Fridge Electricity Saving Tips: उन्हाळा सुरू होताच घरातील वीजबिल झपाट्याने वाढू लागते. एसी, कूलर, पंखे यांसोबतच फ्रिजचा वाढलेला वापर हादेखील वीजबिल वाढण्यामागील एक मोठा कारणीभूत घटक ठरतो. विशेषतः उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण वारंवार फ्रिज उघडतो, थंड पाणी किंवा पदार्थ काढतो आणि नकळत विजेचा अधिक वापर करतो. पण यावर एक असा सोपा आणि आश्चर्यकारक उपाय समोर आला आहे, जो ऐकूनच नव्हे, तर करून पाहिल्यावर तुम्हीही चकित व्हाल!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका गृहिणीने फ्रिजमुळे वाढणाऱ्या वीजबिलावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक भन्नाट जुगाड सांगितला आहे. हा उपाय इतका साधा आहे की, तो प्रत्येक घरात सहज करता येऊ शकतो; पण त्याचा परिणाम मात्र मोठा असल्याचा दावा केला जात आहे.

नेमका हा जुगाड काय आहे?

व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे, अनेक वेळा फ्रिजचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नाही. सुरुवातीला हे लक्षातही येत नाही; पण हळूहळू याचा परिणाम दिसू लागतो. दरवाजा नीट बंद न झाल्यामुळे थंड हवा बाहेर निघून जाते आणि फ्रिजला पुन्हा थंड होण्यासाठी अधिक वीज खर्च करावी लागते. परिणामी, वीजबिल वाढते.

त्यासाठी गृहिणीने एक अतिशय सोपा उपाय सुचवला आहे. टिश्यू पेपर किंवा साधा कागद घ्या आणि फ्रिजच्या दरवाजात अडकवून तो बंद करा. आता तो कागद ओढून पाहा जर तो सहज बाहेर आला, तर याचा अर्थ दरवाजा व्यवस्थित बंद होत नाही आणि तुमचा फ्रिज अधिक वीज वापरत आहे!

समस्या कुठे आहे?

या समस्येचे मुख्य कारण म्हणजे फ्रिजच्या दरवाजाला लावलेले रबर (गॅस्केट). कालांतराने या रबरमध्ये धूळ, मळ व चिकटपणा साचतो. त्यामुळे ते नीट सील होत नाही आणि थंड हवा बाहेर जाण्याचा मार्ग तयार होतो.

उपाय काय?

गृहिणीच्या म्हणण्यानुसार, हा प्रश्न सोडविण्यासाठी फार काही मोठे काम करण्याची गरज नाही.
फक्त कापसाच्या (कॉटन) मदतीने रबर नीट स्वच्छ पुसून घ्या. त्यामुळे रबर पुन्हा घट्ट बसेल आणि दरवाजा व्यवस्थित बंद होईल. पुन्हा कागद ठेवून तपासल्यास तो सहजतेने बाहेर येणार नाही. त्याचा अर्थ तुमचा फ्रिज आता योग्यरीत्या कार्य करू लागला आहे.

खरंच वीजबिल कमी होईल का?

या साध्या उपायामुळे फ्रिजमधील थंड हवा बाहेर जाणे थांबते, ज्यामुळे त्याला वारंवार कॉम्प्रेसर चालवावा लागत नाही. परिणामी, विजेचा वापर कमी होतो आणि वीजबिलातही बचत होऊ शकते.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ पाहिलात का?

हा अनोखा आणि उपयोगी जुगाड ‘Puneri Tadka’ या यूट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी तो पाहून प्रत्यक्षात करून पाहिल्याचे सांगितले आहे. तुम्हीही हा उपाय एकदा करून पाहा कदाचित तुमचेही वीजबिल कमी होईल.

(Disclaimer: वरील माहिती ही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. त्याची शास्त्रीय किंवा अधिकृत पुष्टी झालेली नाही.)