Fitness Strategies for Office Workers : कामाच्या दबावामुळे आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते, ज्यामुळे शरीर आणि काम या दोन्ही गोष्टींवर नकळत परिणाम होतो. दीर्घकाळ काम करणे, यशाची बरोबरी दुसऱ्यांबरोर करणे, वेळेत काम पूर्ण न करणे यामुळे आपण खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करून रात्री उशिरापर्यंत काम करत राहतो. मर्यादेपलीकडे काम करण्याची वेळ वाढते आणि मग अनेक आरोग्य समस्या वाढतात.

बॉलिवूडचा ‘न्यू एज ॲक्शन हिरो’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता विद्युत जामवालने जनरल याच समस्येवर म्हणजेच शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सल्ला दिला आहे. सोप्या, टिप्स देताना तो म्हणाला की, तंदुरुस्त राहण्यासाठी जिममध्ये तासंतास घाम गाळण्याची, दीर्घकाळ न जमणारे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा.

विद्युत जमवाल म्हणतो की, काम करणाऱ्या लोकांनी तंदुरुस्त राहण्यासाठी एक सोपे ध्येय निश्चित केले पाहिजे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला एका महिन्यात ५ किलो वजन कमी करायचे असेल, तर तो आपल्या क्षमतेनुसार दररोज चालण्याचे लक्ष्य ठेवू शकतो. मग ते १० किलोमीटर असो किंवा फक्त १ किलोमीटर.

Award Banner

विद्युत जमवाल टाटा प्ले फिटनेसच्या ‘फिट अँड फेमस’ शोमध्ये म्हणाला की, तुमच्या गरजेनुसार वेळापत्रक बनवा, कितीही विघ्न येउदेत त्याचे पालन करा, जर तुम्ही सकाळी १ किलोमीटर चालायचे ठरवले असेल, तर नक्कीच चाला. तुम्ही इतकं केलं तरीही तुम्ही कधीच अनफिट होणार नाही. आता प्रश्न असा आहे की, अभिनेत्याचा हा फिटनेस मंत्र किती प्रभावी आहे, याबद्दल आपण डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून समजून घेऊयात…

ठाण्यातील केआयएमएस हॉस्पिटल्समधील आर्थ्रोस्कोपी सल्लागार डॉक्टर स्वप्निल जांबरे म्हणाले की, फिटनेस दैनंदिन नित्यक्रमावर अवलंबून असतो. दिनचर्या शरीराला हळूहळू आणि कार्यक्षमतेने जुळवून घेण्यास मदत करते. दररोज थोडासा तरी व्यायाम किंवा अगदी हालचाल नियमितपणे केली, तरी सांध्यांची लवचिकता, स्नायूंची ताकद, हृदयाचे आरोग्य, स्टॅमिना सुधारण्यास मदत करू शकतात. त्यामुळे खरा धोका तेव्हा निर्माण होतो, जेव्हा लोक दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्यानंतर अचानक अतिव्यायाम करू लागतात, ज्यामुळे थकवा किंवा दुखापत होऊ शकते.

९ ते ६ च्या जीवनशैलीत फिटनेस अधिक सोपा का असू शकतो?

डॉक्टर झांब्रे यांच्या मते, निश्चित वेळापत्रक असणारी मंडळी नियोजन करून अधिक सहजपणे फिट राहू शकतात. काही किलो वजन कमी करणे किंवा चालण्याची क्षमता वाढवणे यासारखे स्पष्ट, वेळेनुसार मर्यादित ध्येय निश्चित केल्याने लक्ष, जबाबदारी दोन्ही वाढते . तुम्ही १ किमी चालता की, १० किमी, याने फारसा फरक पडत नाही; महत्त्वाचे म्हणजे नियमितपणे त्या गोष्टींवर कसे अवलंबून राहता.

केवळ चालण्याने तुम्ही तंदुरुस्त राहू शकता का?

जर नियमितपणे आणि योग्य पद्धतीने चालल्यास तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. चालणे हा सर्व वयोगटातील लोकांसाठी योग्य असलेला, कमी ताण देणारा, सांध्यांसाठी सुरक्षित व्यायाम आहे. दररोज चालण्याने सांध्यांचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यांचा ताठपणा कमी होतो. कालांतराने, तुम्ही वेग आणि अंतर वाढवू शकता. पण, दररोज चालणे तंदुरुस्तीचा भक्कम पाया आहे.

वेळापत्रक महत्त्वाचे का आहे?

जेव्हा तुम्ही फिटनेसला एक पर्याय न मानता, एक गरज म्हणून बघता तेव्हा नियमितपणे त्यांचे पालन करणे सोपे जाते. त्यामुळे घडतं असं की, सकाळी उठल्यावर चालणे, कामानंतर स्ट्रेचिंग करणे, संध्याकाळी व्यायाम करण्याची सवय लागू शकते. एकदा सवय लागली की, प्रेरणेची गरज कमी भासते आणि शिस्त आपोआप लागते. मोठ्या आणि कठीण ध्येयांपेक्षा लहान, साध्य करण्यायोग्य ध्येये अधिक प्रभावी ठरतात. तुम्ही पाळू न शकणाऱ्या योजनेपेक्षा, दररोज न चुकता १ किलोमीटर चालण्याने अधिक दीर्घकालीन फायदे मिळतात. यामुळे स्नायू सक्रिय राहतात, सांधे लवचिक होतात आणि शरीराची ठेवण सुधारते.

फिटनेसमधील सर्वात मोठी चूक कोणती?

एकदम जास्त आणि खूप लवकर करण्याचा प्रयत्न करणे ही सर्वात मोठी चूक आहे. फिटनेस म्हणजे पहिल्याच दिवशी आपली ताकद दाखवणे नाही, तर दररोज थोडा-थोडा सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या दैनंदिन जीवनशैलीला (लाइफस्टाइलला) जुळेल असा साधा आणि सोपा रूटीन निवडा, जो तुम्ही संपूर्ण वर्षभर सहज पाळू शकता. यामुळे शरीर सक्रिय, लवचिक आणि मजबूत राहण्यासाठी मदत होते.