Sabudana or Bhagar during fasting: उपवास म्हटलं की, अनेकांच्या घरात साबुदाणा आणि भगर हे दोन पदार्थ आवर्जून बनवले जातात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असो किंवा भगरची खिचडी, उपवासाच्या ताटात या पदार्थांना विशेष स्थान असतं. मात्र, आरोग्याच्या दृष्टीनं साबुदाणा चांगला की भगर, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काहींच्या मते, साबुदाणा खाल्ल्यानं शरीराला झटपट ऊर्जा मिळते; तर काही जण भगर हा अधिक पौष्टिक पर्याय असल्याचं मानतात. प्रत्यक्षात या दोन्ही पदार्थांच्या पोषणमूल्यांमध्ये फरक आहे. साबुदाण्यामध्ये प्रामुख्याने कर्बोदके असतात; तर भगर म्हणजेच वरईमध्ये कर्बोदकांसोबत प्रथिने, तंतू आणि काही महत्त्वाची खनिजेही मिळतात. त्यामुळे उपवासात या दोन्हींपैकी कोणता पदार्थ खाणं अधिक फायदेशीर ठरू शकतं? वजन नियंत्रण, रक्तातील साखर आणि पचनाच्या दृष्टीने कोणता पर्याय चांगला आहे? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

साबुदाणा की भगर काय खाणं अधिक फायदेशीर?

उपवास म्हटलं की, अनेकांच्या ताटात साबुदाणा किंवा भगर हे पदार्थ हमखास असतात. मात्र, साबुदाणा खाणं चांगलं की भगर खाणं अधिक फायदेशीर? यावर अनेकदा चर्चा होते. काही जण साबुदाण्याला पसंती देतात; तर काहींच्या मते, भगर हा अधिक पौष्टिक पर्याय आहे. पोषणमूल्यांच्या दृष्टीने पाहिल्यास या दोन्ही पदार्थांमध्ये महत्त्वाचा फरक आहे. साबुदाण्यामध्ये प्रामुख्याने स्टार्च आणि कर्बोदके असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते; मात्र, त्यात प्रथिने आणि तंतूंचे प्रमाण कमी असते. त्याउलट भगर म्हणजेच वरईमध्ये कर्बोदकांसोबत प्रथिने, तंतू आणि काही खनिजेही मिळतात. त्यामुळे पोषणमूल्यांच्या बाबतीत भगरला तुलनेनं अधिक महत्त्व दिलं जातं. विशेषतः पोट जास्त वेळ भरलेलं राहण्यासाठी आणि संतुलित आहारासाठी भगर हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, साबुदाणा पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. साबुदाणा आणि भगर यांपैकी कोणता पदार्थ खायचा, हे ठरवताना त्याचं प्रमाण, बनवण्याची पद्धत आणि व्यक्तीची आरोग्यस्थिती लक्षात घेणं आवश्यक आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दोन्ही पदार्थांमधील कर्बोदकांचं प्रमाण आणि ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेवर होणारा परिणाम विचारात घ्यावा.

पोषणमूल्यांच्या दृष्टीनं दोघांमधील मुख्य फरक असा आहे की, साबुदाणा प्रामुख्यानं ऊर्जा देतो, तर भगर ऊर्जा देण्यासोबतच काही प्रमाणात प्रथिनं, तंतू आणि खनिजंही पुरवतो. त्यामुळे उपवासात अधिक पोषक पर्याय निवडायचा असल्यास भगरला प्राधान्य देता येतं.

‘या’ पदार्थांचाही करा समावेश

उपवासात साबुदाणा आणि भगर यांसोबतच इतर पौष्टिक पदार्थांचाही आहारात समावेश करता येतो. दूध, दही व पनीर यांसारख्या पदार्थांमधून शरीराला प्रथिनं आणि कॅल्शियम हे घटक मिळतात. शेंगदाणे, बदाम व अक्रोड यांमधून चांगल्या प्रकारची चरबी, प्रथिनं आणि काही खनिजं मिळतात. तसेच, केळी, सफरचंद, पपई व डाळिंब यांसारखी फळं खाल्ल्यानं जीवनसत्त्वं, खनिजं आणि तंतू मिळण्यास मदत होते. उपवासात रताळे, उकडलेले बटाटे व राजगिऱ्याचे पदार्थही खाता येतात.