Green Tea on Empty Stomach: काही लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहानं करतात, ज्यात मिल्क टी आणि ग्रीन टी हे सर्वांत लोकप्रिय पर्याय आहेत. वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. फिटनेसवर लक्ष केंद्रित करणारे किंवा तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करणारे कोणीही ग्रीन टीचे सेवन करतात.

तज्ज्ञांच्या मते, ग्रीन टी प्यायल्याने त्वचेचा दर्जा सुधारतो, चयापचय क्रिया सुधारते आणि व्यक्ती अधिक काळ सक्रिय राहते. ग्रीन टीचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटेही आहेत. तंदुरुस्त राहण्यासाठी लोक अनेकदा सकाळच्या व्यायामानंतर रिकाम्या पोटी ग्रीन टी पितात, जे खूप हानिकारक मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यावा की नाही, हे जाणून घेण्यासाठी चला हा लेख पाहूया

रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यावा का?

रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने पोटदुखी होऊ शकते. ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचे पॉलीफेनॉल असतात, जे पोटातील आम्ल वाढवतात, ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. ग्रीन टी नेहमी जेवणानंतर किंवा जेवणांच्या मध्येच प्यायला पाहिजे. ग्रीन टीमध्ये कॅफिनदेखील असते, जे पचनरस पातळ करून पोटाला हानी पोहोचवू शकते. त्याच्या अतिसेवनामुळे चक्कर येणे आणि उलट्या होणेदेखील होऊ शकते.

ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

नाश्त्याच्या एक तास आधी ग्रीन टी पिऊ शकता. सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. दिवसातून तीन ते चार कपांपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये. काही लोक दूध आणि साखर घालून ग्रीन टी पितात. ग्रीन टीमध्ये साखर आणि दूध घालणे टाळा. जेवणानंतर लगेच ग्रीन टी पिणे धोकादायक ठरू शकते.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ

दिवसातून तीन ते चार कप ग्रीन टी प्या. ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे यकृताच्या समस्या उदभवू शकतात. झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिण्यामुळे झोप लागण्यास अडचण येऊ शकते.

ग्रीन टी पिण्याचे फायदे

१. जास्त अँटिऑक्सिडंट्स – ग्रीन व ब्लॅक टी दोन्ही एकाच वनस्पतीपासून येतात; पण त्यांच्या पानांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. ग्रीन टीमध्ये ब्लॅक टीप्रमाणे ऑक्सिडेशन होत नाही आणि त्यामुळे वनस्पतीमधील आरोग्यदायी अँटीऑक्सिडंट्सचे चांगल्या रीतीने जतन होते, असे हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील पोषण तज्ज्ञ व सहायक प्राध्यापक टेरेसा फंग स्पष्ट करतात.

२. हृदयरोगाचा धोका कमी – चहामध्ये पॉलीफेनॉल असतात, जे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असते आणि ते ऑक्सिडेटिव्ह तणावापासून आपले संरक्षण करते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी करते.

३. रक्तातील साखरेचे नियमन – ग्रीन टी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करू शकते. २०१९ मध्ये २७ अभ्यासांच्या विश्लेषणात असे आढळून आले की, अल्पकालीन आणि दीर्घकालीन ग्रीन टीचे सेवन उपवासाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करते.

४. दात किडण्यास प्रतिबंध – ग्रीन टी प्यायल्याने दात किडण्यास प्रतिबंध होतो. कारण- त्यात नैसर्गिकरीत्या फ्लोराईड असते.

५. वजन कमी करण्यास मदत – हार्वर्ड हेल्थच्या मते, ग्रीन टीमध्ये आढळणारे कॅफिन आणि कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स चयापचय क्षमता वाढवू शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.