Seven Natural Habits to Control Blood Sugar and Prevent Diabetes: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रक्तातील साखरेची समस्या केवळ मधुमेह असलेल्या व्यक्तींपुरती मर्यादित राहिलेली नाही. अयोग्य आहार, विस्कळित दिनचर्या, सततचा ताणतणाव व शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे अनेक लोकांमधील साखरेच्या पातळीमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचे दिसून येते. अशा वेळी अनेक जण औषधे किंवा पूरक गोष्टींकडे वळतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, काही साध्या आणि नैसर्गिक सवयी अंगीकारल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे शक्य होऊ शकते आणि दीर्घकाळात आरोग्याच्या इतर गुंतागुंती टाळण्यास मदत मिळू शकते.

राष्ट्रीय मधुमेह, पचनसंस्था आणि मूत्रपिंड विकार संस्था (NIDDK) यांच्या मते, योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि आरोग्यदायी दिनक्रम यांमुळे रक्तातील साखरेवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येऊ शकते. त्याच अनुषंगाने पोषणतज्ज्ञ नेहा सिन्हा व सर्वसाधारण वैद्य डॉ. श्री करण उद्देश तनुगुला यांनी काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या आहेत.

डायबिटीज टाळण्यासाठी काय कराल? डॉक्टरांच्या मते ‘या’ ७ सवयी महत्त्वाच्या ठरू शकतात

१. मर्यादित उपवास पद्धत

डॉ. तनुगुला यांच्या मते, वैद्यकीय सल्ल्याने दिवसातून १२ ते १६ तासांचा मर्यादित उपवास उपयुक्त ठरू शकतो. उदाहरणार्थ- सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीतच भोजन करणे. त्यामुळे शरीराला इन्सुलिनचा योग्य वापर करण्यास मदत होऊ शकते, तसेच चरबीचे चयापचय अधिक कार्यक्षम होण्याची शक्यता असते. मात्र, मधुमेह किंवा इतर आजार असलेल्या व्यक्तींनी ही पद्धत स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Award Banner

२. वनौषधींचा आधार

कारले, मेथीचे दाणे व दालचिनी यांसारख्या काही नैसर्गिक घटकांचा उपयोग रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. दालचिनीचे मर्यादित प्रमाण रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास जेवणानंतर होणारी साखरेची अचानक वाढ कमी होण्यास मदत होऊ शकते. तथापि, या उपायांचाही वापर जाणकारांच्या मार्गदर्शनाखालीच करणे हितावह ठरेल.

३. वेळेवर भोजन करण्याची सवय

पोषणतज्ज्ञ नेहा सिन्हा यांच्या मते, दररोज ठरावीक वेळी भोजन करणे हा साखर नियंत्रणाचा सर्वांत सोपा मार्ग मानला जातो. नियमित वेळापत्रकामुळे शरीरातील इन्सुलिन स्राव अधिक सुसंगत राहतो, ज्यामुळे अचानक साखर वाढण्याची शक्यता कमी होते. उशिरा किंवा अनियमित भोजन केल्यास ही पातळी बिघडू शकते.

४. आहारातील तंतुमय घटक

तंतुमय अन्नघटक साखरेचे शोषण मंदावतात. त्यामुळे रक्तात साखर हळूहळू मिसळते आणि पचनक्रिया सुधारते. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. संपूर्ण धान्ये, कडधान्ये, भाज्या आणि फळे हे तंतुमय अन्नाचे उत्तम स्रोत आहेत.

५. प्रथिनांचे योग्य प्रमाण

प्रथिनयुक्त आहारामुळे जेवणानंतर साखर वाढण्याचा वेग कमी होऊ शकतो. अंडी, डाळी, पनीर, दही, सुकामेवा आणि बिया यांचा समावेश आहारात केल्यास संतुलन राखण्यास मदत मिळू शकते.

६. आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण

अति प्रमाणात अन्नसेवन केल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे संतुलित आणि मर्यादित प्रमाणात भोजन करणे महत्त्वाचे ठरते.

७. कमी ग्लायसेमिक अन्नपदार्थांची निवड

हळूहळू साखर मुक्त करणारे अन्नपदार्थ निवडल्यास ऊर्जेची पातळी टिकून राहते आणि अचानक वाढ टाळता येऊ शकते.

निष्कर्ष

दैनंदिन सवयींमध्ये छोटे, पण विचारपूर्वक बदल केल्यास रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे शक्य ठरू शकते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अवलंबलेले नैसर्गिक उपाय दीर्घकाळ आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)