Saba Azad Cyclospora Infection: बॉलीवूड अभिनेता हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद नुकतीच एका गंभीर आजारामुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर उघड केले की, तिला सायक्लोस्पोरा (Cyclospora cayetanensis) नावाच्या परजीवी संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. या संसर्गामुळे फक्त दोन आठवड्यांत तिने चार किलो वजन गमावले आणि चालण्यासाठी आवश्यक ताकदही नाहीशी झाली.

सबा आझादने स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करीत लिहिले, “माझ्यासाठी आयुष्यातील हे सर्वांत वाईट १४ दिवस होते. मी घरगुती जेवण खाणारी, पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवणारी व्यक्ती असताना हा संसर्ग अचानक झाला. मी दोन आठवड्यांत चार किलो वजन गमावले आणि साधी हालचाल करणेही मला कठीण झाले. एका दिवशी मी दोन वेळा व्यायाम करत होते, पुल-अप्स करत होते, वजन उचलत होते आणि दुसऱ्या दिवशी माझे शरीर इतके थकलेले होते की, पिन उचलणेही कठीण झाले.”

सबा आझादने इथेच सावधगिरीची सूचना दिली : “कृपया तुमच्या पोटाची काळजी घ्या. सलाडची पाने, भाज्या नीट धुऊन घ्या. कारण- ही कृती कधी कधी खरंच आयुष्य वाचवते.

Award Banner

सायक्लोस्पोरा म्हणजे काय?

सायक्लोस्पोरा (Cyclospora cayetanensis) हा एक लहानसा परजीवी आहे, जो आंत्रसंस्थेमध्ये संसर्ग (cyclosporiasis) निर्माण करतो. डॉ. अमित रस्तोगी (अध्यक्ष, लिव्हर ट्रान्सप्लांट अॅण्ड एचपीबी सर्जरी, पीएसआरआय हॉस्पिटल) म्हणाले, “हा परजीवी मुख्यतः अस्वच्छ अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो, विशेषतः धुऊन न घेतलेली कच्ची फळे आणि भाज्या. जेव्हा कोणीतरी अशा संसर्गित अन्नाचे सेवन करते, तेव्हा हा परजीवी लहान आतड्यामध्ये प्रवेश करून संसर्ग निर्माण करतो. त्यामुळे आतड्यामध्ये जळजळ, सूज आणि दुखणे निर्माण होऊ शकते.”

लक्षणे:

  • सतत पाण्यासारखा डिस्चार्ज
  • पोटदुखी, पोट फुगणे, मळमळ
  • भूक न लागणे, थकवा
  • सौम्य ताप
  • काही वेळा वजन कमी होणे

“संसर्ग साधारणपणे एक आठवड्यांनंतर दिसू लागतो; पण प्रतिकारशक्तीनुसार दोन दिवसांपासून दोन आठवड्यांपर्यंत लक्षणे दिसू शकतात,” असे डॉ. रस्तोगी स्पष्ट करतात.

डाॅ. किरण डी. शिंदे (पाटील), FIMGE RUBY HALL CLINIC, वानौरी, सांगतात, “सायक्लोस्पोरा मनुष्यापासून मनुष्यामध्ये थेट पसरत नाही. पर्यावरणात (माती किंवा पाण्यात) काही वेळ लागतो. म्हणून मुख्य प्रसार मार्ग म्हणजे संसर्गित अन्न आणि पाणी, विशेषतः कच्ची फळे व भाज्या. उष्ण आणि दमट हवामानात जोपर्यंत परजीवी पूर्णपणे विकसित होत नाही, तोपर्यंत संसर्ग होऊ शकत नाही.”

सायक्लोस्पोराचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे?

न्यूट्रिशनिस्ट सुख सबिया म्हणतात, “दररोजच्या अन्नसवयी महत्त्वाच्या आहेत. काही सोपे उपाय अंगीकारल्यास हा संसर्ग टाळता येतो.”

  • अन्न हाताळण्यापूर्वी हात नीट धुवा
  • फळे व भाज्या स्वच्छ पाण्याखाली धुवा
  • कडक फळे/भाज्यांसाठी ब्रश वापरा (काकडी, खरबूजा)
  • खराब भाग कापून टाका
  • किचनमध्ये सातत्याने स्वच्छता ठेवा
  • स्वयंपाक करून खाणे हा सर्वांत सुरक्षित उपाय
  • सबा आझादचा खास उपाय – बेकिंग सोडा + व्हेजी वॉश


सायक्लोस्पोरा हा अत्यंत चिकट परजीवी असून, तो भाज्यांची पाने व फळांवर चिकटून राहतो. त्यामुळे भाज्या व फळे फक्त पाण्यात भिजवून वापरायला घेणे पुरेसे नाही

फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी काय करावे?

एक लिटर पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून, फळे आणि भाज्या १२–१५ मिनिटे भिजवून ठेवा. नंतर त्या स्वच्छ पाण्याखाली नीट धुवा किंवा स्क्रब करा.

सबा आझादच्या अनुभवातून एकच गोष्ट स्पष्ट होते – स्वच्छता आणि योग्य धोरणाशिवाय कच्च्या भाज्या व फळे खाणे धोकादायक ठरू शकते. बेकिंग सोडा + व्हेजी वॉशसह धुणे, स्क्रब करणे, तसेच हात स्वच्छ धुण्याची सवय ठेवणे या सगळ्या सावधगिरीमुळे संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.