Seborrheic Dermatitis & HIV : केसांमध्ये कोंडा होणे ही अत्यंत सामान्य समस्या आहे. ऋतुबदल, ताणतणाव, हार्मोनल बदल, त्वचेचा प्रकार किंवा केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे बहुतांश लोकांना कधी ना कधी कोंड्याचा त्रास होतो. त्यामुळे अनेकदा ही समस्या किरकोळ समजून दुर्लक्षित केली जाते. मात्र अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे कोंडा आणि HIV यांच्यातील संबंधावर चर्चा सुरू झाली आहे. खरंच साधी दिसणारी ही समस्या एखाद्या गंभीर आजाराचा प्रारंभिक संकेत असू शकते का, यामागचे वैद्यकीय विज्ञान काय सांगते, हे समजून घेणे गरजेचे आहे.
व्हायरल दावा आणि त्यामागील कथा (Viral Claim & Clinical Experience)
इन्स्टाग्रामवरील एका रीलमध्ये डॉक्टर आणि कंटेंट क्रिएटर डॉ. फहद इम्तियाज यांनी त्यांचा क्लिनिकल अनुभव सांगितला. त्यांच्या मते, “एका रुग्णाच्या त्वचेवर कोणतीही विशेष तक्रार नव्हती, मात्र टाळूवर हलका कोंडा दिसत होता. त्यावर नेहमीप्रमाणे केटोकोनाझोल शॅम्पू देण्यात आला. काही दिवसांनी रुग्ण पुन्हा तपासणीस आला असता त्याचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. पुढील तपासणीत तो HIV पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
डॉ. इम्तियाज यांनी या अवस्थेला सेबोरिक डर्मेटायटिसचे उदाहरण देत, काही प्रकरणांमध्ये हा HIV चा सुरुवातीचा संकेत ठरू शकतो असा दावा केला. तसेच रुग्णाला नाव्ह्याच्या दुकानात वापरलेल्या ब्लेडमुळे HIV संसर्ग झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
तज्ज्ञांचे मत काय सांगते? (Expert Medical Opinion)
या दाव्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने हरियाणातील ‘स्किन अव्हेन्यू क्लिनिक’च्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शिवानी यादव यांच्याशी संवाद साधला. डॉ. यादव स्पष्ट करतात की,”सेबोरिक डर्मेटायटिस किंवा कोंडा ही अत्यंत सामान्य समस्या असून, बहुतांश प्रकरणांत तिचा HIV शी थेट संबंध नसतो. HIV बाधित व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक तीव्र किंवा जास्त प्रमाणात दिसू शकते, मात्र केवळ कोंडा दिसल्याने HIV चा संशय घेणे वैद्यकीयदृष्ट्या योग्य नाही.
HIV-संबंधित सेबोरिक डर्मेटायटिस कसा वेगळा असतो? (HIV-related Seborrheic Dermatitis)
तज्ज्ञांच्या मते, HIV शी संबंधित सेबोरिक डर्मेटायटिस सामान्य कोंड्यापेक्षा अधिक गंभीर असतो. तो फक्त डोक्यापुरता मर्यादित न राहता छाती, पाठ, भुवया, नाकाच्या कडा आणि त्वचेच्या घड्यांपर्यंत पसरू शकतो. अशा कोंड्यावर नेहमीचे उपचार परिणामकारक ठरत नाहीत. दिसायला सामान्य कोंडा आणि HIV-संबंधित त्वचारोग यात फरक ओळखणे केवळ बाह्य लक्षणांवरून जवळजवळ अशक्य असते. याची खात्री फक्त रक्ततपासणीद्वारेच करता येते.
नाव्ह्याच्या दुकानातील ब्लेडमुळे HIV होऊ शकतो का? (HIV Risk at Barber Shop)
नाईच्या दुकानात वापरल्या जाणाऱ्या ब्लेडमुळे HIV होण्याच्या दाव्यावर डॉ. यादव सांगतात की,”हा धोका अत्यंत कमी आहे. HIV विषाणू मानवी शरीराच्या बाहेर फार काळ जिवंत राहत नाही. रेझरमुळे झालेल्या छोट्या कटातून HIV संसर्ग होणे व्यवहार्यदृष्ट्या अतिशय दुर्मिळ मानले जाते. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण हे सर्वसाधारण आरोग्यासाठी महत्त्वाचे असले तरी, नाईच्या दुकानाला HIV संसर्गाचा मोठा धोका म्हणून पाहणे योग्य नाही.
HIV मध्ये दिसू शकणारी इतर त्वचाविषयक लक्षणे (Other Skin Signs of HIV)
HIV च्या सुरुवातीच्या किंवा पुढील टप्प्यात काही विशिष्ट त्वचा आणि श्लेष्मल त्वचेची लक्षणे दिसू शकतात. त्यामध्ये वारंवार तोंडात होणारे बुरशी संसर्ग, सतत होणारा नागीण, असामान्य बुरशीजन्य आजार, न भरणाऱ्या जखमा, संपूर्ण शरीरावर तीव्र खाज किंवा अचानक वाढलेली सोरायसिससारखी लक्षणे आढळू शकतात. मात्र ही लक्षणे स्वतःहून HIV ची खात्री देत नाहीत. इतर धोका घटक किंवा संशयास्पद वर्तनासोबत ही लक्षणे दिसल्यासच HIV चाचणी करणे शहाणपणाचे ठरते.
निष्कर्ष (Conclusion)
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सामान्य कोंडा किंवा सेबोरिक डर्मेटायटिस ही घाबरून जाण्याची बाब नाही. मात्र ही समस्या अतिशय तीव्र स्वरूपाची असेल, दीर्घकाळ टिकत असेल, शरीराच्या इतर भागांपर्यंत पसरत असेल आणि त्यासोबत वजन झपाट्याने कमी होणे, वारंवार संसर्ग होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. HIV ची खात्री केवळ योग्य वैद्यकीय तपासणीतूनच होऊ शकते, सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांवरून नाही.
डिस्क्लेमर: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपचार सुरू करण्यापूर्वी किंवा दिनचर्येत कोणताही बदल करण्यापर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

