ध असतात, त्यामुळे त्वरित आराम मिळण्याचे आश्वासन मिळते. तसंच ती ओव्हर दि काउंटर (OTC) असल्याने ती पूर्णपणे सुरक्षित आहेत असे नाही.
खोकला आणि सर्दी यासाठी आपण अनेकदा घेत असलेल्या ओव्हर द काउंटर औषधांचा आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. डिकंजेस्टंट्स, अँटीहिस्टामाइन्स, डेक्स्ट्रोमेथोर्फन, पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन सारखी औषधे भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यांच्या संभाव्य धोक्याची जाणीव लोकांना नाही.
काउंटरवर मिळणाऱ्या औषधांचा अर्थ असा नाही की ते निरूपद्रवी आहेत असे हार्वर्डशी संलग्न फार्मासिस्ट जिगर मेहता यांनी सांगितले आहे. या औषधांचा शरीरावर खोलवर परिणाम होतो आणि ते इतर औषधांसह मिसळून परिणाम करू शकतात असेही त्यांनी सांगितले.
सर्दी-खोकल्यावरील औषधांचे तोटे
डिकंजेस्टंट्स- डिकंजेस्टंट्स नाक बंद झालेले असल्यास त्यावर उपाय करतात. त्यामुळे रूग्णांना सर्दी दरम्यान श्वास घेणे सोपे होते. स्प्रे जर अनेक दिवस वापरला तर त्यामुळे जळजळ वाढू शकते. याचे दुष्परिणाम म्हणजे- रक्तदाबात वाढ, हृदयाचे ठोके जलदगतीने होणे, अस्वस्थता आणि निद्रानाश. हृदयासंबंधित आजार असलेले रूग्ण, उच्च रक्तदाब असलेले रूग्ण, डायबिटीज आणि स्ट्रोकसंबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी ही औषधे धोकादायक ठरू शकतात.
अँटीहिस्टामाइन्स- ही औषधे शिंका येणे, नाकातून पाणी येणे आणि डोळ्यांतून पाणी येणे या त्रासातून आराम देतात. मात्र त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावू शकते. प्रामुख्याने वृद्धांमध्ये याचा परिणाम तीव्र दिसून येतो. यामुळे चक्कर येणे, गोंधळ आणि पडण्याचा धोका उद्भवू शकतो.
डेक्स्ट्रोमेथोर्फन- डेक्स्ट्रोमेथोर्फनसारख्या खोकला कमी करणाऱ्या औषधांचा जास्त वापर मेंदूच्या आरोग्यासाठी चांगला नाही. कारण त्यांचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. या औषधांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे चक्कर येणे, मूड स्विंग्स अशा समस्या होतात.
पेनकिलर आणि तापाची औषधे
पॅरासिटामॉल आणि आयबुप्रोफेन सारख्या वेदना आणि तापाच्या औषधांचे जास्त सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. यामुळे लिव्हरचे आणि किडनीचे नुकसान होऊ शकते. पोटात रक्ताची समस्या होऊ शकते. तसंच हार्टअटॅकचा धोका वाढू शकतो.
एकत्रित औषधांचा धोका
डेक्विल, न्यक्विल सारख्या औषधांमध्ये अनेक औषधे एकत्रित असतात आणि अशा एकत्रित औषधांमुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते.
ओटीसी औषधे एकत्रित घेण्याबाबत डॉक्टर काय सांगतात?
सफदरजंग हॉस्पिटलमधील फुप्फुसासंबंधित औषध विभागाचे प्रमुख डॉ. रोहित कुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आजकाल लोक इंटरनेट आणि ओटीसी या आधारावर स्वत:ला डॉक्टर समजतात. सौम्य सर्दी, खोकला किंवा घसा खवखवण्यासाठी लोक स्टोअरमधून प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे खरेदी करतात. काही जण तर इतरांना सल्लेही देतात. यामुळे भविष्यात आरोग्यासंबंधित गंभीर धोके उद्भवू शकतात.
