रस्ता सुरक्षा परीक्षण

आपल्याकडे इमारतींची दरवर्षी संरचना तपासणी केली जाते व त्याचा अहवाल स्थानिक प्रशासन जाहीर करीत असते.

आपल्याकडे इमारतींची दरवर्षी संरचना तपासणी केली जाते व त्याचा अहवाल स्थानिक प्रशासन जाहीर करीत असते. त्यात धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली जाते. त्या धोकादायक इमारतींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर काय होते, हे आपण दरवर्षी पाहत असतोच. तसेच रस्त्यांचेही आहे. मात्र रस्त्यांच्या बाबतीत तसे होत का? वाहनचालकाला तो वाहन चालवीत असलेला रस्ता सुरक्षित आहे की धोकादायक याची माहिती असते का? तर नाही. त्यामुळे इमारती सुरक्षा तपासणीप्रमाणे रस्ते सुरक्षा तपासणीही महत्त्वाची आहे. रस्ता सुरक्षादृष्टय़ा कोणत्या प्रकारात मोडतो याचे फलक जागोजागी लावणे गरजचे आहे.

रस्ते दुर्घटनांना चालक, वाहन व रस्ता हे तीन घटक जबाबदार असतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, दुर्घटनांमध्ये रस्ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. रत्यांमध्ये भौमितिक त्रुटी आढळून येतात. मार्गदर्शनाकरिता वाहतुकीची चिन्हे व खुणा रंगवलेल्या नसतात, सिग्नल्स नादुरुस्त असतात, जागोजागी खड्डे व त्यात साठलेले पाणी यातून वाट काढत पादचाऱ्यांना, वाहनधारकांना जावे लागते. आपली सर्वाची सुरक्षितता दुर्लक्षली जाते. रस्त्यांची रचना व आराखडय़ातील उणिवांमुळे दुर्घटना होणार असतील तर त्याची मोठी किंमत समाजाला द्यावी लागते. मानवी जीवाची किंमत मोजता येत नाही, ती रस्ते निर्माणापेक्षा निश्चितच जास्त आहे. त्यामुळे रस्ते बांधकामामधील उणिवांबाबत अभियंते आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. आता सुधारित मोटार वाहन कायद्यात ती निश्चित केली आहे.

काही प्रकरणात कालबाह्य मानकांचा वापर आराखडय़ात केला जातो. काही वेळा बांधकामाविषयी विविध घटकांचा संयोग केला जातो. परंतु त्यामुळे रस्ता सुरक्षित होत नाही. काही वेळा रस्ता बांधणी करत असताना त्यात बदल केला जातो, या सर्व बाबींचा विचार केल्यास रस्ता प्रकल्पांचे परीक्षण करणे आवश्यक आहे. नव्हे तर ते सरकारने सक्तीचेच केले पाहिजे.

‘ब्लॅकस्पॉट’ परीक्षण म्हणजेच सुरक्षा परीक्षण नव्हे. परीक्षणात रस्त्यांच्या रचनेतील उणिवा व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके दूर करणे आवश्यक आहे. परीक्षण अहवालात संपूर्ण भर रस्त्यांच्या सुरक्षेवरच असला पाहिजे. परीक्षण करताना सुरक्षासंबंधी मानव व मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेतली पाहिजे. रस्त्याचा वापर करणारा प्रत्येक वाहनधारक व बिगर वाहनधारक वर्गाचा, दिवस-रात्र हवामान बदलातील प्रवासाचा विचार करणे गरजेचे आहे. सदर अहवाल वास्तव व्यवहारिक व वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे.

परीक्षणाचे पाच टप्पे

१. प्राथमिक आराखडा तयार करताना रस्ता मार्ग निश्चिती, आराखडा मानक, सद्य:स्थितीलगतचे रस्ते, रस्ता उभा-आडवा एकीकरण, रस्त्याचे उभे-आडवे छेद इ. चा अभ्यास, निरीक्षण अहवाल करीत त्याचे परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. परीक्षण जितके अचूक तितका वेळ व पैसा बचत होतो.

२. विकास आराखडा तयार झाल्यानंतर परंतु करारनाम्यापूर्वी परीक्षण करावं. परीक्षणात भौमितिक समजूत नकाशा, इंग्रजीतील संज्ञासुद्धा नमूद करावी. पादचारी सायकलस्वार मार्ग, प्रकाश योजना, रस्त्यावरील खुणा पट्टे व सिग्नलचा समावेश असावा.

