मधुमेहाचे शरीरावरील गंभीर परिणाम

मधुमेह नावातच गोडवा असणारा परंतु आयुष्यातील गोडी कमी करणारा आजार.

अवांतर आरोग्य

डॉ. सतीश नाईक

मधुमेह नावातच गोडवा असणारा परंतु आयुष्यातील गोडी कमी करणारा आजार. दुर्दैव असे की हा आजार जगभरात अक्राळ-विक्राळपणे पाय पसरत आहे आणि भारतात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अलीकडे तर अगदी तरुण वयोगटालाही या आजाराने ग्रासले असून यासोबतच हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, रक्तदाब या आजारांनाही घेऊन येत आहे. ग्लुकोज वाढते ते रक्तात आणि रक्त सर्व शरीरात फिरते. त्यामुळे साहजिकच शरीरातील अनेक इंद्रियांनाही याचा उपद्रव होणारच. परंतु याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने या मधुमेहाशी निगडित आणि नजरेआड पडत चाललेल्या विषयांना भिडणे आवश्यक वाटते. कारण मधुमेह हा रक्तातील ग्लुकोज वाढणे यापुरता मर्यादित नसून त्याचे अनेक पैलू आहेत.

पहिला पैलू म्हणजे रक्तात साचलेल्या अतिरिक्त ग्लुकोजचे चरबीत रूपांतर होते. वैद्यकीय भाषेत याला ‘ट्रायगलसीराइड’ वाढतात. मग आपल्याला चरबीची पुटे चढू लागतात. पोट, कंबर, मांडय़ा या जागा फुल्ल व्हायला लागतात. तरीही अतिरिक्त चरबी बनत राहते, रक्तात येत राहते. अपरिहार्यता म्हणून मग ही चरबी इतर इंद्रियांमध्ये आपले बस्तान बसवायला लागते. स्नायू, यकृत अशा ठिकाणी साचायला लागते. त्या इंद्रियांच्या कार्यात अडथळे निर्माण करू लागते.

त्यामुळे मधुमेहींमध्ये फॅटी लिव्हर किंवा चरबी साचलेले यकृत अनेकदा दिसते. यात दुखत नाही, खुपत नाही आणि निदानही लवकर होत नाही. या ना त्या कारणाने पोटाची सोनोग्राफी केल्यावर निदान होते.

इंद्रियांमध्ये साचलेली चरबी निरूपद्रवी आहे असा दावा करता येत नाही. किंबहुना साधारण १० ते १५ टक्के लोकांमध्ये ती उपद्रव करते. यकृत हे शरीराच्या महत्त्वाच्या घडामोडीचे महत्त्वाचे केंद्र असते. त्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्यास साहजिकच शरीराची घडी बिघडते. यकृतामध्ये नैसर्गिकरीत्या बराच काळ असले आघात सहन करण्याची क्षमता असते. पण इथेच खरी मेख आहे. क्षमता जास्त असली की इंद्रियात होणारा बिघाड लक्षात येण्यासाठी लक्षणेही लवकर दिसून येत नाहीत. त्यामुळे हा आजार कधी कधी पुढच्या काळातील प्रश्नांची नांदीही ठरू शकतो. त्यात रुग्ण मद्यसेवन करत असल्यास यावर आणखीनच लवकर परिणाम होणार. त्यामुळे फॅटी लिव्हर, सिऱ्होसिसमध्ये परावर्तित होण्याआधी त्याची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्याला झालेला फॅटी लिव्हरची समस्या भविष्यात मोठा गोंधळ निर्माण करणारी नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.

दुसरा दुर्लक्षित प्रश्न पायांचा. पायांना जखम होणे पाय कापावे लागणे हेही मधुमेहीमधील महत्त्वाची समस्या आहे. मधुमेहात जशा हृदयाच्या रक्तवाहिन्या चोंदतात तसे इतर ठिकाणच्या रक्तवाहिन्याही चोंदतात. पायाच्या बाबतीत खूप उशिरापर्यंत हे लक्षात येत नाही. हृदयाच्या बाबतीत थोडे चालल्यावर छातीत दुखायला किंवा दम लागायला लागतो. याबाबत आपण बरेच सजग असल्याने ही लक्षणे मनावर घेतो. इतर तपासण्या करतो. पायाच्याबाबत मात्र असे होत नाही. पायामध्ये चालल्यावर गोळे येतात, पाय लटकवून बराच काळ बसल्यास पांढरे पडतात अशी लक्षणे दिसत असतात. परंतु वेदनाशामक औषधे घेण्यापलीकडे काहीच केले जात नाही. डॉप्लर किंवा पायाच्या रक्तवाहिन्यांची अँजियोग्राफी हे तर फार दूरच. मग ही लक्षणे वाढत जातात आणि एक दिवस पाय कापण्याची वेळ येते. परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अँजियोग्राफी करून रक्तपुरवठा पूर्ववत करणे आता शक्य आहे, परंतु या सुविधाही शहरापुरत्या मर्यादित आहेत.

तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अशाच प्रकारे रक्तपुरवठय़ात अडथळा निर्माण होणे. इथेही वेदना होत नसल्यामुळे निदान फार उशिरा होते. मूत्रपिंड निकामी होण्याचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे. मूत्रपिंडामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे ही समस्या अधिक जटिल आहे. यावरून आता हे धोके ओळखायचे कसे हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल. मूत्रपिंडाचा रक्तदाबाशी संबंध येतो. मधुमेहात रक्तदाब नियंत्रित राखणे तसे आव्हानात्मक. साधारण दोन ते तीन औषधे घेतल्यावरही रक्तदाब नियंत्रणात नसेल तर सावध व्हायला हवे आणि मूत्रपिंडाच्या तपासण्या करायला हव्यात. मधुमेहात अशी अनेक लक्षणे किंवा समस्या आहेत, ज्या संकेत देत असतात. तेव्हा याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असून आपल्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहून शरीराची योग्य काळजी घेणेही गरजेचे आहे. केवळ मधुमेह नियंत्रण नव्हे तर शरीरात होणाऱ्या अनेक बदलांचीही दखल घेणे हे महत्त्वाचे आहे.

लेखक मधुमेहतज्ज्ञ आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Serious effects diabetes body ysh

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!