Sarcoma Cancer Warning Signs: शरीरावर एखादी गाठ दिसली की, अनेक जण ती साधी सूज, चरबीची गाठ किंवा जुन्या दुखापतीचा परिणाम असेल, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र प्रत्येक गाठ निरुपद्रवी असतेच, असे नाही. काही वेळा ती दुर्मीळ, पण गंभीर स्वरूपाच्या सारकोमा कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. या कर्करोगाची सुरुवात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता होत असल्याने त्याला ‘सायलेंट कॅन्सर’ असेही म्हटले जाते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही संशयास्पद गाठीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

सारकोमा हा हाडे, स्नायू, चरबी, रक्तवाहिन्या, मज्जातंतू, तसेच शरीरातील संयोजी ऊतकांमध्ये निर्माण होणारा कर्करोग आहे. सुरुवातीला त्याची लक्षणे सामान्य सूज, स्नायूंचा ताण किंवा सिस्टसारखी वाटत असल्याने अनेक रुग्ण योग्य वेळी त्याबाबतची तपासणी करून घेत नाहीत. परिणामी हा आजार उशिरा लक्षात येतो आणि मग त्याबाबतचे उपचारही अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात.

कोलकाता येथील नारायणा आर. एन. टागोर रुग्णालयातील मस्क्युलोस्केलेटल ऑन्कोलॉजी विभागाचे तज्ज्ञ डॉ. निशीथ प्रवीणचंद्र गुप्ता सांगतात, “शरीरात निर्माण झालेली कोणतीही संशयास्पद गाठ स्वतःहून नाहीशी होईल, अशी अपेक्षा ठेवू नका. वेळेत तपासणी केल्यास कर्करोगाचे निदान लवकर होऊन उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात.”

भारतात किती प्रमाणात आढळतो?

सारकोमा हा एकच कर्करोग नसून, ७० हून अधिक प्रकारांच्या कर्करोगांचा समूह आहे. तज्ज्ञांच्या मते, सारकोमा हा दुर्मीळ कर्करोग असला तरी भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात त्याचे रुग्ण कमी नाहीत. अंदाजे प्रत्येक एक लाख लोकांमागे या दुर्धर विकाराचे एक ते दोन रुग्ण आढळतात. विशेष म्हणजे ० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये होणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी सुमारे तीन ते चार टक्के प्रकरणे सारकोमाची असतात.

अजिबात दुर्लक्षित न करण्याजोगी लक्षणे

सारकोमा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. त्यामुळे त्याची लक्षणेही वेगवेगळी असू शकतात. मात्र, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे सूचित करणारे काही संकेत खालीलप्रमाणे :

  • शरीरावर वेदनारहित गाठ तयार होणे.
  • गाठीचा आकार हळूहळू वाढत जाणे.
  • दीर्घकाळ सूज कायम राहणे.
  • कोणतीही दुखापत नसताना हाडांमध्ये सतत वेदना होणे.
  • त्वचेखाली खोलवर गाठ जाणवणे.
  • गोल्फ चेंडूएवढी किंवा त्यापेक्षा मोठी गाठ तयार होणे.

हा कर्करोग उशिरा का लक्षात येतो?

सारकोमाची सुरुवातीची लक्षणे सामान्य दुखापत, स्नायूंचा ताण, चरबीची गाठ किंवा सिस्ट यांसारखी वाटतात. त्यामुळे अनेक रुग्ण महिनोन महिने उपचार घेत नाहीत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करूनही योग्य निदान होत नाही. या विलंबामुळे कर्करोग शरीरात पसरत जाऊन व्याप्ती वाढवू शकतो आणि त्यामुळे नेमके उपचार करणे अधिक कठीण होण्याची शक्यता वाढते.

बायोप्सी का महत्त्वाची?

डॉ. निशीथ प्रवीणचंद्र गुप्ता सांगतात, “संशयास्पद गाठ कोणत्याही परिस्थितीत तपासणीशिवाय काढू नये. याबाबत सर्वप्रथम बायोप्सी करणे अत्यावश्यक असते. बायोप्सीमुळे ‘ती’ गाठ कर्करोगाची आहे की नाही, तसेच ती नेमक्या कोणत्या प्रकारची आहे, हे स्पष्ट होते. त्यानंतरच योग्य उपचारपद्धती निश्चित करता येते. तपासणी न करता गाठ काढल्यास पुढील उपचार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात.”

उपचारांमध्ये मोठी प्रगती

वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे सारकोमाच्या उपचारांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान, अचूक बायोप्सी आणि विविध तज्ज्ञांच्या संयुक्त उपचारपद्धतीमुळे रुग्णांना चांगले परिणाम मिळत आहेत.

या कर्करोगाच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, किरणोपचार व रसायनोपचार यांचा वापर केला जातो. काही रुग्णांमध्ये पूर्वीप्रमाणे हात किंवा पाय कापण्याची वेळ येत नाही. आधुनिक लिंब-सेव्हिंग शस्त्रक्रियेच्या मदतीने प्रभावित अवयव वाचवणेही अनेक प्रकरणांमध्ये शक्य झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, शरीरात निर्माण झालेल्या कोणत्याही गाठीकडे दुर्लक्ष करू नका. ती लहान असो वा मोठी, वेदनादायक असो वा वेदनारहित, योग्य त्या वेळी तपासणी केल्यास गंभीर आजाराचे निदान लवकर होऊ शकते. कर्करोगाविरुद्धच्या लढाईत वेळेवर निदान हेच सर्वांत प्रभावी शस्त्र ठरते.