Samantha Ruth Prabhu Share Post On Pregnancy Journal: अभिनेत्री Samantha Ruth Prabhu सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास टप्प्याचा आनंद घेत आहे. दिग्दर्शक Raj Nidimoru यांच्यासोबत पहिल्या बाळाची अपेक्षा असलेल्या समंथाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रेग्नन्सी जर्नलबाबतची एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने मनातील भावना व्यक्त करत लिहिले, “मी कधीच विचार केला नव्हता की, मी अशी असेन… कधीच नाही.” विशेष म्हणजे राज यांनीही ही पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पुन्हा शेअर केली. समंथाच्या या पोस्टनंतर प्रेग्नन्सी जर्नल म्हणजे नेमके काय आणि गर्भवती महिलांसाठी ते किती उपयुक्त ठरू शकते, याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

प्रेग्नन्सी जर्नल म्हणजे काय?

आजकाल अनेक होणाऱ्या मातांमध्ये प्रेग्नन्सी जर्नल लिहिण्याचा ट्रेंड वाढत आहे. अनेकांना वाटते की, हे फक्त बाळाच्या हालचाली, खाण्याच्या इच्छा, सोनोग्राफी रिपोर्ट किंवा प्रत्येक आठवड्यातील बदल नोंदवण्यासाठी असते. मात्र मानसोपचारतज्ज्ञ आणि रिलेशनशिप ब्रेकथ्रू कोच डेल्ना राजेश यांच्या मते, प्रेग्नन्सी जर्नल हे त्यापेक्षा खूप अधिक महत्त्वाचे साधन आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणा ही अनेक महिलांसाठी आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट असते. याच काळात त्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. अधिक संयमी होणे, रागावर नियंत्रण ठेवणे, नातेसंबंध मजबूत करणे, आरोग्याची काळजी घेणे किंवा मानसिक स्थैर्य वाढवणे अशा अनेक गोष्टींची सुरुवात याच काळात होते. या संपूर्ण प्रवासाचा साक्षीदार म्हणजे प्रेग्नन्सी जर्नल.

मन मोकळं करण्यासाठी सुरक्षित जागा

गर्भधारणेदरम्यान अनेक जुन्या आठवणी, भीती, ताण, पालकत्वाची चिंता, शरीरातील बदलांबद्दल अस्वस्थता किंवा करिअरबाबतचे प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, या भावना मनात दाबून ठेवण्याऐवजी जर्नलमध्ये लिहिल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. प्रत्येक भावना शब्दांत मांडल्याने स्वतःला समजून घेणे आणि त्या भावनांवर प्रक्रिया करणे अधिक सोपे होते.

नव्या पिढीतील पालक अधिक जागरूक

आजचे पालक पूर्वीच्या तुलनेत अधिक सजग आहेत. अनेक जण समुपदेशन घेतात, पॅरेंटिंग प्रोग्राममध्ये सहभागी होतात, भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य शिकतात आणि बालपणातील मानसिक जखमांवर काम करतात. तज्ज्ञ सांगतात की, मुलं केवळ शिकवलेल्या गोष्टींमधून नाही, तर घरातील भावनिक वातावरणातून अधिक शिकतात. त्यामुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची सुरुवात गर्भधारणेपासूनच होऊ शकते.

भविष्यातील आठवण

प्रेग्नन्सी जर्नलमध्ये फक्त आनंदाचे क्षणच नाही, तर कठीण वैद्यकीय तपासण्या, निद्रानाश, चिंता, अश्रू, प्रार्थना, कृतज्ञता आणि छोट्या-छोट्या विजयांच्याही नोंदी असतात. काही वर्षांनंतर हे जर्नल पुन्हा वाचताना त्या काळातील संघर्ष, धैर्य आणि मानसिक बळाची आठवण ताजी होते. त्यामुळे हे जर्नल केवळ आठवणींची वही राहत नाही, तर स्वतःच्या प्रवासाचा प्रेरणादायी दस्तऐवज बनते.

जोडीदाराचाही सहभाग महत्त्वाचा

तज्ज्ञांच्या मते, या प्रक्रियेत होणाऱ्या वडिलांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो. बाळासाठी पत्र लिहिणे, प्रत्येक तपासणीनंतरच्या भावना व्यक्त करणे किंवा भविष्यातील स्वप्नांची नोंद ठेवणे यामुळे बाळ जन्माला येण्यापूर्वीच कुटुंबातील भावनिक नातं अधिक दृढ होऊ शकतं.

परफेक्ट लिहिण्याची गरज नाही

प्रेग्नन्सी जर्नल लिहिताना सुंदर भाषा किंवा परिपूर्ण शब्दांची गरज नसते. महत्त्वाचं म्हणजे त्या क्षणातील खरी भावना प्रामाणिकपणे व्यक्त करणं. काही पानांवर आनंद असेल, काहींवर भीती, संभ्रम किंवा अश्रू असतील. पण प्रत्येक पान आयुष्यातील सर्वात सुंदर आणि परिवर्तन घडवणाऱ्या प्रवासाची मौल्यवान आठवण बनून राहतं.