डायबिटीज हा केवळ आनुवंशिक आजार राहिलेला नसून बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताण यामुळे तो मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो. आज लहान वयातही टाइप-2 डायबिटीजचे रुग्ण आढळत आहेत. एकदा डायबिटीज झाला की तो पूर्णपणे बरा होत नाही; मात्र योग्य औषधे, संतुलित आहार आणि नियमित तपासण्या यांच्या मदतीने तो नियंत्रणात ठेवता येतो.
डायबिटीज नियंत्रणासाठी रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अनेक रुग्ण शुगर टेस्ट करताना एक महत्त्वाची चूक करतात—ती म्हणजे तपासणीपूर्वी औषध घ्यावे की नाही, याबाबत असलेला संभ्रम. यामुळेच अनेकदा शुगरची रीडिंग चुकीची येते आणि उपचारात गोंधळ निर्माण होतो.
शुगर टेस्ट आणि औषधांचा गोंधळ (Confusion About Sugar Test and Medicines)
अनेक डायबिटीज रुग्णांना असे वाटते की तपासणीपूर्वी औषध घेतले नाही तर शुगर अचानक वाढेल आणि शरीराला धोका निर्माण होईल. या भीतीपोटी काही रुग्ण फॉस्टिंगपासून पोस्ट-मीलपर्यंत सर्व शुगर टेस्ट औषध घेऊनच करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते प्रत्येक चाचणीसाठी नियम वेगळे आहेत आणि ते न पाळल्यास रिपोर्ट दिशाभूल करणारा ठरू शकतो.
फॉस्टिंग शुगर टेस्ट करताना काय करावे? (Fasting Blood Sugar Test)
डायबिटोलॉजिस्ट डॉ. निखिल प्रभू यांच्या मते, फॉस्टिंग ब्लड शुगर टेस्ट ही शरीराची नैसर्गिक साखरेची पातळी दाखवते. त्यामुळे ही तपासणी करताना कोणतेही शुगर-कंट्रोल करणारे औषध घेऊ नये. अनेक रुग्ण सकाळी उठताच औषध घेतात आणि त्यानंतर फॉस्टिंग शुगर तपासतात, पण असे केल्यास खरी रीडिंग मिळत नाही. फॉस्टिंग शुगर टेस्ट नेहमी पूर्णपणे रिकाम्या पोटी, औषध न घेता केल्यासच अचूक निष्कर्ष मिळतो.
जेवणानंतरची शुगर तपासणी कशी करावी? (Post-Meal Blood Sugar Test)
फॉस्टिंग टेस्टनंतर साधारण दोन तासांनी जेवणानंतरची शुगर तपासली जाते. या वेळी मात्र डॉक्टरांनी सांगितलेली डायबिटीजची गोळी घेऊनच तपासणी करावी. कारण जेवणानंतर रक्तातील साखर नैसर्गिकरित्या वाढते. औषध न घेता पोस्ट-मील शुगर तपासल्यास रीडिंग जास्त येऊ शकते आणि त्यामुळे औषधांचा डोस ठरवताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पोस्ट-मील शुगर टेस्ट ही औषध घेतल्यानंतरच करणे अधिक योग्य ठरते.
HbA1c टेस्टपूर्वी औषध घ्यावे का? (HbA1c Test)
HbA1c ही अशी चाचणी आहे जी मागील तीन महिन्यांतील सरासरी शुगर पातळी दर्शवते. या तपासणीवर त्या दिवशी घेतलेल्या औषधाचा कोणताही तात्काळ परिणाम होत नाही. त्यामुळे HbA1c टेस्ट करताना औषध घेतले किंवा न घेतले, यामुळे रिपोर्टमध्ये फरक पडत नाही. रुग्ण आपल्या नियमित दिनचर्येनुसार ही चाचणी करू शकतात.
अचूक रिपोर्टसाठी योग्य पद्धत महत्त्वाची (Importance of Correct Testing Method)
डायबिटीज नियंत्रणासाठी केवळ औषध घेणे पुरेसे नसून योग्य वेळी योग्य प्रकारे तपासणी करणे तितकेच गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने केलेली शुगर टेस्ट चुकीचे चित्र दाखवू शकते आणि त्याचा थेट परिणाम उपचारांवर होऊ शकतो. त्यामुळे कोणती तपासणी करताना औषध घ्यावे आणि कोणती औषधांशिवाय करावी, हे स्पष्टपणे समजून घेणे प्रत्येक डायबिटीज रुग्णासाठी आवश्यक आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या केल्यास आणि रिपोर्ट अचूक ठेवला तर डायबिटीज दीर्घकाळ नियंत्रणात ठेवणे नक्कीच शक्य आहे.

