Gulab Khat at Home: घरच्या बागेत गुलाबाची रोपे असतील आणि त्यावर रंगीबेरंगी फुले उमलली तर ते सगळ्यांनाच आवडते. पण कधी कधी योग्य काळजी न घेतल्यामुळे रोपांना फुले कमी येतात किंवा फुलांचा आकार लहान राहतो. आज आम्ही तुम्हाला एक सोपा आणि घरगुती उपाय सांगत आहोत, ज्यामुळे गुलाबाच्या रोपांवर जास्त आणि सुंदर फुले येऊ शकतात. खास म्हणजे या उपायासाठी महागडी खतं किंवा रसायनांची गरज नाही, रोज वापरातली उरलेली चहापावडरच पुरेशी आहे.

चहा बनवल्यानंतर उरलेली चहापावडर आपण अनेकदा निरुपयोगी समजून फेकून देतो, पण त्यामध्ये झाडांसाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात. चहापावडरमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम आणि सेंद्रिय घटक असतात, जे मातीची गुणवत्ता सुधारायला मदत करतात. त्यामुळे योग्य पद्धतीने वापरलेली चहापत्ती गुलाबाच्या रोपांसाठी नैसर्गिक खतासारखी काम करते.

हा उपाय करण्यापूर्वी चहापावडर योग्य पद्धतीने तयार करणे गरजेचे आहे. सर्वात आधी चहा बनवल्यानंतर उरलेली चहापावडर स्वच्छ पाण्याने नीट धुवा, जेणेकरून त्यातील साखर किंवा दूधाचे अंश पूर्णपणे निघून जातील. त्यानंतर चहापावडर उन्हात चांगली वाळवून घ्या. पूर्ण सुकल्यानंतर ती एखाद्या डब्यात ठेवून वापरू शकता.

आता याच्या वापरण्याच्या पद्धतीबद्दल पाहूया. दर १५ ते २० दिवसांनी गुलाबाच्या रोपाची माती थोडीशी खणून घ्या आणि त्यात साधारण २ चमचे सुकलेली चहापत्ती मिसळा. त्यानंतर थोडे पाणी द्या. लक्षात ठेवा, प्रमाण जास्त असू नये, कारण जास्त चहापत्ती टाकल्यास माती खूप आम्लीय होऊ शकते आणि त्यामुळे रोपाला नुकसानही होऊ शकते.

बागकाम तज्ज्ञांच्या मते, चहापत्ती मातीची सुपीकता वाढवायला मदत करते. त्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली होते आणि मुळांना आवश्यक पोषण सहज मिळते. याचा थेट परिणाम झाडाच्या वाढीवर आणि फुलांच्या गुणवत्तेवर होतो. नियमित वापर केल्यास झाडे अधिक निरोगी राहतात आणि त्यावर फुलांची संख्या देखील वाढते.

गुलाबाच्या रोपांना पुरेशी सूर्यप्रकाश, योग्य प्रमाणात पाणी आणि वेळोवेळी छाटणी मिळत राहावी. फक्त खत देण्याने नाही, तर एकंदर काळजी घेतल्यानेच झाड चांगली फुले देते. तुम्हालाही तुमच्या गुलाबाच्या रोपांना रसायनाशिवाय निरोगी आणि सुंदर ठेवायचे असेल, तर हा घरगुती उपाय नक्की वापरा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित असून ती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)