Sleep Deprivation Symptoms: तुम्ही दिवसभर काम करता आणि तुमचे शरीर किती सक्रिय आहे याबाबत विचार करता. तुम्हाला पुरेशी झोप मिळत असते आणि तुमचे शरीर पूर्णपणे फिट असते. पण असं असेलच असं नाही. अनेकदा तुमचं शरीर संकेत देत असतं की त्याला पुरेशी विश्रांती मिळत नाहीये. शरीरात ठराविक लक्षणे दिसून येतात जी पुरेशी झोप न झाल्यामुळे दिसू लागतात. याबाबत डॉ. कुणाल सूद यांनी अधिक माहिती दिली आहे…
चहा आणि कॉफीने दिवसाची सुरूवात
तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला दिवसाची सुरूवात करण्यासाठी किंवा कामं पूर्ण करण्यासाठी वारंवार चहा किंवा कॉफीची गरज भासत असेल तर हे अपुऱ्या झोपेचे लक्षण असू शकते. कॅफीन मेंदूतील अॅडेनोसिन रिसेप्टर्सना तात्पुरते अवरोधित करते. त्यामुळे तुम्हाला कमी झोप येते. तसंच ते चांगल्या झोपेमुळे मिळणाऱ्या शारीरिक विश्रांतीची जागा घेऊ शकत नाही. कालांतराने अपुऱ्या झोपेचे, अतिरिक्त कॅफीन सेवनाचे आणि खराब झोपेचे एक दुष्टचक्र निर्माण होऊ शकते.
गोड, अति कर्बोदके असलेले पदार्थ खाण्याची इच्छा
तज्यांनी सांगितले की, झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात. त्यामुळे भूक वाढते. यामुळे गोड आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. शिवाय मेंदूचा जो भाग आत्म नियंत्रण राखण्यास मदत करतो, तो कमी सक्रिय होतो. त्यामुळे या तीव्र इच्छेचा प्रतिकार करणे कठीण होते.
क्षुल्लक गोष्टींवरून राग येणे
जर आधीपेक्षा लवकर आणि जास्त चिडचिड होत असेल, तर अपुऱ्या झोपेमुळे असे होत असू शकते. डॉ. सूद सांगतात की, पुरेशा झोपेच्या अभावामुळे भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. संशोधनानुसार, यामुळे राग वाढू शकतो. तसंच यामुळे मेंदूच्या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागांमधील समन्वयही कमी होतो.
सतत सुस्त, आळशी वाटणे
जर तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात, गोष्टी लक्षात ठेवण्यात किंवा छोटे-छोटे निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर हे अपुऱ्या झोपेचे लक्षण असू शकते. डॉ. सूद सांगतात की, अपुऱ्या झोपेचा परिणाम लक्ष केंद्रित करण्यावर, स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता, प्रतिक्रिया देण्याचा वेग आणि निर्णयक्षमतेवर होऊ शकतो. एका अभ्यासानुसार, जे लोक सलग दोन आठवडे दररोज रात्री सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोपले, त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर जवळपास तितकाच परिणाम झाला, जितका दोन रात्री अजिबात न झोपलेल्या लोकांवर झाला होता.
वारंवार आजारी पडणे
जर तुम्हाला वारंवार सर्दी किंवा विषाणूजन्य संसर्गाचा त्रास होत असेल तर त्याचे एक कारण अपुऱ्या झोपेचे असू शकते. डॉ. सूद यांनी सांगितले की, शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यात झोपेची महत्त्वाची भूमिका असते. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, जे लोक कमी झोपतात त्यांना सामान्य विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
डॉक्टर काय म्हणतात?
ही सर्व लक्षणे अपुऱ्या झोपेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांची आहेत. जेव्हा यापैकी अनेक लक्षणे एकाच वेळी दिसू लागतात. दिवसभर आळस जाणवणे, त्यामुळे अतिरिक्त कॅफीनचे सेवन करणे. तसंच हार्मोनल बदलांमुळे गोड खाण्याची इच्छा वाढू शकते. चिडचिड आणि आळस हीदेखील अपुऱ्या झोपेची लक्षणे आहेत अशी माहिती जनरल फिजिशियन डॉ. पल्लेटी शिवा कार्तिक रेड्डी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणे केवळ झोपेच्या कमतरतेमुळेच उद्भवत नाहीत. तर अनेकदा ती स्ट्रेस, चिंता, नैराश्य, थायरॉईडच्या समस्या, पौष्टिकतेची कमतरता, अनियंत्रित डायबिटीज किंवा काही विशिष्ट औषधांमुळे देखील होऊ शकतात. वारंवार होणारे संसर्ग हेदेखील याला कारणीभूत असू शकते. त्यामुळे लक्षणांचा कालावधी, त्यांची तीव्रता आणि त्या व्यक्तीच्या इतर आरोग्य स्थितीचा विचार करणेही महत्त्वाचे आहे.
डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले की, झोपेच्या कमतरतेमुळे एकाग्रता, निर्णयक्षमता आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे व्यक्तीला सुस्त वाटू शकते, कामातील रस कमी होऊ शकतो आणि चिडचिडेपणा वाढू शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवरही परिणाम होतो.
