How to Prevent Earthworms from Entering Your Bathroom: पावसाळा सुरू झाला की, घरात ओलावा वाढतो आणि त्यासोबत काही नकोशा समस्याही डोकं वर काढतात. अनेक घरांमध्ये बाथरूममध्ये अचानक गांडुळे किंवा गोम दिसू लागतात. नालीजवळ, फरशीच्या फटीत किंवा भिंतींच्या कोपऱ्यात ही गांडुळे दिसली की, अनेकांना शिसारी) उडते. वारंवार स्वच्छता करूनही ही समस्या कमी होत नाही. मात्र, त्यासाठी महागड्या कीटकनाशकांची किंवा पेस्ट कंट्रोलची गरज नाही. फक्त ५ रुपयांत मिळणाऱ्या दोन साध्या वस्तूंनी हा त्रास कमी करता येऊ शकतो.
पावसाळ्यात जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा साचतो. त्यामुळे मातीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशा वेळी गांडुळे जमिनीच्या बाहेर येतात आणि ओलसर, थंड जागेचा शोध घेतात. घरातील बाथरूममध्ये कायम ओलावा असल्याने तसेच फरशीतील फटी, भिंतींच्या भेगा आणि नाल्यांमधून त्यांना आत येणे सोपे जाते.
यामुळेच पावसाळ्यात अनेकांच्या बाथरूममध्ये गांडुळे आणि गोम वारंवार दिसू लागतात. पण, यावर एक अतिशय सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या उपायासाठी तुम्हाला फक्त दोन चमचे मीठ, एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं कोमट पाणी लागेल. मीठ आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळा. हे मिश्रण बाथरूममधील फटी, नालीजवळ किंवा ज्या ठिकाणी गांडुळे दिसतात, त्या भागात टाका. त्यानंतर साधारण एक मिनिटाने त्या ठिकाणी थोडे कोमट पाणी ओता.
हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी केल्यास अधिक चांगला परिणाम दिसू शकतो. काही वेळानंतर त्या भागात गांडुळे दिसण्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवू शकते.
या उपायामागचे कारणही तितकेच सोपे आहे. मीठ आणि बेकिंग सोड्यामुळे गांडुळांच्या शरीरातील ओलावा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ती त्या जागेपासून दूर जातात किंवा तिथे टिकू शकत नाहीत. त्यामुळे त्याच ठिकाणी पुन्हा त्यांचे अस्तित्व दिसण्याची शक्यता कमी होऊ शकते.
मात्र, फक्त हा उपाय करून थांबू नका. पावसाळ्यात बाथरूमची नियमित स्वच्छता करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आठवड्यातून किमान दोन वेळा फिनाईल किंवा जंतुनाशक द्रव वापरून बाथरूम स्वच्छ करा. फरशी शक्य तितकी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करा. भिंती किंवा फरशीला भेगा असतील, तर त्या एम-सील किंवा पांढऱ्या सिमेंटने भरून घ्या. तसेच नाल्या नियमित स्वच्छ ठेवल्यास गांडुळे आणि इतर कीटक आत येण्याची शक्यता कमी होते.
पावसाळ्यात बाथरूममध्ये गांडुळे-गोम दिसण्याचा त्रास होत असेल, तर हा कमी खर्चाचा घरगुती उपाय करून पाहू शकता. त्याचबरोबर अस्वच्छता आणि ओलावा नियंत्रणात ठेवला, तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकते.
(टीप : हा घरगुती उपाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार आहे. त्याच्या परिणामकारकतेबाबत सर्व परिस्थितींमध्ये हमी देता येत नाही. गंभीर समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
