Silent Warning Signs of Mouth Cancer: तोंडाचा कर्करोग हा जीवघेणा आजार असला तरी तो वेळेत ओळखला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण दुर्दैवाने, अनेक लोक सुरुवातीच्या खुणांकडे दुर्लक्ष करतात आणि तेच पुढे जीवावर बेततं. तोंडात वारंवार होणारे फोड, न जाणाऱ्या जखमा किंवा लाल-पांढरे डाग हे अनेकांना किरकोळ त्रास वाटतात. पण डॉक्टर सांगतात, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केलं, तर पुढे त्यामुळे जीवावरही बेतू शकतं. कारण- ते फक्त सामान्य फोड ठरण्याऐवजी ती तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात असू शकते.

तोंडाचा कर्करोग म्हणजे काय?

तोंडाच्या आतल्या भागातील किंवा ओठांवरील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्या, तर त्यातून कर्करोग निर्माण होतो. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, हा आजार बहुधा स्क्वॅमस सेल्समध्ये सुरू होतो म्हणजे ओठांच्या आणि तोंडाच्या आतील थरात असलेल्या बारीक पेशींमध्ये. या पेशींच्या डीएनएमध्ये झालेल्या लहानसहान बदलांमुळे त्यांची अनियंत्रित वाढ होते आणि त्यातून निर्माण होतो तोंडाचाकर्करोग .

तोंडाचा कर्करोग कुठे विकसित होतो?

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या मते, तोंडाचा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, गालांच्या आतील त्वचा या भागांमध्ये विकसित होऊ शकतो. काही वेळा तो लाळग्रंथी, टॉन्सिल किंवा घशाच्या आतील भागातही पसरू शकतो. म्हणजे तुमच्या तोंडापासून घशापर्यंतचा कोणताही भाग या आजाराच्या विळख्यात येऊ शकतो.

ओळखा हे धोकादायक संकेत

  • तोंडात किंवा ओठांवर झालेल्या जखमा ज्या आठवड्यानंतरही बऱ्या होत नाहीत.
  • दात सैल होणे किंवा दात उपटल्यावर जखम बरी न होणं.
  • तोंडात किंवा जिभेत सतत सुन्नपणा जाणवणं.
  • जिभेवर किंवा हिरड्यांवर लाल किंवा पांढरे ठिपके दिसणं.
  • गिळताना किंवा बोलताना वेदना जाणवणं.

डॉक्टरांकडे जाणं का आवश्यक?

अनेकदा लोक ही लक्षणं ‘साधे फोड’ समजून, त्याकडे दुर्लक्ष करतात. पण एनएचएस सांगते की, लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कर्करोगामधून वाचण्याची शक्यता ५०% वरून थेट ९०% पर्यंत वाढते. म्हणून अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तोंडाचा कर्करोग टाळण्यासाठी काय कराल?

  • तंबाखूचा वापर तत्काळ बंद करा, मग तो धूम्रपानाच्या स्वरूपात असो किंवा गुटखा / चघळण्याच्या स्वरूपात असो
  • दारूचे प्रमाण कमी करा
  • अति सूर्यप्रकाशापासून ओठांचं रक्षण करा
  • आणि सर्वांत महत्त्वाचं – नियमितपणे दंत तपासणी करून घ्या.

तोंडातले छोटे छोटे बदलही कधी मोठा इशारा ठरू शकतात. म्हणूनच आरशात दिसणाऱ्या छोट्या जखमेच्या मागे दडलेला धोका ओळखा. वेळीच सावध झालात, तर कर्करोगापासून आयुष्यभरासाठी वाचू शकता.