Shortness of breath causes : श्वास घेण्यास होणारा त्रास ही एक गंभीर समस्या आहे. जेव्हा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो, तेव्हा फुप्फुसांना पुरेशी हवा मिळत नाही असे वाटते. छातीत घट्टपणा जाणवतो, धाप लागते आणि श्वास घेण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त जोर लावावा लागतो. अशा परिस्थितीत, श्वास घेण्यास होणारा त्रास केव्हा गांभीर्याने घ्यावा आणि श्वास घेण्यास होणारा त्रास कोणत्या आजाराचे लक्षण असू शकतो, हे यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने आपल्या अधिकृत वेबसाईटवर स्पष्ट केले आहे. जर तुम्हालाही श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर येथे दिलेली माहिती खास तुमच्यासाठीच आहे.

दम लागणे हे कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते?

दमा, छातीचा संसर्ग, जास्त वजन असणे, धूम्रपान करणे किंवा पॅनिक अटॅक येणे ही धाप लागण्याची काही सामान्य कारणे आहेत.

काही वेळा धाप लागणे हे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजसारख्या फुप्फुसाच्या अधिक गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्याव्यतिरिक्त इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस, हृदयविकार किंवा फुप्फुसाच्या कर्करोगातही धाप लागू शकते.

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

जर तुम्हाला वारंवार श्वास घेण्यास त्रास होत असेल, झोपून राहिल्यावर किंवा सामान्य कामानंतरही धाप लागत असेल, पायांना सूज आल्याचे लक्षात आले असेल आणि तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घेतली पाहिजे.

दम लागण्याकडे कधी दुर्लक्ष करू नये?

  • जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, घसा खवखवत असेल किंवा बोलता येत नसेल
  • छाती घट्ट आणि जड वाटते
  • हात, पाठ, मान आणि जबड्यापर्यंत पसरू शकणारी वेदना
  • दम लागण्यासोबतच ओठ आणि त्वचा फिकट, निळी किंवा राखाडी होते. तसेच, तळहातांचा रंगही बदलतो.
  • अचानक गोंधळल्यासारखं वाटू लागतं.
  • या परिस्थितीत, ताबडतोब रुग्णालयात जा.

जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि नेहमीपेक्षा जास्त धाप लागत असेल, अचानक आजारी वाटू लागले असेल, खोकल्यातून रक्त पडत असेल, एका पायाला सूज किंवा वेदना होत असतील किंवा तुमच्या हृदयाचे ठोके वाढत किंवा कमी होत असतील, तर ताबडतोब रुग्णालयात जा.