scorecardresearch

थंडीमुळे वृद्धांचे हृदय निकामी होण्याचा धोका

हवेच्या वाढलेल्या दाबामुळे वृद्ध रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.

थंडीमुळे वृद्धांचे हृदय निकामी होण्याचा धोका
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अति प्रमाणात वाढलेली थंडी आणि हवेच्या वाढलेल्या दाबामुळे वृद्ध रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. वाढलेल्या थंडीमुळे हृदय निकामी होऊन त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असल्याचा इशारा नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात देण्यात आला आहे.

कॅनडातील लावल विद्यापीठ आणि डी शेरब्रूके विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले. वृद्ध रुग्णांनी थंड हवामानामध्ये हृदय निकामी होण्याचे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिक धुके असणाऱ्या भागात जाणे टाळावे, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

मागील अभ्यासामध्ये हवामानामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम असुरक्षित (सहज परिणाम होईल अशा) लोकांवर कसा होतो हे सांगण्यात आले होते. ज्या वेळी अधिक तापमानवाढ किंवा थंडी येते त्या वेळी कमी उत्पन्न असलेल्या गटातील लोकांना मृत्यू येण्याचे प्रमाण वाढते, असे दिसून आले होते. संशोधकांनी अभ्यासामध्ये तापमानामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम आणि हवेचा दाब याचा रुग्णाचे हृदय निकामी होण्यावर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास केला. यासाठी २००१ ते २०११ दरम्यान ज्यांचे हृदय निकामी झाले होते अशा ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या १ लाख १२ हजार ७९३ लोकांचा अभ्यास केला.

प्रत्येक दिवशी सामान्य स्थितीपेक्षा तापमान जर एक अंश सेल्सिअसने कमी झाले तर मृत्यू येण्याचा, रुग्णालयात दाखल करण्याचा अथवा हृदय निकामी होण्याचा धोका ०.७ टक्के वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वृद्ध रुग्णांनी अधिक प्रमाणात थंडी असणाऱ्या भागामध्ये जाण्याचे शक्यतो टाळावे, असे लावल विद्यापीठाचे प्राध्यापक पियरे गोस्सेलिन यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2017 at 01:50 IST

संबंधित बातम्या