३. रस्ता बांधकाम निर्माणाधीन असताना परीक्षण करावे. वाहतूक व्यवस्थापन नियोजनाची तपासणी केली पाहिजे. वाहतूक व्यवस्थापनात पादचारी सुरक्षा, आगाऊ  इशारा देणारी क्षेत्रे, संक्रमण क्षेत्रे, सुरक्षा क्षेत्रांचे लेखाटन, वेग निश्चितीकरण इ. समावेश असावा.

४. रस्ता प्रकल्पाचे उद्घाटन होण्यापूर्वी परीक्षण समूहातील प्रत्येक सदस्यांनी रस्त्यावरून वाहन चालवले पाहिजे. त्यात बसून प्रवास केला पाहिजे तसेच पायी प्रवास केला पाहिजे. रस्त्यावरील प्रत्येक घटकाची रस्ता सुरक्षाविषयी अपेक्षा पूर्ण झाल्याची खात्री करावी, मग ती दिवसाची किंवा रात्रीची असेल.

५. रस्त्याचे परीक्षण करताना सुरक्षाविषयी वैशिष्टय़े त्या रस्त्याना सुसंगत असल्याची खात्री करावी. रस्त्यावरील खड्डे पाणी साठवण्याच्या जागा, रस्त्यावरील सुरक्षाविषयक खुणा, चिन्हे, सिग्नल, दर्शनी अंतर, रस्त्यानजीकचे धोकादायक ठिकाणे, प्रकाशयोजना याबाबतची दुरुस्ती संबंधित विभागणी करणे आवश्यक आहे. याकामी परीक्षणाची आवश्यकता नाही. रस्त्यावरील दुर्घटनांची माहिती प्राप्त करून त्याचा अभ्यासातून उपलब्ध निष्कर्षांचा आधार घेत रस्ता सुरक्षा वाढवणे आवश्यक आहे.

ग्रामीण रस्ते

देशातील बहुतांश खेडी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जोडली गेली आहेत. ग्रामीण रस्ते अरुंद असतात व रचना कमी वेगाकरिता असते. तसेच या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी असते. ग्रामीण भागात त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहनेदेखील वाढली आहेत व त्यामुळे अपघात देखील. वाढणारे अपघात हा चिंतेचा विषय आहे. ग्रामीण त्यांच्या रचनेमधील उणिवा दूर करणे, आवश्यक असमतोल, खड्डेयुक्त रस्ते, कडेला साचणारे पाणी, खुणा-चिन्हांचा अभाव, पुलांवर कठडा नसणे, हादरणारे थरथरणारे पूल यावर परीक्षण करून सुधारणा आवश्यक आहे.

शहरी रस्ते

शहरी रस्ते नेहमीच वाहन व वाहन वापर करणाऱ्या घटकांनी फुलून गेलेले असतात. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व घटकांचा एकमेकांशी संवाद होत असतो. शहरी रस्ते सुरक्षित होण्याकरिता शहरी विकास विभागाने प्रत्येक रस्त्याचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील रस्त्यांची भौमितिक रचना, काटरस्ता एकीकरण, रस्ता बांधकाम, जमीन मर्यादा यावर मात करीत रस्ता सुरक्षा परीक्षण करणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते खड्डे असमतोल, पाणी साठणारे, निसरडे, उड्डाणपुलाजवळ आवश्यक उपकरणे अभाव, अपुरी प्रकाश योजना, सांडपाण्याचा निचरा होत नाही, अपुरे दृष्टी अंतर असणारे असतात. कमी खर्चात हे सुरक्षित करणे शक्य आहे.

कोणत्या रस्त्याचे परीक्षण आवश्यक

रस्त्यांची वेग मर्यादा ५० किमीपेक्षा जास्त आहे, अशा प्रकल्पाची तसेच त्या वर्दळीची रस्त्यावर वाहन वापरणारे व न वापरणारे एकत्रित असतात त्याचे परीक्षण आवश्यक आहे. परीक्षणांमुळे रस्ता प्रकल्पांची कालचR  किंमत कमी राहते तसेच संभाव्य दुर्घटना कमी होतात. रस्ता व वापरणाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होते तसेच दुर्दैवी अपघातानंतरचा इलाज खर्च टाळता येतो. रस्ते सुरक्षित होतात व अपघात संख्या कमी होते. नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या यंत्रणामार्फत शहरी रस्त्यांचे दुरुस्ती व परीक्षण करणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Road safety test drivers highway ssh

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या