Tips for riding a bike in the rainy season: पावसाळ्यात बाईक चालवताना विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कडक उन्हानंतर येणारा पावसाळा सुखावह असला, तरी दुचाकी चालकांसाठी तो आव्हानात्मक आणि कधीकधी धोकादायक ठरू शकतो. शक्यतो मुसळधार पावसात बाईक चालवणे टाळावे, परंतु काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडावेच लागले, तर खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
पाऊस सुरू झाल्यावर सुरुवातीला रस्ता जास्त निसरडा होतो, कारण रस्त्यावरील तेल आणि धूळ पाण्यासोबत मिसळतात. अशा वेळी थोडासा निष्काळजीपणाही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो.
पावसात बाईक चालवताना सुरक्षित राहण्याचा सोपा फॉर्म्युला काय?
अचानक ब्रेक लावण्याची चूक करू नका
- ओल्या किंवा चिखलमय रस्त्यावर टायरची रस्त्यावरील पकड (Grip) खूप कमकुवत होते.
- अशा परिस्थितीत जर तुम्ही अचानक जोरात ब्रेक लावला, तर बाईक घसरण्याची शक्यता असते.
- म्हणूनच, नेहमी दोन्ही ब्रेक हळुवारपणे एकत्र दाबा आणि पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर (दुप्पट अंतर) ठेवा.
वळणांवर वेग कमी करा आणि बाईक सरळ ठेवा
- सामान्य दिवसांत अनेकदा लोक वळणावर बाईक थोडी झुकवून वळवतात, परंतु पावसाळ्यात असे करणे खूप धोकादायक ठरू शकते.
- कोणत्याही वळणावर पोहोचण्यापूर्वीच गाडीचा वेग कमी करा. वळणावर बाईक जास्त न झुकवता, नियंत्रण सांभाळत आरामात वळवा.
पाण्याने भरलेल्या खड्ड्यांपासून दूर राहा
- रस्त्यावर साचलेल्या पाण्याखाली असलेला खड्डा किंवा उघडे मॅनहोल किती खोल आहे, याचा अंदाज लावणे कठीण असते.
- अशा पाण्यातून जास्त वेगाने बाईक नेल्यास संतुलन बिघडून मोठा अपघात होऊ शकतो.
- म्हणूनच, साचलेल्या पाण्यातून गाडी नेण्याऐवजी, नेहमी अंदाज घेत सुरक्षित आणि कोरड्या मार्गाने बाईक पुढे न्या.
पांढऱ्या पट्ट्यांवर आणि मॅनहोलवर टायर चढवू नका
- रस्त्यावरील पांढऱ्या किंवा पिवळ्या पट्ट्या (लेन मार्किंग) आणि लोखंडी गटारांची (मॅनहोलची) झाकणे पाणी पडल्यानंतर कमालीची गुळगुळीत आणि निसरडी होतात.
- अशा भागावरून गाडी जाताना अचानक ब्रेक लावल्यास किंवा गाडी वळवल्यास टायर लगेच घसरतात. त्यामुळे बाईक चालवताना गाडीचे टायर या पट्ट्यांवर किंवा लोखंडी झाकणांवर येणार नाहीत याची दक्षता घ्या.
