Ronit Roy Fitness at 60: ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेतील ऋषभ बजाज ही भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. ही भूमिका साकारणारे अभिनेते रोनित रॉय आता ६० वर्षांचे झाले आहेत. मात्र, त्यांचा फिटनेस पाहिल्यावर वयाचा आकडा केवळ आकडा वाटतो. आजही ते नियमित व्यायाम, शिस्तबद्ध आहार आणि फिटनेस रूटीन फॉलो करतात. विशेष म्हणजे त्यांच्या डाएटमध्ये त्यांनी काही मोठे बदल केले आहेत.
वयाची साठी पार केल्यानंतर अनेक जण आपल्या दिनचर्येत आरामाला अधिक महत्त्व देऊ लागतात. मात्र, अभिनेता रोनित रॉय याला अपवाद ठरले आहेत. वयाच्या ६०व्या वर्षीही त्यांचा फिटनेस आणि शरीरयष्टी चर्चेचा विषय ठरते. वाढतं वय म्हणजे काम आणि व्यायाम कमी करण्याचं कारण नाही, असं त्यांच्या दिनचर्येकडे पाहिल्यानंतर जाणवतं. विशेष म्हणजे स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांनी केवळ व्यायामावर भर दिलेला नाही, तर आपल्या आहारातही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. डाएटमधून त्यांनी नेमक्या कोणत्या दोन गोष्टी दूर केल्या आहेत हे जाणून घेण्याआधी त्यांची फिटनेस दिनचर्या समजून घेऊया.
वय झालं म्हणून थांबायचं नाही!
रोनित रॉय यांच्यासाठी फिटनेस म्हणजे केवळ चांगली शरीरयष्टी मिळवण्याचा मार्ग नाही. त्यांना दीर्घकाळ सक्रिय राहायचे आहे. त्यांनी आपल्या फिटनेसविषयी बोलताना, मी ६०व्या वर्षीही म्हातारा होऊ इच्छित नाही. मला तंदुरुस्त राहायचे आहे आणि आणखी २५ वर्षे काम करायचे आहे, अशी भूमिका मांडली आहे.
काही दिवस सुट्टी घेऊन आराम करणे ठीक आहे; मात्र सतत निष्क्रिय राहणे त्यांना पसंत नाही. त्यांच्या मते, फिटनेससाठी एकच ठरावीक नियम किंवा मूलमंत्र नसतो. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असल्यामुळे त्यानुसार व्यायाम आणि आहाराची पद्धतही वेगळी असू शकते. आपण आपल्या शरीराची काळजी कशी घेतो आणि स्वतःला किती सक्रिय ठेवतो हे महत्त्वाचे आहे.
आठवड्यात सहा दिवस व्यायाम
स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोनित रॉय नियमित व्यायाम करतात. त्यांच्या व्यायामाच्या दिनचर्येत वजन उचलणे आणि प्रतिकार प्रशिक्षण म्हणजेच रेसिस्टन्स ट्रेनिंग यांना महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत होते.
याशिवाय ते धावण्याचाही व्यायाम करतात. त्यांच्या दिनचर्येत ट्रेडमिलवरील धावणे, कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा समावेश आहे. ते आठवड्यातील सहा दिवस व्यायाम करतात, तर एक दिवस शरीराला विश्रांती देतात.
केवळ जिममधील व्यायामावरच ते थांबत नाहीत. मार्शल आर्ट आणि स्टिक फायटिंगचाही सराव त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे. अशा प्रकारच्या व्यायामामुळे शरीर सक्रिय ठेवण्यास आणि स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यास मदत होते.
आहारातही शिस्त
व्यायामासोबतच रोनित रॉय आपल्या आहाराबाबतही शिस्त पाळतात. त्यांच्या आहारातील महत्त्वाचा भाग म्हणजे १६/८ इंटरमिटंट फास्टिंग. या पद्धतीत दिवसातील आठ तासांच्या कालावधीत आहार घेतला जातो आणि त्यानंतर १६ तास उपवास केला जातो.
उदाहरणार्थ, सकाळी १० ते संध्याकाळी ६ या आठ तासांच्या कालावधीत जेवण आणि इतर आहार घेतला तर त्यानंतर पुढील १६ तास आहार घेतला जात नाही. या पद्धतीचा वापर करणारे लोक ठरावीक वेळेतच आहार घेण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, कोणतीही उपवासाची किंवा आहाराची पद्धत प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही, त्यामुळे अशा प्रकारचा आहार सुरू करण्यापूर्वी आपल्या आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
डाएटमधून काढल्या ‘या’ दोन गोष्टी
आता रोनित रॉय यांच्या आहारातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांनी मांसाहारी पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते शाकाहारी, विशेषतः व्हेगन आहाराचा अवलंब करतात, त्यामुळे अंडी आणि मांस ते खात नाहीत.
अंडी आणि मांसातून मिळणारी प्रथिने टाळल्यानंतर आहारातील प्रथिनांची गरज ते शाकाहारी पदार्थांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. हा बदल करणे काहीसे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, ते याकडे आपल्या फिटनेस दिनचर्येचाच एक भाग म्हणून पाहतात.
याशिवाय ते दुग्धजन्य पदार्थही टाळतात आणि पोळीचे सेवनही कमी करतात. म्हणजेच रोनित रॉय यांच्या फिटनेसचा आधार केवळ जिममध्ये घाम गाळणे एवढाच नाही. नियमित व्यायाम, शिस्तबद्ध आहार, योग्य विश्रांती आणि आपल्या दिनचर्येतील सातत्य यावरही ते भर देतात.
महत्त्वाचे : रोनित रॉय यांची ही वैयक्तिक आहार आणि व्यायामाची दिनचर्या आहे. ती प्रत्येक व्यक्तीसाठी तशीच योग्य असेल असे नाही. विशेषतः इंटरमिटंट फास्टिंग किंवा आहारातून एखादा अन्नगट पूर्णपणे वगळण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
