आपण रोज करत असलेली फॅशन आपल्याला कधी कधी निरस वाटू लागते. मग बाजारात नवीन काय आलंय याचा आपण शोध घ्यायला लागतो. अशावेळी अचानक आपल्याला खूप पूर्वी वापरात असलेली फॅशन पुन्हा एकदा दिसते. याचे कारण म्हणजे त्याच त्या कंटाळवाण्या डिझाईन टाळण्यासाठी डिझाइनर जुन्या काळातील डिझाईनची पुर्नरचना करण्यास सुरवात करतात. त्यामुळे दर ठराविक काळाने जुनी फॅशन पुन्हा एकदा दाखल होते. जुन्या पद्धतीमध्ये ६० ते ८० च्या दशकातील काही ट्रेंड्स आणि नवीन पिढीप्रमाणे त्यामध्ये सुधारणा केल्या जातात. त्याचप्रमाणे जीन्समध्येही आरामदायी फिल येईल अशा फिट्स पुन्हा आल्या आहेत. मागील दोन महिन्यांत साइड स्ट्रीप जीन्स बाजारात दाखल झाल्या आहेत.

इंडिगो ब्लू आणि ब्लॅकच्या वेगवेगळ्या छटामध्ये येतात. तपशीलवार सांगायचं तर फॅशनच्या विविध प्रकारासह विविध आकारात आणि फिटींगमध्ये आपल्याला या जीन्स मिळू शकतात. सडपातळ फिट सोबत, रुंद पाय असलेले आणि आरामशीर ट्रेंडमध्ये असलेल्या या जीन्स अतिशय वेगळा आणि रेट्रो लुक देतात. या जीन्सला बाजूला १ ते ५ सेंटीमीटरची लहान पट्टी लावलेली असते. काही वेळा बाजूला दोन किंवा तीन पट्टेही दिसतात. कधी हे पट्टे फिकट रंगाचे तर कधी खूप भडक स्वरूपात असतात. या पट्ट्यांमुळे जीन्स ट्रॅकपँटप्रमाणे दिसते आणि एक वेगळाच लूक येतो. काही वेळा या पट्टीची लांबी अनफिनिश्ड स्वरूपात असते. अँकल लेन्थ जीन्स स्लिम आणि फिट्ट असते. वाईड लेगला एक परिपूर्ण रेट्रो स्वरूप देण्यासाठी आरामशीर आणि फिट स्वरूप देण्यात आले आहे. वाईड लेग जीन्सला लेन्थ मध्ये कडेला खाली एक लहान कट देण्यात येतो. मुलींमध्ये ही फॅशन सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

या पट्ट्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून बनविल्या जातात, ज्यामुळे उत्पादन उत्कृष्ट दिसते आणि त्यावर परिपूर्ण रेट्रो अनुभव मिळतो. काही वेळा एक इंडिगो ब्लॉकर बाजूच्या शिवणीवर वापरले जाते, जेणेकरुन त्या बाजूला गडद रंगाचा निळसर रंग ठेवता येतो आणि जीन्स जास्त काळ टिकण्यास मदत होते. स्पोर्टी लूकच्या पट्टे जीन्सच्या बाबतीत, विविध रंगाच्या टेप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जीन्सच्या तपशीलावर आणि डिझाईनच्या आधारावर, पट्ट्याची रुंदी आणि संख्या यातून निवडली जाऊ शकते. साईड-स्ट्रीप जीन्स आपल्या कपाटामध्ये असायला हवी अशी उत्तम फॅशन आहे. या जीन्सचा आधार फॅब्रिक डेनिम असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्याही टॉपसोबत तुम्ही ती घालू शकता.