Stomach Bloating and Constipation Warning Signs: जड जेवण केल्यानंतर पोट फुगणे, तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर अॅसिडिटी होणे किंवा दिवसभर बसून राहिल्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवणे ही सामान्य बाब आहे. अनेकदा आहारात बदल, पुरेसे पाणी पिणे, व्यायाम आणि दैनंदिन दिनचर्येत सुधारणा केल्याने हा त्रास कमी होतो. मात्र, पोट फुगणे, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता वारंवार होत असेल, अनेक आठवडे टिकत असेल किंवा दिवसेंदिवस वाढत असेल, तर त्याकडे केवळ ‘गॅसचा त्रास’ म्हणून पाहू नका. काही वेळा ही लक्षणं शरीरात सुरू असलेल्या दुसऱ्या समस्येचा इशारा असू शकतात.
नेहमीची पचनाची समस्या कधी चिंतेची ठरते?
सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोसायन्सेसचे Additional Director – Interventional Endoscopy डॉ. सनिल पारेख यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आहारातील चुकीच्या सवयी, ताणतणाव, कमी पाणी पिणे किंवा बैठी जीवनशैली यामुळे पोट फुगणे, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. मात्र, ही लक्षणं अनेक आठवडे कायम राहिली, वारंवार होत राहिली, जीवनशैलीत बदल करूनही कमी झाली नाहीत किंवा हळूहळू वाढत गेली, तर त्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः मध्यमवयीन आणि ज्येष्ठ व्यक्तींनी अशा लक्षणांकडे अधिक गांभीर्याने पाहावे. तसंच, त्रास कमी करण्यासाठी वारंवार औषधं घ्यावी लागत असतील, तर केवळ औषधांवर अवलंबून न राहता त्यामागचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे.
शौचातून रक्त येतंय? मग दुर्लक्ष नको!
पचनाशी संबंधित काही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नये. यामध्ये—
- शौचातून रक्त येणे
- काळसर किंवा डांबरासारखी शौच होणे
- कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे
- सतत उलट्या होणे
- अन्न गिळताना त्रास होणे
- रक्ताची कमतरता (अॅनिमिया)
- भूक कमी होणे
- तीव्र पोटदुखी
- शौच पूर्णपणे झालं नसल्यासारखं सतत वाटणे
- नेहमीच्या शौचाच्या पद्धतीत अचानक बदल होणे
यांचा समावेश होतो.
यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कर्करोग आहे, असा थेट अर्थ होत नाही. या लक्षणांमागे अनेक कारणं असू शकतात. मात्र, लक्षणं नवीन असतील, सतत जाणवत असतील किंवा इतर धोक्याच्या लक्षणांसोबत दिसत असतील तर वैद्यकीय तपासणी आवश्यक ठरते.
सतत अॅसिडिटी होतेय? ‘गॅस’ म्हणून दुर्लक्ष नको
वारंवार होणारी अॅसिडिटी ही गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) मुळे होऊ शकते. मात्र, काही रुग्णांमध्ये H. pylori या जिवाणूचा संसर्गही कारणीभूत असू शकतो. अॅसिडिटी दीर्घकाळ कायम राहत असेल किंवा त्यासोबत इतर असामान्य लक्षणं दिसत असतील, तर डॉक्टर H. pylori संसर्गाची तपासणी करण्याचा विचार करू शकतात. H. pylori संसर्गाचे योग्य निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. काही संशोधनानुसार या संसर्गाचे यशस्वीरीत्या निर्मूलन केल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्याशी संबंध आढळला आहे. मात्र स्वतःहून अँटिबायोटिक्स घेऊ नका. H. pylori आहे की नाही, याची तपासणी आणि त्यानुसार योग्य उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.
वय वाढलं म्हणून बद्धकोष्ठता सामान्य समजू नका
वर्षानुवर्षे शौचाची पद्धत एकसारखी असलेल्या व्यक्तीला अचानक बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू झाला, तर त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. डॉ. पारेख यांच्या मते, वयाच्या ४५ वर्षांनंतर शौचाच्या पद्धतीत झालेला बदल दुर्लक्षित करू नये. काही वेळा अशा बदलामागे आतड्यांशी संबंधित गंभीर समस्या असू शकते. ICMR च्या कोलोरेक्टल कॅन्सरविषयक सहमती दस्तऐवजातही शौचाच्या सवयींमध्ये बदल, शौचात मिसळलेले रक्त, अॅनिमिया, वजन कमी होणे आणि वाढते वय यांसारख्या घटकांकडे लक्ष देण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन सुरू झालेला आणि कायम राहणारा बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार घरगुती उपाय किंवा औषधांनी दाबण्याऐवजी त्यामागचं कारण तपासून घेणं अधिक योग्य आहे.
पोट निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीचा मोठा वाटा असतो. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा, पुरेसे पाणी प्या, नियमित शारीरिक हालचाल करा आणि पुरेशी झोप घ्या. वजन नियंत्रणात ठेवणे, तंबाखू टाळणे आणि मद्यपान मर्यादित ठेवणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनशैलीतील बदल म्हणजे वैद्यकीय तपासणीला पर्याय नाही. पोट फुगणे, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता अधूनमधून होत असेल तर त्यामागे साध्या सवयी कारणीभूत असू शकतात. मात्र, त्रास वारंवार होतोय, अनेक आठवडे टिकतोय, वाढतोय किंवा त्यासोबत रक्त येणे, वजन कमी होणे, उलट्या, तीव्र पोटदुखी यांसारखी लक्षणं दिसत आहेत, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विलंब करू नका. शरीर एखादं लक्षण पुन्हा पुन्हा दाखवत असेल, तर ते केवळ सहन करण्याऐवजी त्यामागचा संदेश समजून घेणं हीच आरोग्याची योग्य सवय आहे.
