Side Effects of Using Mobile In Toilet: आपण सर्वजण कधी ना कधी हे करतोच. टॉयलेट सीटवर बसल्यानंतर सहज मोबाईल बाहेर येतो आणि रील्स किंवा बातम्या पाहण्याच्या नादात १०-१५ मिनिटे कशी निघून जातात, हे समजतही नाही. हे आपल्याला अगदी सामान्य वाटत असले, तरी डॉक्टरांच्या मते तुमची ही छोटीशी सवय तुमच्या ओटीपोटाच्या (Pelvis) आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

गुरुत्वाकर्षण आणि शरीरावर येणारा ताण

सर्जन डॉ. प्रमोद कदम यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “शौचालयाचा वापर हा एका विशिष्ट कारणासाठी आहे. तुम्ही तिथे जितका जास्त वेळ घालवाल, तितके तुम्ही गुरुत्वाकर्षणाला तुमच्या रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण करण्यास आमंत्रण देता. मानवी शरीर अशा प्रकारचा ताण सहन करण्यासाठी बनलेले नाही.”

जेव्हा आपण टॉयलेट सीटवर बसतो, तेव्हा आपल्या गुदाशयाला (Rectum) सामान्य खुर्चीवर बसल्याप्रमाणे आधार मिळत नाही. गुरुत्वाकर्षणामुळे खालच्या भागात रक्त साचू लागते आणि दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यामुळे त्यावर प्रचंड दाब निर्माण होतो. १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिथे बसणे म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त भार त्यांच्यावर टाकणे होय.

यामुळे मूळव्याध (Hemorrhoids/Piles) होण्याचा धोका वाढतो. गुदद्वाराच्या भागातील रक्तवाहिन्या फुगतात, तिथे वेदना होतात आणि रक्तस्त्राव सुरू होतो.

मेंदू आणि आतड्यांचा संपर्क तुटतो

मुंबईतील कोलोरेक्टल सर्जन डॉ. हुसेन घीवाला यांच्या मते, फोनमध्ये मग्न राहिल्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया विस्कळीत होते. “टॉयलेटवर शिथिल अवस्थेत बसून राहिल्याने बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि फिशर (Anal Fissures) सारखे त्रास होऊ शकतात. फोन पाहण्यासाठी पुढे झुकल्यामुळे आतड्यांवर असा दाब येतो जसा एखाद्या नळीला पीळ पडल्यावर पाणी अडकते.”

जेव्हा आपण व्हिडिओ पाहण्यात गुंग असतो, तेव्हा शौचास जाण्याचे नैसर्गिक संकेत आपला मेंदू दुर्लक्षित करतो. परिणामी, विष्ठा आतड्यांमध्ये जास्त काळ राहिल्याने ती कोरडी आणि कडक होते, त्यामुळे ती शरीराबाहेर टाकणे कठीण होते.

‘स्ट्रेनिंग पॅराडॉक्स’ आणि वेदनादायी फिशर

डॉ. कदम यांनी ‘स्ट्रेनिंग पॅराडॉक्स’ बद्दल माहिती दिली. आपण मुद्दाम जोर लावत नसलो तरी, जास्त वेळ बसून राहिल्यामुळे ओटीपोटाचे स्नायू ताणलेल्या स्थितीत राहतात. यामुळे गुदद्वाराच्या नाजूक अस्तराला जखमा होऊ शकतात, ज्याला ‘फिशर’ म्हणतात. फिशरच्या वेदना अत्यंत तीव्र असतात आणि त्या लवकर बऱ्या होत नाहीत.

काय उपाय कराल?

५ मिनिटांचा नियम: डॉ. कदम सांगतात, “जर ५ मिनिटांत काहीच झाले नाही, तर उठा आणि नंतर प्रयत्न करा. शौचालय हे काही वाचनालय किंवा ऑफिस नाही.” ५ मिनिटे ही नैसर्गिक प्रक्रियेसाठी पुरेशी आहेत.

डिजिटल डिटॉक्स: फोन बाथरूमच्या बाहेरच ठेवा. तिथे कोणतेही विचलित करणारे साधन नसावे, जेणेकरून तुमचे लक्ष शरीराच्या नैसर्गिक संकेतांकडे असेल.

योग्य बैठक (Posture): पायांखाली लहान स्टूल (Footstool) घेतल्याने गुडघे नितंबांपेक्षा वर राहतात. यामुळे स्नायू योग्य स्थितीत येतात आणि प्रक्रिया सुलभ आणि जलद होते.

पाणी आणि फायबर: डॉ. घीवाला यांनी हायड्रेटेड राहण्याचा आणि आहारात फायबरचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. निसर्गाची हाक (Nature’s Call) कधीही टाळू नका.

टॉयलेटवर फोन स्क्रोल करणे निरुपद्रवी वाटत असले तरी तुमचे शरीर त्याचा हिशोब ठेवत असते. प्रत्येक अतिरिक्त मिनिट तुमच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. त्यामुळे फोन बाजूला ठेवा, ५ मिनिटांत काम आटपा आणि निरोगी राहा!