Samantha Ruth Prabhu Fitness Secret: चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आपल्या अभिनयाइतकीच फिटनेस आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठीही ओळखली जाते. तिची सडपातळ शरीरयष्टी, चमकदार त्वचा आणि उत्साही व्यक्तिमत्त्व पाहून अनेकांना ती नेमकं काय खाते, असा प्रश्न पडतो. अनेकांना वाटतं की, अभिनेत्री फिट राहण्यासाठी महागडे पदार्थ, कठोर डाएट किंवा उपाशी राहण्याचा मार्ग स्वीकारतात. मात्र, समांथा रुथ प्रभूचा फिटनेस मंत्र याच्या अगदी उलट आहे.
तिच्या दैनंदिन आहारात असे दोन अगदी साधे आणि प्रत्येक भारतीय घरात सहज मिळणारे पदार्थ असतात, ज्यामुळे ती स्वतःला स्वस्थ, सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवते. विशेष म्हणजे हे पदार्थ स्वस्त असून, घरच्या घरी सहज बनवता येतात.
महागड्या डाएटपेक्षा घरच्या जेवणावर विश्वास
समांथा रुथ प्रभू अनेकदा सांगते की, फिट राहण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवण्याची किंवा कठोर डाएट करण्याची गरज नसते. शरीराला आवश्यक पोषण मिळेल, असा संतुलित आणि घरगुती आहार अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे ती शक्यतो घरचेच अन्न खाते आणि नियमित व्यायामावर भर देते.
तिच्या रोजच्या आहारात डाळ आणि भात हे दोन पदार्थ आवर्जून असतात. डाळीत भरपूर प्रथिने आणि तंतुमय घटक असतात; तर भात शरीराला आवश्यक ऊर्जा देतो. त्याशिवाय ती इडलीचाही नियमित आहारात समावेश करते. इडली हा हलका, सहज पचणारा आणि पौष्टिक पदार्थ मानला जातो.
व्यायामात कधीच खंड नाही
समांथा रुथ प्रभूचा फिटनेस केवळ आहारामुळे नाही, तर तिच्या नियमित व्यायामामुळेही टिकून आहे. ती कोणत्याही परिस्थितीत व्यायाम चुकवत नाही. जिममध्ये जाणे शक्य नसले तरी ती घरीच व्यायाम करते.
ती आठवड्यातील चार ते पाच दिवस वजनासह व्यायाम करते. त्यामध्ये डेडलिफ्ट, स्क्वॅट, हिप थ्रस्ट, बेंच प्रेस, डंबेल कर्ल व ट्रायसेप्स एक्स्टेन्शन यांसारख्या व्यायामांचा समावेश असतो. त्यामुळे तिचे स्नायू मजबूत राहतात आणि शरीर सुडौल दिसते.
योगामुळे शरीर लवचिक आणि मन शांत
फक्त जिमपुरतेच मर्यादित न राहता, समांथा रुथ प्रभू पॉवर योग आणि एरियल योग यांचाही सराव करते. या योगप्रकारांमुळे शरीर लवचिक राहते, संतुलन सुधारते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तिच्या मते, आरोग्यदायी शरीरासाठी मन शांत असणेही तितकेच आवश्यक आहे.
सायकलिंग आणि नृत्याचीही आवड
मोकळा वेळ मिळाला की, समांथा रुथ प्रभू मित्रांसोबत सायकलिंगला जाते. सायकल चालवल्याने शरीर सक्रिय राहते आणि नैसर्गिक पद्धतीने उष्मांक खर्च होतात.
त्याशिवाय तिला नृत्याचीही विशेष आवड आहे. नृत्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि तंदुरुस्तीही टिकून राहते. त्यामुळे ती व्यायामासोबत आवडीच्या गोष्टींनाही वेळ देते.
प्रथिने आणि तंतुमय पदार्थांना प्राधान्य
समांथा सुका मेव्यातील पदार्थ ती नियमित खाते. व्यायामानंतर शरीराच्या गरजेनुसार प्रथिनयुक्त पेयाचाही ती समावेश करते.
विशेष म्हणजे ती दिवसभरात किती उष्मांक घेत आहे, यावरही लक्ष ठेवते. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढेच अन्न घेतले जाते आणि अतिरिक्त चरबी वाढण्याचा धोका कमी होतो.
फिटनेसचा खरा मंत्र
समांथा रुथ प्रभूच्या मते, निरोगी राहण्यासाठी महागडी जीवनशैली आवश्यक नसते. साधा, संतुलित आणि घरगुती आहार, नियमित व्यायाम, पुरेशी हालचाल आणि सातत्यपूर्ण दिनचर्या यांमुळेच दीर्घकाळ तंदुरुस्त राहता येते. त्यामुळे तिच्या फिटनेसचे रहस्य कोणत्याही महागड्या डाएटमध्ये नसून, प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असलेल्या साध्या सवयींमध्ये दडलेले आहे.
