scorecardresearch

‘गूगल सर्च’वर शोध अधिक समृद्ध

प्रत्यक्ष शब्द टाइप करून किंवा मायक्रोफोनद्वारे बोलून आपल्याला हवे त्याचा इंटरनेट शोध घेणे सहजसोपे होते.

‘गूगल सर्च’वर शोध अधिक समृद्ध

गूगलचे सर्च इंजिन हा एक प्रकारे माहितीच्या महाजालाचा वाटाडय़ा आहे. इंटरनेटच्या अमर्याद विश्वात एखादी गोष्ट शोधायची म्हणजे वाळवंटात सुईचा शोध घेण्यासारखे. अशा वेळी ‘सर्च इंजिन’ आपल्याला योग्य मार्गापर्यंत नेते. त्यातही ‘गूगल’च्या सर्च इंजिनचा आवाका अधिकच मोठा. इंटरनेटचे विश्व जितके विस्तारत जात आहे, तितकेच गूगलचे सर्च इंजिनही अधिकाधिक समृद्ध होत आहे. प्रत्यक्ष शब्द टाइप करून किंवा मायक्रोफोनद्वारे बोलून आपल्याला हवे त्याचा इंटरनेट शोध घेणे सहजसोपे होते. आता या शोधमोहिमेसाठी गुगलने आणखी एका तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे दृश्याच्या आधारे सर्च करण्याची सुविधा गूगलने अपडेटद्वारे उपलब्ध करून दिली आहे.

गुगल मल्टिटास्क युनिफाइड मॉडेल (एमयूएम) असे या अपडेटचे नाव आहे. ऑनलाइन सर्च क्षमता आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सज्ज अल्गोरिदमने वाढवण्यासाठी ‘एमयूएम’ची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्याला नेमके काय सर्च करायचे आहे, हे शब्दांत मांडणे कठीण होते किंवा क्लिष्ट असते तेव्हा ‘एमयूएम’ तुमच्या मदतीला धावू शकते. ‘एमयूएम’ केवळ भाषाच ओळखू शकत नाही तर तुम्हाला नेमके काय शोधायचे आहे, याचा अंदाजही मांडते. त्याला ७५ भाषा अवगत असल्यामुळे यावर सर्च करताना भाषेचा अडथळाच येत नाही. गुगलच्या आधीच्या कोणत्याही सर्च मॉडेलच्या तुलनेत एक हजार पट अधिक वेगाने ‘एमयूएम’ कार्य करते. केवळ शब्दच नव्हे तर चित्रांच्या माध्यमातूनही ते अचूक शोध घेण्यास मदत करते. येत्या काळात व्हिडीओ आणि ऑडिओच्या माध्यमातूनही ‘एमयूएम’ अचून सर्च परिणाम आपल्यासमोर आणू शकेल.

‘एमयूएम’चे महत्त्व समजावून सांगण्यासाठी गूगलने आपल्या ब्लॉगवर दिलेले उदाहरणच आपण घेऊ. समजा तुम्ही एका पर्वताची यशस्वी चढाई पूर्ण केली आहे आणि आता दुसऱ्या पर्वतावर चढाईसाठी तुम्हाला तयारी करायची आहे. मात्र, या पर्वतावर चढाई करण्यासाठी काय वेगळी तयारी करायची आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला गूगलच्या विद्यमान सर्च इंजिनमध्ये अनेक प्रश्न टाकून त्याची उत्तरे शोधून आपल्या परीने त्याचा अर्थ लावावा लागेल. उदाहरणार्थ दोन्ही पर्वतांच्या उंची, तापमान यांतील फरक, तेथील चढाईतील प्रमुख आव्हाने, योग्य उपकरणे अशा अनेक गोष्टींसाठी तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतंत्रपणे सर्च करावे लागेल. पण ‘एमयूएम’ आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्हाला नेमके काय शोधायचे आहे, याचा व्यवस्थित अंदाज काढते. पर्वतारोहणाचेच उदाहरण घ्यायचे तर, तुम्ही दोन पर्वतांची नावेच सर्चमध्ये टाकताच ‘एमयूएम’ या दोन्ही पर्वतांवरील वातावरण आणि चढाईसाठी लागणाऱ्या तयारीतील फरक तुमच्यासमोर दर्शवते. 

‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’च्या मदतीने गूगलने सर्च इंजिनला नवी बळकटी देऊ केली आहे. सध्या गुगल ‘एमयूएम’च्या विविध चाचण्या करत आहे. वापरकर्त्यांसमोर शोध परिणाम सादर करताना ही यंत्रणा निष्पक्ष मांडणी करेल, याकरिता गूगलमधील तंत्रज्ञ सध्या चाचण्या करत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांसाठी ही यंत्रणा सुरू होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी जाईल. पण अर्थातच तोपर्यंत ‘एमयूएम’ अधिक समृद्ध होईल, यात शंका नाही.

अद्ययावत होत राहिल्यास अधिक समृद्ध

‘एमयूएम’ अतिशय उपयुक्त असले तरी, अजूनही त्याच्या सर्च क्षमतेत काही मर्यादा जाणवतात. ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ असले तरी काही गोष्टींचे शोध दिशाभूल करणारे असू शकतात. याकरिता गुगल सातत्याने अपडेट करत आहे. त्यामुळे जसजशी ही यंत्रणा अपडेट होत जाईल, तसतशी ती अधिक चोख होत जाईल.

‘एमयूएम’चे फायदे

’ ‘एमयूएम’ अतिशय जलदपणे काम करते.

’ नाव माहीत नसलेल्या वस्तूचा शोध घेणे शक्य.

’ विशिष्ट रंगाच्या आधारे शोध घेणे शक्य.

’ कोणत्याही भाषेशी संबंधित शोध घेणेही शक्य.

’ या सर्चच्या आधारे ऑनलाइन शॉपिंगही शक्य.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Search enriched on google search zws

ताज्या बातम्या