What Is Your Fitness Goal Running or Walking? आरोग्य आणि फिटनेसच्या जगात नेहमीच एक एका मुद्द्यावर चर्चा केली जाते, तो म्हणजे चालणे उत्तम की धावणे? दोन्ही प्रकारचे व्यायाम हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी आणि शरीराला फिट राखण्यासाठी फायदेशीर मानले जातात. मात्र, नेमके काय जास्त प्रभावी आहे? मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलचे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गझनफर बी. पटेल यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या विषयावर सखोल मार्गदर्शन केले आहे.

ध्येय आणि शारीरिक क्षमतेवर अवलंबून

डॉ. पटेल यांच्या मते, या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे तुमच्या फिटनेसच्या ध्येयांवर अवलंबून आहे. ते सांगतात की, “धावणे ही एक ‘हाय-इंटेंसिटी’ (उच्च तीव्रतेची) क्रिया आहे. याचा अर्थ असा की, धावण्यामुळे कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न केल्या जातात. मात्र यामुळे हृदय, फुफ्फुसे आणि स्नायूंवर अधिक ताण येतो. याउलट, चालणे हा एक ‘लो-इम्पॅक्ट’ (कमी प्रभावाचा) व्यायाम आहे, जो सांध्यांसाठी सुरक्षित असून दीर्घकाळ सातत्य राखण्यासाठी अत्यंत सोपा आहे.”

धावणे नेहमीच सरस असते का?

तज्ज्ञांचं असं मत अजिबात नाही. ‘चांगले’ या शब्दाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. डॉ. पटेल स्पष्ट करतात की, “वजन कमी करण्यासाठी किंवा तग धरण्याची क्षमता (endurance) झपाट्याने वाढवण्यासाठी धावणे अधिक प्रभावी ठरू शकते. मात्र, यामध्ये दुखापतीची शक्यता जास्त असते. प्रामुख्याने नवख्या लोकांसाठी किंवा ज्यांना आधीच सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी. ५ किमी चालण्यासाठी वेळ जास्त लागत असला तरी, ते सुरक्षित आणि शाश्वत आहे. वृद्ध व्यक्ती किंवा दुखापतीतून सावरणाऱ्या लोकांसाठी चालणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.”

Award Banner

सांध्यांचे आरोग्य आणि दीर्घकालीन परिणाम

धावताना जमिनीवर जोरात पाय आदळल्यामुळे गुडघे, कंबर आणि घोट्यांवर ताण येतो. जर तुम्ही कडक पृष्ठभागावर धावत असाल किंवा तुमची धावण्याची पद्धत चुकीची असेल, तर सांधेदुखीचा धोका वाढतो. “ज्या व्यक्तींचे वजन जास्त आहे किंवा ज्यांना आधीच पाठ आणि गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ‘ब्रिस्क वॉकिंग’ (वेगाने चालणे) हा अधिक व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे,” असे डॉ. पटेल यांनी नमूद केले.

५ किमी चालण्याने फिटनेस सुधारतो का?

नियमितपणे ५ किमी वेगाने चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीराची ऊर्जा वाढते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘सातत्य’. योग्य शारीरिक स्थिती (posture) राखून आणि वेग कायम ठेवून चालल्यास, धावण्याइतकेच आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

धावायचं की चालायचं, निवड कशी करावी?

  • सामान्य आरोग्य आणि सुरक्षितता: चालणे उत्तम आहे.
  • कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न करण्यासाठी: धावणे फायदेशीर आहे (जर सांध्यांचा त्रास नसेल तर).

धावण्याची सुरुवात हळूहळू करावी. अनेक लोकांसाठी चालणे आणि धावणे यांचे मिश्रण (Interval training) सर्वात प्रभावी ठरते असा सल्ला तज्ज्ञ देतात.