How to Grow Mint: घरच्या घरी ताजा, सुगंधी आणि हिरवागार पुदिना मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे अनेक जण गच्चीवर, बाल्कनीत किंवा अंगणातील कुंडीत पुदिन्याची लागवड करतात. सुरुवातीला रोप चांगलं वाढतंही; पण काही दिवसांनी त्याची वाढ मंदावते. पानं कमी आणि काड्या जास्त दिसू लागतात. त्यामुळे अनेकांचा उत्साह कमी होतो.

अशा वेळी नेमकं काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचदरम्यान सोशल मीडियावर एक घरगुती उपाय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा उपाय इतका सोपा आहे की, तो करण्यासाठी कोणताही मोठा खर्च किंवा विशेष साहित्य लागत नाही. विशेष म्हणजे ही गोष्ट जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते.

या उपायाबाबत अनेक बागकामप्रेमी उत्सुकता व्यक्त करीत आहेत. काहींनी हा उपाय करून पाहिल्याचा दावा केला असून, त्यामुळे पुदिन्याची वाढ चांगली झाल्याचंही सांगितलं जात आहे. अर्थात, प्रत्येक घरातील माती, हवामान आणि रोपाची स्थिती वेगळी असल्यानं परिणामही वेगवेगळे असू शकतात.

मात्र, या एका उपायासोबतच पुदिन्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम पुदिना लावण्यासाठी मध्यम आकाराची कुंडी निवडा. खूप लहान कुंडीत मुळांना वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही.

पुदिन्याला जास्त पाणी घालण्याची चूक अनेक जण करतात. प्रत्यक्षात माती हलकीशी ओलसर राहील इतकंच पाणी पुरेसं असतं. जास्त पाणी दिल्यास मुळं कुजण्याची शक्यता वाढते आणि रोपाची वाढ खुंटू शकते.

त्याशिवाय पुदिन्याच्या रोपाची वेळोवेळी छाटणी करणंही आवश्यक आहे. रोप थोडं वाढल्यानंतर त्याची वरची टोकं कापल्यास नवीन फांद्या फुटण्यास मदत होते. छाटलेले काही देठ पुन्हा मातीमध्ये लावले तरी त्यापासून नवीन रोप तयार होऊ शकते. त्यामुळे कुंडी अधिक दाट दिसू लागते.

पुदिन्याच्या कुंडीला दररोज किमान तीन ते चार तास सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी ठेवणं फायदेशीर ठरतं. तसेच दर २० ते २५ दिवसांनी सेंद्रिय खत दिल्यास रोप अधिक निरोगी राहण्यास मदत होते.

आता जाणून घेऊया त्या व्हायरल उपायाबद्दल…

त्यासाठी मध्यम आकाराचा, न सडलेला आणि कोंब न आलेला बटाटा घ्यावा. त्याचे दोन ते तीन मोठे तुकडे करून, ते कुंडीतील मातीमध्ये हलकेच खोचावेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार, बटाट्यामधील स्टार्च हळूहळू मातीमध्ये मिसळतो आणि त्यामुळे मातीचा कस सुधारण्यास मदत होऊ शकते. परिणामी पुदिन्याची वाढ चांगली होण्यास हातभार लागू शकतो.

तथापि, हा उपाय प्रामुख्याने सोशल मीडियावर लोकप्रिय झालेला घरगुती उपाय आहे. तो करून पाहण्यास हरकत नसली तरी पुदिन्याच्या चांगल्या वाढीसाठी योग्य माती, पुरेसा सूर्यप्रकाश, नियंत्रित पाणी आणि वेळेवर रोपाची छाटणी या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या सर्व दृष्टीने काळजी घेतली, तर तुमची कुंडीही काही दिवसांत हिरव्यागार, सुगंधी पुदिन्याने बहरून जाऊ शकते.