How to Reduce Daily Sugar Intake : साखर पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतल्यावर अनेकांना गोड खाण्याची तीव्र इच्छा जाणवते. पण, साखर फक्त गोड पदार्थांपुरती मर्यादित असते का? तर नाही… आपल्या आहारात शीतपेये, पॅकेज केलेले ज्यूस, बिस्किटे, ब्रेड आणि अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधूनही आढळते. साखरेच्या अतिसेवनाचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही सोपे आणि सुरक्षित बदल करून, तुम्ही तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करू शकता. चला, आपल्या आहारातील साखर कमी करण्याचे काही स्मार्ट आणि प्रभावी मार्ग जाणून घेऊया.

फिझी ड्रिंक्स आणि गोड पेया

शीतपेये, एनर्जी ड्रिंक्स, गोड कॉफी, पॅकेज केलेले ज्यूस, फ्लेवर्ड पेयांमध्ये अनेकदा साखरेचे प्रमाण जास्त असते. त्याऐवजी, तुम्ही साधे पाणी, लिंबू सरबत (साखरेशिवाय), नारळाचे पाणी किंवा साखर नसलेला हर्बल चहा पिऊ शकता.

खाद्यपदार्थांचे लेबल तपासा

साखर फक्त गोड पदार्थांमध्येच आढळत नाही. ती ब्रेड, सॉस आणि अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्येही असते. म्हणून, जेव्हाही तुम्ही काही खरेदी करता, तेव्हा पॅकेजिंगवरील सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज, माल्टोज, कॉर्न सिरप यांसारख्या शब्दांकडे लक्ष द्या. खरेदी करण्यापूर्वी पोषण लेबल वाचल्याने अतिरिक्त साखर टाळण्यास मदत होऊ शकते.

एक फळ खा

जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते, तेव्हा कँडी, चॉकलेट किंवा मिठाईऐवजी फळे खाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही केळी, सफरचंद, पेरू, संत्री, बेरी आणि पपई खाऊ शकता. यामध्ये नैसर्गिक गोडव्यासोबतच फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

साखरेला पर्याय

जर साखरेशिवाय चहा किंवा कॉफी बेचव लागत असेल, तर चव वाढवण्यासाठी तुम्ही दालचिनी, वेलची, जायफळ किंवा नैसर्गिक साखर-मुक्त फ्लेवर्स वापरू शकता. साखरेचे प्रमाण हळूहळू कमी केल्याने चव बदलण्यास मदत होते आणि गोड खाणे नकोसे वाटते.

आरोग्यदायी स्नॅक्स

संध्याकाळी भूक लागल्यावर लोक अनेकदा बिस्किटे किंवा चिप्स खातात. यामध्ये साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले कर्बोदके देखील असू शकतात. त्याऐवजी, भाजलेले चणे, कुरमुरे, सुकामेवा, बिया किंवा संपूर्ण धान्यांपासून बनवलेले पदार्थ अधिक चांगले पर्याय असू शकतात.