Sendha Namak vs White Salt: ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून अनेकजण आहारातील पांढरे मीठ कमी करून त्याऐवजी सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट वापरतात. सैंधव मीठ नैसर्गिक असल्यामुळे ते पांढऱ्या मिठापेक्षा आरोग्यदायी आणि ब्लड प्रेशरसाठी सुरक्षित असल्याचा समज आहे. पण खरंच सैंधव मीठ किती सुरक्षित आहे? यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते का? याबाबत आरोग्यतज्ज्ञ नेमकं काय सांगतात याबाबत जाणून घेऊया… ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आहारातील सोडियमचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरातील सुमारे १.४ अब्ज प्रौढांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे. दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.
पांढरे मीठ सोडून सैंधव मीठ खाल्लं, तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येईल?
अनेकांना वाटते की पांढरे मीठ प्रक्रिया केलेले असते, तर सैंधव मीठ नैसर्गिक असल्याने ते अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे काही लोक पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरतात. मात्र मीठाचा प्रकार बदलण्यापेक्षा एकूण सोडियमचे सेवन किती आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.
सैंधव मीठ म्हणजे रॉक सॉल्ट. त्यातही मुख्य घटक सोडियम क्लोराइड असते. त्यामुळे सैंधव मीठही मोठ्या प्रमाणात खाल्ले, तर शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते आणि त्याचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.
सैंधव मीठामुळेही वाढू शकतो रक्तदाब?
हो, प्रमाणापेक्षा जास्त सैंधव मीठ खाल्ल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका असू शकतो. रॉक सॉल्ट, सी सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट यांना अनेकदा पांढऱ्या मिठापेक्षा आरोग्यदायी पर्याय मानले जाते. मात्र या सर्वांमध्ये सोडियम असते. त्यामुळे ‘हे मीठ नैसर्गिक आहे, म्हणून कितीही खाल्ले तरी चालेल’ असा समज चुकीचा ठरू शकतो. आधीच उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या व्यक्तींनी मीठाच्या प्रकारापेक्षा त्याचे प्रमाण आणि दिवसभरातील एकूण सोडियमचे सेवन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
WHOच्या मते दिवसाला किती मीठ?
WHO प्रौढांनी दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ, म्हणजेच साधारण २००० मिलीग्रॅमपेक्षा कमी सोडियम घेण्याचा सल्ला देते. जास्त सोडियमचे सेवन केल्यास शरीरात पाणी धरून ठेवले जाऊ शकते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवरील दाब वाढण्यास हातभार लागू शकतो आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच सैंधव मीठ वापरताना ते पांढऱ्या मिठापेक्षा सुरक्षित आहे म्हणून त्याचे प्रमाण वाढवणे योग्य नाही.
फक्त मिठाची डबीच नाही, ‘या’ पदार्थांकडेही लक्ष द्या!
आपण दिवसभरात किती मीठ खातो, याचा अंदाज अनेकदा फक्त जेवणात वरून टाकलेल्या मिठावरून लावला जातो. पण सोडियम अनेक पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड पदार्थांमध्ये आधीपासूनच असू शकते.
- चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्स
- नमकीन आणि फरसाण
- इंस्टंट नूडल्स
- सॉस आणि रेडीमेड ड्रेसिंग
- लोणची
- काही प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ
अशा पदार्थांचे सेवन वारंवार केले आणि त्यावरून पुन्हा सैंधव मीठ टाकले, तर दिवसातील एकूण सोडियमचे प्रमाण वाढू शकते.
ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी काय करावे?
हाय ब्लड प्रेशर असल्यास पांढरे मीठ पूर्णपणे सोडून सैंधव मीठ सुरू करणे हा काही जादुई उपाय नाही. त्याऐवजी एकूण मीठ आणि सोडियमचे सेवन कमी करणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी आहारात हळूहळू मीठ कमी करा. जेवणावरून अतिरिक्त मीठ टाकण्याची सवय टाळा. नमकीन, चिप्स आणि इतर पॅकेज्ड स्नॅक्सचे सेवन कमी करा. शक्य असल्यास खाद्यपदार्थांच्या लेबलवर सोडियमचे प्रमाण तपासण्याची सवय लावा.
पांढरे मीठ असो किंवा सैंधव मीठ, दोन्हीमध्ये सोडियम असते. त्यामुळे फक्त मीठाचा प्रकार बदलल्याने ब्लड प्रेशरचा धोका संपत नाही. BP नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठाचे प्रमाण कमी करणे, पॅकेज्ड पदार्थांमधील सोडियमकडे लक्ष देणे, नियमित शारीरिक हालचाल करणे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
