करोना काळात राज्यातील शाळा आणि कॉलेज पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द करून निकाल जाहीर केले. त्यानंतर यंदाच्या वर्षी १०वी व १२वी मध्ये असलेल्या विद्यार्थी यांना करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई आणि सीआयएससीईने यंदा होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या पद्धतीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मात्र सहा विद्यार्थ्यांच्या गटाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी यावेळी केली गेली आहे. या मागण्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती सी. टी. रवी कुमार यांच्या खंडपीठासमोर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

परीक्षा पद्धत

सीबीएसई, सीआयएससीई या मंडळांनी यंदा त्यांची परीक्षा पद्धत बदलली आहे. नवीन परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरूपात असेल म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरे चिन्हांकित करण्यासाठी ओएमआर शीट दिल्या जातील. गेल्या वर्षी त्यांना संपूर्ण उत्तरं लिहावी लागत होती. प्रॅक्टिकलसाठी सीबीएसईद्वारे पहिल्या टर्मच्या परीक्षेत कोणत्याही बाह्य परीक्षकाची नियुक्ती केली जाणार नाही. प्रॅक्टिकलसाठी शाळा स्वतःची उत्तरपुस्तिका वापरतील. त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत.

परीक्षेची वेळ आणि माहिती

५० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाईल. परीक्षा केवळ MCQ स्वरूपात असेल. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. वाचन वेळ २० मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली असून, परीक्षा सकाळी १०:३० ऐवजी ११:३० पासून सुरू होईल. एकूण गुणांच्या ५० टक्के गुण प्रात्यक्षिक परीक्षा आणि इंटर्नल्सचे असतील. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण २३ डिसेंबरपर्यंत अधिकृत पोर्टलवर अपलोड केले जातील. सीबीएसई प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरीक्षक नियुक्त करेल. दर ५०० विद्यार्थ्यांमागे एक निरीक्षक असेल. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी २ निरीक्षक असतील. सर्व परीक्षा केंद्रांवर शहर समन्वयकदेखील नियुक्त केले जातील. परीक्षा केंद्रांना कस्टमाइज्ड ओएमआर शीट्स ऑनलाइन प्रदान करेल. या ओएमआर शीटची प्रत शाळांना सरावासाठी दिली जाईल. कच्च्या कामासाठी स्वतंत्र शीट दिल्या जातील. ओएमआर शीटवर प्रश्नाच्या बाजूला एक बॉक्सदेखील दिला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना त्यांचं उत्तर लिहावं लागेल.

दोन पद्धतीने बोर्ड परीक्षा घेणार

या वर्षी दोन्ही मंडळं पहिल्या टर्मसाठी आणि दुसऱ्या टर्मसाठी अशा दोन बोर्ड परीक्षा घेणार आहे. त्यापैकी पहिल्या टर्मच्या परीक्षा लवकरच सुरू होत आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांची मुख्य विषयांची परीक्षा ३० नोव्हेंबरपासून तर १२ वीची परीक्षा १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर दुय्यम विषयांची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे या याचिकेवर लवकर निकाल लागणं अपेक्षित असून, सर्वांचं लक्ष त्याकडे लागलं आहे. अॅड. सुमनाथ नुकाला विद्यार्थ्यांची बाजू मांडणार आहेत.