Salman Khan Health: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या तब्येतीबाबत आणि बदललेल्या लूकबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. नुकत्याच एका कार्यक्रमातील व्हिडिओमध्ये सलमान आधीपेक्षा खूपच सडपातळ दिसला. त्याचं वजन कमी झालेलं पाहून अनेक चाहत्यांनी त्यांच्या तब्येतीची चिंता व्यक्त केली.
आता सलमान खानने स्वतःच या बदलामागचं कारण सांगितलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने जाणूनबुजून १६ किलो वजन कमी केलं असून हा बदल त्याच्या फिटनेस प्रवासाचा एक भाग आहे.
सलमान खानने १६ किलो वजन कमी केलं
सलमान खानने त्याचा भाऊ सोहेल खान याच्सोयात गप्पा मारताना वजन कमी करण्याबाबत मोकळेपणाने सांगितलं. या दोघांमध्ये फिटनेस आणि वजनावर चर्चा झाली. सोहेलने सांगितलं की, त्याने १२ किलो वजन कमी केलं आहे. त्यावर सलमाननेही आपली फिटनेस अपडेट देत सांगितलं की, त्याने आतापर्यंत १६ किलो वजन कमी केलं आहे.
गप्पांदरम्यान सलमान म्हणाला, “I am down 16 kg.” म्हणजेच त्याने आतापर्यंत १६ किलो वजन कमी केलं आहे. सलमानच्या या खुलाशानंतर गेल्या काही दिवसांपासून तो अचानक इतका बारीक का दिसत आहे, याचं उत्तर चाहत्यांनाही मिळालं.
सलमानने असंही सांगितलं की, त्याचा फिटनेस प्रवास अजून संपलेला नाही. ठरवलेल्या वजनापर्यंत पोहोचण्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे. आगामी चित्रपट आणि इतर कामांच्या दृष्टीनेही तो फिटनेसवर विशेष लक्ष देत आहे.
वजन कमी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
नवी दिल्लीतील साकेत येथे असलेल्या ‘न्यूट्री ॲक्टिव्हानिया‘च्या संस्थापक आहारतज्ज्ञ अवनी कौल यांच्या मते, ६० वर्षांनंतर वजन कमी करण्याची पद्धत तरुणपणासारखी नसावी. या वयात अनेक जण वजन कमी करताना फक्त वजनकाट्यावर दिसणाऱ्या आकड्याकडे लक्ष देतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, हा योग्य दृष्टिकोन नाही.
वय वाढल्यानंतर फक्त वजन कमी करणं हे उद्दिष्ट नसावं. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करताना स्नायू टिकवून ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं.
वय वाढत गेल्यावर शरीराचा मेटाबॉलिझम नैसर्गिकरित्या मंदावतो. अशावेळी पटकन वजन कमी करण्यासाठी खूप कमी कॅलरीचं अन्न खाल्ल्यास नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चरबीसोबत स्नायूही कमी होऊ शकतात. स्नायू कमी झाल्यास शरीराची ताकद घटते, मेटाबॉलिझम आणखी मंदावतो आणि पडण्याचा किंवा हाडं मोडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ६० वर्षांनंतर शरीरातील चरबी कमी करताना स्नायू टिकवून ठेवण्यावर भर देणं गरजेचं आहे.
स्ट्रेंथ ट्रेनिंग का महत्त्वाची आहे?
निरोगी वृद्धत्वासाठी नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. विशेषतः रेझिस्टन्स किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा आपल्या क्षमतेनुसार रेझिस्टन्स व्यायाम करावा.
यासाठी वेट लिफ्टिंग, रेझिस्टन्स बँड, बॉडीवेट एक्सरसाइज किंवा जिममधील मशीनच्या मदतीने केले जाणारे व्यायाम करता येतात. ६,००० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातही योग्य आहारासोबत रेझिस्टन्स ट्रेनिंग केल्याने स्नायूंची ताकद, स्नायूंचं प्रमाण आणि शारीरिक क्षमता सुधारते, असं आढळलं आहे. याशिवाय मध्यम गतीने कार्डिओ व्यायाम केल्यास हृदय निरोगी राहण्यास आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते.
आहाराकडेही लक्ष द्या
६० वर्षांनंतर आहाराचं महत्त्व आणखी वाढतं. वाढत्या वयानुसार स्नायू कमी होण्याच्या समस्येला सार्कोपेनिया म्हणतात. यामुळे मेटाबॉलिझम मंदावू शकतो.
अशावेळी खूप कमी खाणं किंवा अतिशय कडक डाएट करणं योग्य नाही. त्यामुळे स्नायू आणखी वेगाने कमी होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांना साधारणपणे शरीराच्या प्रत्येक किलो वजनामागे दररोज १.० ते १.२ ग्रॅम प्रोटीनची गरज असू शकते. मात्र एखादा आजार असल्यास प्रोटीनचं प्रमाण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावं.
आहारात अंडी, मासे, चिकन, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, कडधान्यं आणि कमी चरबीयुक्त मांस यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ घ्यावेत. तसेच फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, आरोग्यदायी फॅट्स यांचा समावेश करावा आणि शरीरात पुरेसं पाणी राहील याचीही काळजी घ्यावी.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
