Winter Rose Plant Care: हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात गुलाबाची फुले सर्वाधिक फुलतात. ऑक्टोबर ते मार्च या थंडीच्या दिवसांत गुलाबाला भरपूर फुले येतात. लग्नसमारंभ असो किंवा घराची सजावट, गुलाबाच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
देशभरात देशी गुलाबाची झाडे लावली जातात. हे झाड लावणे खूप सोपे आहे. कलमापासूनही गुलाबाचे नवीन रोप तयार करता येते. गुलाबाचे झाड दाट कसे करावे, पावसामुळे खराब झालेलं झाड पुन्हा कसं जिवंत करावं आणि त्याला जास्तीत जास्त फुले कशी आणावीत, हे जाणून घेऊया.
गुलाबाच्या झाडाला अतिशय सुंदर फुले येतात. लाल रंगाचा गुलाब सर्वांनाच आवडतो. ही फुले दिसायलाही खूप आकर्षक असतात. नर्सरीतून चांगल्या जातीचे रोप आणून कुंडीत लावणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. ही ग्राफ्टेड रोपे असतात आणि त्यांना लवकर फुले येतात. १०×१० इंचाच्या कुंडीत गुलाबाचे रोप सहज लावता येते. ग्राफ्टेड रोप कुंडीत लावताना ग्राफ्टिंगचा भाग मातीपासून दीड ते दोन इंच वर राहील, याची काळजी घ्या. याच भागाजवळून बेसल शूट्स म्हणजे नवीन फांद्या फुटतात. जितक्या जास्त फांद्या येतील, तितक्या जास्त कळ्या आणि फुले येतील.
गुलाबाच्या झाडाची नियमित काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर झाडाची वाढ थांबू शकते. योग्य वेळी छाटणी करणे आणि खत देणे गरजेचे आहे.
झाडाची छाटणी केली नाही तर नवीन कळ्या येत नाहीत. योग्य निगा राखल्यास झाड वर्षभर हिरवेगार राहते. वर्षातून एकदा झाडाची हार्ड प्रूनिंग म्हणजेच सुमारे ६० टक्के फांद्यांची छाटणी करावी. ज्या फांदीवर फूल आले असेल, ते फूल कोमेजल्यानंतर तीन पानांच्या खाली कापावे. ऑक्टोबर महिन्यात हे काम नक्की करा. याच महिन्यात झाडाला योग्य प्रमाणात खतही द्यावे.
गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले यावीत, यासाठी दररोज किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. झाडाला वेगवेगळ्या प्रकारची खते आळीपाळीने द्यावीत. दर १५ दिवसांनी खत द्यावे. गुलाबाच्या झाडाला पोटॅशियमची गरज असते. केळी आणि बटाट्याच्या सालींमध्ये पोटॅशियम भरपूर असते. त्यामुळे केळीच्या साली वाळवून त्याची पूड तयार करा. ही पूड कॉफीच्या चोथ्यासोबत किंवा वापरलेल्या चहापत्तीमध्ये मिसळून झाडाला द्या.
खत टाकण्यापूर्वी कुंडीतील माती हलकी खुरपून घ्या. मातीला दोन-तीन दिवस चांगले ऊन लागल्यानंतर कॉफी, बटाट्याच्या साली आणि केळीच्या सालींची पूड टाका. त्यानंतर झाडाला पाणी द्या. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होईल आणि नवीन कळ्या व फुले येतील.
गुलाबाच्या झाडाची काळजी घेताना झाडावर एकही वाळलेली फांदी राहणार नाही, याची काळजी घ्या. वाळलेली पाने आणि फांद्या त्वरित काढून टाका. अधिक कळ्या आणि फुले यावीत, यासाठी आणखी एक उपाय करू शकता. झाडाभोवतीची माती चांगली खुरपून घ्या. दर तीन महिन्यांनी अर्धा किलो वर्मी कंपोस्ट टाका. यासोबत मोहरीची पेंड पाण्यात भिजवून हिवाळ्यात झाडाला द्या. तसेच १०० ग्रॅम बोन मीलही टाकू शकता. बोन मील टाकल्यानंतर त्यावर मातीचा थर द्या. त्यानंतर झाडाला भरपूर पाणी द्या. त्यामुळे झाड दाट होईल आणि भरपूर फुले येतील.
गुलाबाच्या झाडासाठी सागरिका, प्रोम किंवा सीविडसारखी सेंद्रिय खते खूप फायदेशीर ठरतात. ही खते झाडाच्या वाढीस मदत करतात. जर तुमच्याकडे जुने गुलाबाचे झाड असेल आणि त्याला फुले किंवा नवीन कळ्या येत नसतील, तसेच अनेक प्रकारची खते वापरूनही फायदा होत नसेल, तर सागरिका, प्रोम किंवा सीविड यापैकी कोणतेही खत कुंडीत टाका. ही खते ऑनलाइनही सहज उपलब्ध आहेत. याशिवाय झाडाला कोरफडीचा रसही देऊ शकता. त्यामुळे गुलाबाचे झाड भरपूर फुलांनी बहरून जाईल.
