Sciatica Symptoms Causes, Warning Signs and Treatment: कंबर दुखणे किंवा बराच वेळ बसल्यानंतर पाठीला कळ येणे ही अनेकांसाठी नेहमीची बाब असते. त्यामुळे सुरुवातीला जाणवणारी वेदना अनेकदा साधी पाठदुखी किंवा स्नायूंवर आलेला ताण समजून दुर्लक्षित केली जाते. मात्र, कंबरेपासून सुरू झालेली वेदना जर हळूहळू नितंब, मांडी, पोटरी आणि पायापर्यंत पोहोचत असेल, तर त्यामागे केवळ पाठदुखी नसू शकते. ही सायटिका या समस्येची सुरुवातीची खूण असण्याची शक्यता असते.

सायटिका म्हणजे काय आणि नेमकी ही समस्या कशामुळे निर्माण होते? सुरुवातीला कोणती लक्षणं दिसतात आणि वेळीच उपचार न घेतल्यास काय धोका निर्माण होऊ शकतो? जाणून घेऊया…

सायटिका म्हणजे नेमकं काय?

सायटिका हा स्वतंत्र आजार नसून शरीरातील सर्वांत मोठ्या नसांपैकी एक असलेल्या सायटिक नसेवर दबाव किंवा तिची जळजळ झाल्यामुळे निर्माण होणारी समस्या आहे. ही नस कंबरेच्या खालच्या भागातून सुरू होऊन नितंब, मांडी, पोटरीमार्गे पायापर्यंत जाते. त्यामुळे या नसेवर दबाव आल्यास वेदना केवळ कंबरेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती पायाच्या दिशेने खाली जाणवू शकते.

सायटिकाचे प्रमुख कारण अनेकदा मणक्यांमधील चकती बाहेर येऊन नस दाबली जाणे असते. त्याशिवाय मणक्यांच्या हाडांमध्ये होणारे बदल, हाडांची अतिरिक्त वाढ किंवा काही वेळा स्नायूंचा ताण यांमुळेही सायटिकासारखी लक्षणे निर्माण होऊ शकतात.

कंबरेपासून पायापर्यंत वेदना जाणवतेय?

सायटिकाचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे कंबरेपासून पायाच्या दिशेने जाणारी वेदना. ही वेदना जळजळणारी, टोचणारी किंवा विजेचा झटका बसल्यासारखी तीव्र असू शकते. काही जणांना नितंबापासून मांडी किंवा पोटरीपर्यंत वेदना जाणवते.

यासोबतच पाय किंवा पायाच्या बोटांमध्ये मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे किंवा संवेदना कमी झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणेही दिसू शकतात. काही वेळा पायातील स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवतो. पायाचा पुढचा भाग वर उचलताना अडचण येणे किंवा चालताना तोल जाणवणे याकडेही दुर्लक्ष करू नये.

बराच वेळ बसल्यावर, खोकताना किंवा शिंकताना वेदना अचानक वाढणे हेही काही रुग्णांमध्ये दिसून येते.

डॉक्टर काय सांगतात…?

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, बंगळुरू येथील स्पाइन आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत कळाळे यांच्या मते, सुरुवातीला पायात जाणवणारी अस्वस्थता अनेक रुग्ण साधा स्नायूंचा ताण समजून दुर्लक्षित करतात. मात्र, वेदना पायाच्या दिशेने जाणवत असेल आणि ती तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, विशेषतः त्यासोबत मुंग्या येणे किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. गरजेनुसार तपासण्या आणि प्रतिमाचित्रण चाचण्यांच्या मदतीने समस्येचे कारण शोधता येते.

उपचाराला उशीर केल्यास काय होऊ शकते?

सायटिकामध्ये नसेवर असलेला दबाव दीर्घकाळ कायम राहिल्यास काही रुग्णांमध्ये मज्जातंतूंच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बधिरपणा किंवा स्नायूंचा अशक्तपणा वाढण्याची शक्यता असते.

स्पाइन व सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. सुबोध एम. शेट्टी यांच्या मते, सायटिक नस पायांपर्यंत हालचाल आणि संवेदनांचे संदेश पोहोचवण्याचे काम करते. मणक्यांमधील चकती बाहेर येणे किंवा हाडांची वाढ यामुळे या नसेवर दबाव आल्यास जळजळ आणि वेदना निर्माण होतात. हा दबाव दीर्घकाळ राहिल्यास नसेच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

अत्यंत गंभीर स्थितीत कंबरेखालील नसांच्या समूहावर मोठा दबाव येऊन काउडा इक्वायना सिंड्रोम होऊ शकतो. अशा वेळी लघवी किंवा शौचावर नियंत्रण राहणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू शकतात. ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असल्याने अशा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

सायटिकावर उपचार कसे केले जातात?

सायटिकाच्या प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज असतेच, असे नाही. अनेक रुग्णांमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे, योग्य व्यायाम, फिजिओथेरपी आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने आराम मिळू शकतो.

फिजिओथेरपीमध्ये मणक्यावरील अनावश्यक ताण कमी करणाऱ्या हालचाली, शरीराच्या मध्यभागातील स्नायू मजबूत करणारे व्यायाम आणि योग्य हालचालींचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते.

पूर्ण वेळ अंथरुणावर पडून राहणेही प्रत्येक वेळी योग्य उपाय नसतो. तीव्र वेदना असताना विश्रांती उपयोगी ठरू शकते; मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात हालचाल आणि चालणे स्नायूंचा कडकपणा टाळण्यास मदत करू शकते.

त्याशिवाय संगणकासमोर काम करताना योग्य उंचीची खुर्ची-टेबल वापरणे, कंबरेला आधार देणे आणि वजन उचलताना योग्य पद्धत वापरणे महत्त्वाचे आहे.

स्पाइन व अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. जयकृष्णन पिल्लई सांगतात की, गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रियेची गरज भासू शकते; मात्र अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेशिवायही उपचारांचा फायदा होतो. योग्य फिजिओथेरपी, शरीराच्या मध्यभागातील स्नायूंची ताकद वाढवणे आणि शरीराची ठेवण सुधारणे यांमुळे आराम मिळण्यास मदत होऊ शकते. लक्षणांकडे दुर्लक्ष करून स्वतःहून उपचार करण्याऐवजी लवकर निदान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन करणे दीर्घकालीन गुंतागुंत टाळण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

म्हणूनच कंबरदुखीसोबत पायाच्या दिशेने जाणारी वेदना, मुंग्या, बधिरपणा किंवा स्नायूंचा अशक्तपणा जाणवत असेल, तर त्याकडे साधी पाठदुखी म्हणून पाहू नका. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे हा सायटिकामुळे होणारा त्रास वाढण्यापासून रोखण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.