Tips For Better Sleep: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री शांत झोप मिळणे हे आजकाल अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. कधी रात्री ३ वाजता अचानक जाग येणे, तर कधी पायात पेटके येणे किंवा घसा कोरडा पडल्यामुळे होणारी चिडचिड आपल्या आरोग्यावर परिणाम करते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सुचवलेला हा ‘नाईटटाईम ट्रे’ (Nighttime Tray) तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या स्वयंपाकघरातील साध्या गोष्टी वापरून तुम्ही झोपेच्या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. जाणून घेऊया नेमक्या कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि काय सांगतात तज्ज्ञ…
१. पाणी- शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त
नारायणा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अभिनव गुप्ता यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. डिहायड्रेशनमुळे झोपताना जास्त गरम किंवा थंडी वाजू शकते.
कोमट पाण्याचे फायदे: झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि नैसर्गिक ‘डिटॉक्स’ प्रक्रियेला मदत होते. यामुळे पोटातील दुखणे किंवा क्रॅम्प्स कमी होऊ शकतात.
रक्ताभिसरण: कोमट पाण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि घाम आल्यामुळे शरीरातील अतिरिक्त क्षार व विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
२. तूप: पायांना मसाज करण्यासाठी
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. आशुतोष ननल यांनी ‘पादाभ्यंग’ म्हणजेच पायांच्या मसाजचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते, आपल्या पायात अनेक प्रेशर पॉइंट्स असतात ज्यांचा थेट संबंध रोगप्रतिकारक आणि मज्जासंस्थेशी असतो. झोपण्यापूर्वी तळपायांना तूप लावून मसाज केल्याने मज्जासंस्था शांत होते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
३. खडीसाखर: तणावमुक्तीसाठी
खडीसाखर हा साखरेचा सर्वात शुद्ध प्रकार मानला जातो. डॉ. ननल यांच्या मते, आयुर्वेदामध्ये खडीसाखरेला औषधी महत्त्व आहे.
खडीसाखर शरीर आणि मनावर शांत प्रभाव पाडते, त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. हे त्वरित ऊर्जा देते आणि शरीराच्या इंद्रियांना शिथिल (relax) करण्यास मदत करते.
४. राजगिरा लाडू: पचन आणि ऊर्जेसाठी
राजगिरा हा प्रोटीन, फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असा ग्लुटेन-मुक्त पदार्थ आहे. पोषणतज्ज्ञांच्या मते राजगिरा जळजळ (anti-inflammatory) कमी करण्यास मदत करतो. यातील फायबरमुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. आरोग्यदायी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी राजगिरा लाडू हा एक उत्तम पर्याय आहे.
