अलीकडेच करोनाकाळात शहरांतील गर्दीच्या पर्यटनस्थळी जाणे पर्यटक टाळत असून ग्रामीण, दुर्गम भागात पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मात्र सर्वानाच ‘ऑफ रोडिंग’साठी असलेली कार खरेदी करणे किवा ती घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यात सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाळी पर्यटनासाठी दुर्गम, डोंगरी भागात पर्यटक जात आहेत. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या पण या डोंगर उतारांवरील रस्त्यांवर प्रवासासाठी कोणत्या कार सुरक्षित आहेत. या ठिकाणी जाताना आपल्या कारमध्ये कोणत्या सुविधा असाव्यात तसेच या भागात नेहमी प्रवास करणोर व राहणाऱ्यांनी कार खरेदी करताना कोणत्या सुविधांना जास्त महत्त्व दिले पाहिजे याविषयीची उपयुक्त माहिती..

डोंगर उतारावरील रस्त्यांची रचना

ही शहरांतील रस्त्यांच्या तुलनेत वेगळी असते. शहरांतील रस्ते सरळ, खड्डे नसलेली व प्रशस्त असे असतात. मात्र दुर्गम डोंगरी भागांतील रस्ते मुळात खराब, निमुळते, चढ-उताराचे व तीव्र वळणे असलेले असतात. एकीकडे दरी तर दुसरीकडे डोंगर अशी धोकादायक परिस्थिती असल्याने सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारवर चालकांचे नियंत्रण सुटता कामा नये. म्हणजे कारचे सुकाणू चक्र हे चालकाच्या अपेक्षेनुसार हे कडक असले पाहिजे. इंचभरही ते गरजेपेक्षा जास्त फिरता कामा नये. हलके सुकाणू चक्र असलेली कार आशा भागात जाताना घेऊन जाणे टाळले पाहिजे. शहरी भागात कार चालविताना आपण हलके सुकाणू असलेल्या कारला पसंती देत असतो, पण डोंगर उतारांवरील रस्त्यांवर असे सुकाणू असलेले वाहन धोकादायक ठरू शकते.

पावसाळ्यात या रस्त्यांवर दरडी कोसळणे, मोठे खड्डे असणे, पाणी वाहत येणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे यासाठी आपल्या कारचे जमिनीपासूनचे अंतर हे जास्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यांवरील दगड व खड्डय़ांपासून गाडीला हानी पोचत नाही. तर चिखल

असलेल्या रस्त्यांत गाडी फसत नाही. प्रवासात येणाऱ्या या अडथळ्यांतून सुरक्षित प्रवास होणे गरजेचे आहे.

कार खरेदी करताना खरेदीदार आरामदायी प्रवास डोळ्यासमोर ठेवून प्राधान्य दिले जाते. मात्र डोंगर उतारांवरील प्रवासात एक मजबूत रचना असलेली कार असणे अपेक्षित आहे. कारवरील चालकाचा ताबा सुटता कामा नये. कार हाताळण्यास सोपी व चालविण्यास योग्य असलेल्या कारची निवड करता आली पाहिजे.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कारचे इंजिन. इंजिन हे शक्तिशाली व जास्तीत जास्त न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करणारे असले पाहिजे. कार चढण रस्त्यांवर चालताना सहज चढून जाऊ शकली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त टॉर्क निर्माण कार निवडावी.

या रस्त्यांवर हिवाळा, पावसाळा या काळात नेहमीच धुक्याची चादर पसरलली असते. त्यामुळे अगदी चालकाला आपल्या वाहनासमोरील रस्ताही नीट दिसत नाही. त्यामुळे कारमध्ये फॉगलॅम्प असायलाच हवा आणि ते कारच्या खालच्या भागात हवा.

या रस्त्यांवर रात्रीचा प्रवास हा धोकादायक ठरू शकतो. शहरी रस्त्यांच्या रचनेपेक्षा हे रस्ते तीव्र वळणाचे असतात. त्यामुळे समोरून आलेले वाहन चालकाला दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे आपल्या कारमधील प्रकाशयोजना ही महत्त्वाची आहे. शहरांतील रस्त्यांचा विचार करून कारमध्ये अलीकडे प्रोजेक्टर हेडलॅम्प वापरलेले असतात. यात सर्व दिव्यांचा प्रकाश समोरच्या दिशेने असतो. मात्र डोंगर उतारांवर वाहन चालविताना समोरील प्रकाशाबरोबर वाहनाच्या दोन्ही बाजूलाही प्रकाशव्यवस्थेची गरज लागते. त्यामुळे कारच्या दोन्ही बाजूला प्रकाशव्यवस्था असलेली कारचा पर्याय निवडणे गरजेचे आहे. यासाठी रिफ्लेक्टर दिवे असलेली कार निवडावी.

परवडणारे पर्याय

टियागो/ सॅन्ट्रो

जास्तीत जास्त सुविधा असलेली पण सहा लाखांपेक्षा कमी बजेट असेल तर बाजारात अनेक पर्याय आहेत, मात्र यात दोन कारचा पर्याय निवडता येऊ शकतो. एक टाटाची टियागो आणि ह्युंदाईची सॅन्ट्रो. या दोन्ही कारवर चालकांचे चांगले नियंत्रण राहते तसेच जमिनीपासूनचे अंतरही चांगले आहे. कार टॉर्कही बऱ्यापैकी निर्माण करते.

फोर्ड फ्रीस्टाइल

फोर्ड फ्रीस्टाइल ही सहा ते १० लाखांच्या किंमतीत व डोंगर उतारावरील रस्त्यांची गरज पाहता एक चांगला पर्याय आहे. या कारमध्ये १.५ लिटर डीजल इंजन दिले असून ९९ बीएचपीची शक्ती आणि २१५ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. कार २४.४ पर्यंत माइलेज देत असून १५ इंचाची चाके दिली आहेत. आणि महत्त्वाची म्हणजे चांगली प्रकाशव्यवस्था असून सहा एअरबॅग दिलेल्या आहेत. चालकाबरोबर सहप्रवाशांची सुरक्षाही ही कार घेते.

बोलेरो

१५ लाखांच्या आत बजेट आहे व सात आसनी कार हवी आहे तर बोलेरो हा ग्रामीण, दुर्गम भागासाठी चांगला पर्याय आहे. भरपूर जागा, डोंगर उतारावर हाताळायला योग्य व शक्तिशाली इंजिन आहे. त्यामुळे बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असताना या कारला ग्रामीण भागात चांगली मागणी आहे.

नेक्सन

सध्या वाहन खरेदीदार एसयूव्ही खरेदीला पसंती देत आहेत. जर तुम्ही डोंगर उतारांवरील प्रवास समोर ठेवून एक लहान आकारातील एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टाटाची नेक्सन हा एक चांगला पर्याय असू शकतो. ही कार मजबूत कार असून सुकाणू चक्र चालकांच्या इशाऱ्यावर चालते. खराब रस्त्यांवर चालविण्यासाठी योग्य आणि जमिनीपासूनचे अंतरही चांगले आहे.

इको स्पोर्ट

जर तुमचे बजेट १५ लाखांपर्यंत असेल लहान आकारातील एसयूव्हीमध्ये इको स्पोर्ट हा एक चांगला पर्याय आहे. ही कार पेट्रोल व डिझेल या दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असून चांगला टॉर्क निर्माण करते. चालवायला सहज व सुंदर अनुभव देते. याच बजेटमध्ये महेंद्राची ‘एक्सयूव्ही ३००’ हाही एक चांगला पर्याय आहे.