How Small Sleep Affects Your Health : ‘सद्गुरू’ म्हणून लोकप्रिय ‘ईशा फाउंडेशन’चे संस्थापक जग्गी वासुदेव यांनी नुकतीच अभिनेत्री आलिया भट्टशी संवाद साधला. या संभाषणादरम्यान त्यांनी आपल्या झोपेच्या सवयींविषयी माहिती दिली. गेली जवळपास २७ ते २८ वर्षे सद्गुरू केवळ अडीच ते तीन तासांची झोप घ्यायचे. पण, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्याला दोनदा दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दोनदा तडा गेला आणि त्यांना तातडीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यानंतर, केवळ चार महिन्यांच्या कालावधीसाठी डॉक्टरांनी झोप येण्यासाठीची अनेक औषधे (sedatives) दिली. त्यामुळे तेव्हापासून ते ४ किंवा ४.५ तास झोपतात. तर आलियाने त्याचं बोलणं ऐकून थोडं हसत म्हटलं, “बस एवढंच?” त्यावर सद्गुरूंनी उत्तर दिलं, “काय म्हणतेस… एवढंच?” हे ऐकून आलिया थोडी लाजत म्हणाली, “मी तर नऊ तास झोपते.”
मग हे ऐकून सद्गुरू म्हणाले की, “मी स्वतःला कधीच ताणून घेत नाही. त्यामुळेच मला ‘तणावमुक्ती’ची (unwind) गरज भासत नाही. ही जगातील एक गंभीर समस्या आहे. एखादी गोळी, औषध किंवा तत्सम काही घेतल्याशिवाय लोकांना झोपच लागत नाही. याचे एक कारण म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराचा पुरेसा वापर करत नाही. मी जेव्हा कधी, मग वेळ कोणतीही असो, झोपायला जातो; तेव्हा मी नुसता झोपत नाही, तर मी थेट ‘गाढ झोपेच्या’ (dead sleep) अवस्थेत जातो. तुमच्या शरीराचा आणि मेंदूचा जितका अधिक वापर केला जातो, तितकीच त्यांची कार्यक्षमता सुधारते.
हा संवाद ऐकून द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली…
वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शीतल गोयल म्हणाल्या की, बहुतेक प्रौढांना मेंदू आणि शरीराच्या उत्तम कार्यासाठी दररोज रात्री ७ ते ९ तास झोप घेण्याची सर्वसाधारण शिफारस केली जाते. काही लोकांना कमी झोपेतही ठीक वाटू शकतं. कारण त्यांच्या शरीरात जिन्स (genetic factors) वेगळ्या प्रकारे काम करतात. नियमितपणे फक्त ४ ते ५ तास झोप घेतल्याने कालांतराने स्मरणशक्ती, मनःस्थिती, प्रतिकारशक्ती आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काय सहन होते आणि जैविकदृष्ट्या काय पुरेसे आहे, यातील फरक जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
लोकांना अनेकदा वाटते की, कमी तास झोपून शरीराशी त्यांनी जुळवून घेतले आहे. पण, अभ्यास वेगळंच काहीतरी दाखवून जातो. दीर्घकाळ झोप कमी मिळाल्यास, व्यक्तीला झोप येत नसली तरीही, एकाग्रता, निर्णयक्षमता आणि प्रतिक्रिया देण्याची गती मंदावते आणि मेंदू स्वतःचा थकवा ओळखण्यात चुकतो. त्यामुळे, एखाद्याला कमी झोपण्याच्या झोपण्याच्या सवयीशी जुळवून घेतल्यासारखे वाटते. पण, याचा अर्थ असा होत नाही की, शरीर सर्वोत्तम कार्य करत आहे.
मेंदूला झालेल्या दुखापती किंवा शस्त्रक्रियांमुळे झोपेच्या पद्धतीत बदल होऊ शकतो का?
डॉक्टर गोयल म्हणतात होऊ शकतो. झोप आणि जागण्याच्या चक्रांचे नियमन करण्यात मेंदूची मध्यवर्ती भूमिका असते. आघात, शस्त्रक्रिया किंवा शामक औषधांसारखी औषधेसुद्धा झोपेच्या पद्धतीत तात्पुरता किंवा कधीकधी कायमस्वरूपी बदल घडवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, रुग्ण जास्त झोपू शकतात, तर काहींना कमी झोप लागू शकते किंवा त्यांची झोप खंडित होऊ शकते. पण, हे बदल प्रत्येक व्यक्तीनुसार मोठ्या प्रमाणात बदलतात आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच या बदलांवर लक्ष ठेवले पाहिजे.
शारीरिक हालचालींमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. पण, त्यामुळे पुरेशा झोपेची गरज नाहीशी होत नाही. नियमित व्यायामामुळे लोकांना लवकर झोप लागण्यास आणि गाढ, आरामदायी झोपेच्या अवस्था अनुभवण्यास मदत होऊ शकते. मेंदू आठवणी व्यवस्थित साठवतो, मेंदूमधील घाण/विषारी पदार्थ साफ करतात, शरीरातील हार्मोन्स (जसे की ऊर्जा, भूक, मूड नियंत्रित करणारे) संतुलित ठेवतात यांसारखी आवश्यक कार्ये पार पाडण्यासाठी शरीराला एकूण पुरेशा झोपेच्या वेळेची आवश्यकता असते.
सातत्याने खूपच कमी वेळ झोपल्याने काय धोके जाणवतात?
दीर्घकाळापर्यंत झोप अपुरी राहण्याचा संबंध उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, नैराश्य आणि अगदी मेंदूच्या विकारांच्या वाढत्या धोक्यांशी जोडलेला आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, तसेच एकूण उत्पादकता आणि भावनिक सामर्थ्यही कमी होऊ शकते. झोप ही काही गोष्ट नाही, तर शरीराची मूलभूत गरज आहे. प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची सवय वेगळी असू शकते. पण, सतत कमी झोप घेणं दीर्घकाळासाठी चांगलं नसतं.मेंदूचे कार्य आणि एकूणच शारीरिक-मानसिक स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी, झोपेचा दर्जा आणि कालावधी या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
