Fennel Water Benefits: भारतीय घरांमध्ये जेवणानंतर माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाणारी बडीशेप फक्त तोंडाची दुर्गंधी दूर करत नाही, तर ती औषधी गुणांनी भरलेली आहे. आयुर्वेदापासून ते आधुनिक पोषणशास्त्रापर्यंत बडीशेप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी ‘बडीशेपचं पाणी’ पिणे आजकाल एक लोकप्रिय हेल्थ ट्रेंड बनला आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, यामुळे फक्त पचनसंस्था सुधारत नाही, तर रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि त्वचेलाही नैसर्गिक चमक मिळते.

भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व डॉ. हंसा योगेंद्र (Hansa Yogendra) यांच्या मते, बडीशेपचं पाणी पिल्याने पचनसंस्था चांगली राहते. हे पाणी गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे, पोटात जडपणा आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. बडीशेपमध्ये असलेले नैसर्गिक घटक ॲनेथॉल (Anethole), फेन्चोन (Fenchone) आणि एस्ट्रागोल (Estragole) आतड्यांच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. त्यामुळे पोटदुखी आणि पोटातील कळा कमी होतात तसेच अन्न सहजपणे पुढे सरकते.

तज्ज्ञांच्या मते, बडीशेप पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स तयार होण्यास मदत करते. त्यामुळे अन्न चांगल्या प्रकारे पचते, शरीराला आवश्यक पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे मिळतात आणि पोट हलके वाटते. चला तर मग तज्ज्ञांकडून जाणून घेऊया, बडीशेपचं पाणी पिल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात.

शरीर राहते ऊर्जावान

तज्ज्ञांनी सांगितले की, पचन चांगले असेल तर शरीराला अन्नातून पुरेसे पोषण मिळते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि व्यक्ती अधिक सक्रिय राहते. रोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचं पाणी पिल्यास फायदा होऊ शकतो.

त्वचेची चमक वाढते

हंसा योगेंद्र यांच्या मते, त्वचेच्या बहुतांश समस्या शरीराच्या आतून सुरू होतात. पचन नीट होत नसेल तर शरीरात विषारी घटक (टॉक्सिन्स) साचू लागतात आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे मुरुम येणे, त्वचेची चमक कमी होणे, चेहरा सुजणे, त्वचा निस्तेज दिसणे आणि वेळेआधी सुरकुत्या पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ई आणि क्वेरसेटिन (Quercetin) सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे त्वचा लवकर वृद्ध होण्याची प्रक्रिया मंदावू शकते.

बडीशेपचं पाणी शरीर थंड ठेवते

हंसा योगेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, बडीशेपचं पाणी शरीरातील अतिरिक्त उष्णता म्हणजेच पित्त कमी करण्यास मदत करते. त्यामुळे शरीर आतून संतुलित राहते. तसेच बडीशेपचं पाणी यकृत (लिव्हर) निरोगी ठेवण्यास आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करते. शरीर आतून स्वच्छ असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसून येतो.

बडीशेपचं पाणी बनवण्याची पहिली पद्धत

हंसा योगेंद्र यांच्या मते, बडीशेपचं पाणी तयार करण्यासाठी एक चमचा बडीशेप घ्या आणि ती हलकीशी कुटून घ्या. ती एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. उन्हाळ्यात हे पाणी शरीराला थंडावा देते आणि अॅसिडिटीची समस्या कमी करण्यास मदत करते.

बडीशेपच्या पाण्याचे तोटे आणि घ्यायची काळजी (Side Effects & Precautions)

बडीशेपचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही परिस्थितींमध्ये त्याचे जास्त प्रमाणात सेवन नुकसानदायक ठरू शकते. विशेषतः गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी याचे जास्त सेवन टाळावे. बडीशेपमध्ये अॅनेथॉल असते, जे इस्ट्रोजेन हार्मोनसारखे काम करू शकते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानाच्या काळात याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ज्यांना ॲलर्जीची समस्या आहे त्यांनी बडीशेपचे सेवन टाळावे. यामुळे त्वचेवर पुरळ, खाज किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

ज्या लोकांना लो ब्लड शुगर (Hypoglycemia) ची समस्या आहे त्यांनी बडीशेपचे सेवन काळजीपूर्वक करावे. बडीशेपचं पाणी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे जे लोक आधीपासूनच मधुमेहाची औषधे घेत आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करावे. बडीशेप पचन सुधारण्यास मदत करते, पण तिचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात मुरडा येणे किंवा जुलाब होण्याची शक्यता असते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)