Does Roasting Roti Directly on a Gas Burner Cause Cancer: कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा सातत्याने होत असताना आपल्या रोजच्या स्वयंपाकातील अगदी साध्या सवयींकडेही आता आरोग्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे. चपाती, पोळी किंवा भाकरी हा भारतीय आहाराचा अविभाज्य भाग. अनेक घरांमध्ये पोळी आधी तव्यावर अर्धवट भाजली जाते आणि त्यानंतर ती थेट गॅसच्या ज्वालेवर धरून फुगवली जाते. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही पद्धत अगदी सामान्य वाटते. पण, थेट गॅसच्या ज्वालेवर चपाती फुगवल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो का? याबाबत संशोधक आणि डॉक्टरांचे मत काय आहे, हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही चपाती भाजण्याची पद्धत नक्कीच एकदा तपासून पाहाल.
वैज्ञानिक अभ्यासात नेमकं काय आढळलं?
२०१५ मध्ये Environmental Science and Technology या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या स्टोव्हमधून कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डाय-ऑक्साइड आणि सूक्ष्म कण यांसारखे प्रदूषक बाहेर पडू शकतात, असे नमूद करण्यात आले होते. अशा प्रदूषकांचा दीर्घकाळ संपर्क आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
त्याशिवाय अन्नपदार्थ अतिशय उच्च तापमानावर शिजविताना काही रासायनिक संयुगे तयार होऊ शकतात. त्यामध्ये हेट्रोसायक्लिक अमाइन्स (HCAs) आणि पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) यांचा समावेश होतो. काही परिस्थितींमध्ये ही संयुगे पेशींमधील DNA चे नुकसान करण्याशी संबंधित असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे कर्करोगाच्या जोखमीशी त्यांचा संभाव्य संबंध अभ्यासला जात आहे.
मात्र, याचा अर्थ गॅसवर थेट भाजलेली प्रत्येक चपाती कर्करोगाला कारणीभूत ठरते, असा निष्कर्ष काढता येत नाही.
डॉक्टर म्हणतात, नेमका धोका कुठे?
दिल्लीतील वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. श्याम अग्रवाल यांच्या मते, केवळ थेट गॅसच्या बर्नरवर चपाती शिजविल्यामुळे कर्करोग होतो, असे सरळपणे सांगता येणार नाही. शरीरामध्ये पेशींच्या DNA मध्ये झालेल्या काही प्रकारच्या नुकसानीची दुरुस्ती करण्याची नैसर्गिक क्षमता असते. मात्र, अशा प्रकारे तयार झालेले किंवा जास्त तापमानाला शिजवलेल्या पदार्थांचे दीर्घकाळ आणि नियमितपणे सेवन केल्यास संभाव्य धोका वाढू शकतो.
म्हणजेच एका दिवसाची किंवा एखाद्या वेळी थेट ज्वालेवर फुगवलेली चपाती आणि वर्षानुवर्षे जळालेले पदार्थ नियमित खाणे या दोन्ही गोष्टी एकसारख्या मानता येणार नाहीत.
काळी पडलेली पोळी अधिक चिंतेची बाब?
तुमच्या पोळीचा एखादा भाग काळपट किंवा पूर्णपणे करपलेला दिसला, तर तो खाण्यापूर्वी विचार करणे योग्य ठरू शकते. अतिउष्णतेमुळे काही पदार्थांमध्ये अॅक्रिलामाइड (Acrylamide) तयार होऊ शकते. विशेषतः स्टार्चयुक्त पदार्थ उच्च तापमानावर शिजविल्यास या रसायनाची निर्मिती होऊ शकते.
अॅक्रिलामाइडबाबतही संशोधन सुरू आहे आणि त्याच्या संभाव्य आरोग्यविषयक परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे पोळी मुद्दाम काळी होईपर्यंत भाजणे किंवा करपलेला भाग वारंवार खाणे टाळणे ही साधी खबरदारी ठरू शकते.
अपोलोच्या डॉक्टरांनी काय सांगितलं?
अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. दीपांजन पांडा यांच्या मते, थेट ज्वालेवर किंवा कोळशावर अन्न शिजविताना काही हानिकारक रसायने तयार होण्याची शक्यता असते. मात्र, याबाबत उपलब्ध पुरावे मर्यादित आहेत. त्यांच्या मते शक्य असल्यास अशा पद्धतीने अन्न शिजवणे टाळणे योग्य ठरू शकते.
त्यांनी चुलीवर शिजवलेल्या पदार्थांचा आणि गॉल ब्लॅडर कॅन्सर म्हणजेच पित्ताशयातील कर्करोगाच्या काही प्रकारच्या जोखमीतील संबंधाचा उल्लेख केला आहे. मात्र, याचा थेट संबंध प्रत्येक व्यक्तीला लागू होतो, असे मानता येणार नाही.
मग पोळी तव्यावरच भाजावी का?
पोळी थेट ज्वालेवर फुगवण्याची पद्धत अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र, पोळी जळू न देणे, काळपट किंवा करपलेले भाग टाळणे आणि स्वयंपाकघरात योग्य वायुविजन ठेवणे ही खबरदारी घेता येऊ शकते.
थेट गॅसच्या ज्वालेवर चपाती फुगवल्याने कर्करोग होतो, असे ठोसपणे सिद्ध झालेले नाही. मात्र, उच्च तापमान, जळलेले अन्न आणि स्वयंपाकातून निर्माण होणाऱ्या काही रसायनांचा दीर्घकाळ होणारा संपर्क हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे घाबरण्यापेक्षा संतुलित आहार, योग्य स्वयंपाक पद्धत आणि जळलेले पदार्थ टाळणे हा अधिक सुरक्षित दृष्टिकोन ठरू शकतो.
(महत्त्वाची सूचना : या बातमीतील माहिती उपलब्ध संशोधन आणि डॉक्टरांच्या मतांवर आधारित आहे. थेट गॅसवर चपाती भाजल्याने कर्करोग होतो, असा ठोस वैज्ञानिक निष्कर्ष यातून काढता येऊ शकत नाही.)
