Cleaning and washing Fruits and Vegetables : आहारात फळे आणि भाज्या समाविष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. हे खाल्ल्यानं आपल्या शरीराला पोषण मिळतं, ज्यामुळे आपण निरोगी राहतो आणि आपलं शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होतं. पण, कधी कधी फळे आणि भाज्या खाण्याची किंवा बाजारातून आल्यानंतर त्यांना स्वच्छ करताना आपण छोटीशी जरी चूक केली तरीही मोठे गंभीर परिणाम शरीराला भोगावे लागू शकतात.
फूड सेफ्टी अँड स्टॅडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) (FSSAI) फळे आणि भाज्यांवर लावलेल्या स्टिकर्सबद्दल नवीन इशारा दिला आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रशासनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेने असे अधोरेखित केले आहे की, या स्टिकर्समुळे मागे उरणारा चिकट पदार्थाचा (adhesive) अवशेष खाण्यासाठी योग्य नाही आणि त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
एफएसएसएआयनुसार फळे-भाज्यांवरील स्टिकरसह फळे खाण्यापूर्वी आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. कारण- फळे आणि भाज्यांवर स्टिकर्स असणे ही जरी एक सामान्य बाब असली तरी ते स्टिकर्स जागेवर टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे चिकट पदार्थ (adhesives) मागे असे अवशेष सोडू शकतात, जे खाण्यासाठी अयोग्य असतात. फक्त फळे, भाज्या काढताना त्यांच्यावरील स्टिकर्स काढणे पुरेसे नसून, त्याचे साल काढून खाण्याचाही सल्ला दिला गेला आहे.
जर तुम्ही स्टिकर चावलात, तर काय होऊ शकते?
याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने बेंगळुरू येथील ॲस्टर CMI रुग्णालयातील अंतर्गत औषधोपचार (Internal Medicine) विभागाच्या वरिष्ठ सल्लागार, डॉक्टर ब्रुंदा एम. एस. यांच्याशी चर्चा केली. त्यांनी म्हटले की, या स्टिकर्सचा वापर केवळ वस्तूंचे लेबलिंग करण्यासाठी केला जातो. त्यामध्ये डिंक, शाई आणि इतर अशा घटकांचा समावेश असू शकतो, जे खाण्यासाठी सुरक्षित नाहीत. जर एखाद्या व्यक्तीनं चुकून याचा एखादा छोटा तुकडा गिळला, तर सहसा त्यामुळे फारसं नुकसान होत नाही; पण जाणीवपूर्वक किंवा वारंवार असं करणं टाळा.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार- चिकट पदार्थ (adhesive) किंवा शाईमध्ये असलेल्या रसायनांमुळे काही वेळा पोटात किंवा घशात जळजळ होऊ शकते. असे पदार्थ गिळल्यानंतर काही लोकांना थोडासा अस्वस्थपणा, मळमळ किंवा पचनाशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात. विशेषतः लहान मुलांमध्ये किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये स्टिकरचा तुकडा घशात अडकण्याचा (choking) थोडासा धोका जाणवू शकतो.
अशा वस्तूंचे नियमित सेवन केल्यास, शरीरात हळूहळू अनावश्यक रसायन जमा होऊ शकतात. गम हा फूड-ग्रेड (खाद्य-दर्जाचा) आहे असा लेबल जरी त्यावर असला तरीही तो स्टिकर खाण्यासाठीच आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी त्या नीट धुणे आणि त्यावरील स्टिकर्स काढून टाकणे यांमुळे हा धोका टाळण्यास मदत होऊ शकते, असेही डॉक्टरांनी पुढे म्हटले आहे.
तुमच्या भाज्या योग्य प्रकारे धुवा…
एफएसएसएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फळे आणि भाज्या धुण्यासाठी पुढील पायऱ्या फॉलो करा…
- बाहेरून / विक्रेत्यांकडून विकत घेतलेली फळं, भाज्या लगेच मिक्स न करता, थोडा वेळ वेगळ्या ठिकाणी ठेवणं सुरक्षित आहे.
- फळं आणि भाज्या पूर्णपणे धुऊन घ्या किंवा कोमट पाण्यात ५० पीपीएम क्लोरिनचा एक थेंब टाकून त्यात बुडवा.
- त्यांना पिण्यायोग्य किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
- भाज्या आणि फळांवर जंतुनाशक, क्लिनिंग वाइप्स किंवा साबण वापरू नका.
- ज्या फळं आणि भाज्यांना रेफ्रिजरेशनची आवश्यकता असते, त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. बाकीच्या भाज्या आणि फळं बास्केट किंवा रॅकमध्ये खोलीच्या तापमानावर ठेवा.
- तापमानातील बिघाड किंवा कीटकांचा प्रादुर्भाव यांसारखे धोके टाळण्यासाठी, अन्न घराबाहेर कार किंवा गॅरेजमध्ये ठेवून देऊ नका.
- ज्या सिंक आणि प्लॅटफॉर्मवर अन्नपदार्थ धुतले आहेत, तो स्वच्छ करा. पाण्याचे थेंब जमिनीवर पडू देऊ नका. पाण्याचे थेंब पडले तरीही ते ताबडतोब पुसून टाका.
- अन्नाचे पॅकेट्स (जसं दूध, किराणा, फळं-भाज्यांची पिशवी) घरी आणल्यावर ते सॅनिटाईज किंवा स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. जसं की, अल्कोहोल बेस्ड सोल्युशननं पुसा किंवा साबण आणि स्वच्छ पाण्यानं धुवा.
