Online Gaming Sisters Died: गाझियाबादमधील एका उंच इमारतीच्या सोसायटीत नवव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तीन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १६ वर्षांची एक मुलगी आणि तिच्या १४ व १२ वर्षांच्या दोन सावत्र बहिणींचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून, त्या मुलींना एका ऑनलाइन गेमचे खूप व्यसन असल्याचे आढळले आहे. या घटनेमुळे पोलीस, पालक व मानसिक आरोग्य तज्ज्ञ सर्वच चिंतेत आहेत.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी काय सांगितले?

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, तिन्ही मुली आपल्या वडिलांसोबत राहत होत्या, जे फॉरेक्स ट्रेडर म्हणून काम करीत होते. मोठी मुलगी वडिलांच्या पहिल्या पत्नीची होती, तर दोन लहान मुली दुसऱ्या पत्नीच्या होत्या. घटनेच्या वेळी तिन्ही मुली आपापल्या आईसोबतच होत्या.

एबीपी लाइव्हच्या वृत्तानुसार सहायक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे १२:३० वाजता तिन्ही मुली पूजेच्या खोलीत गेल्या आणि त्यांनी आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांनी खुर्चीचा वापर करून खिडकीतून एकामागोमाग एक उड्या मारल्या. तिघींचा जागीच मृत्यू झाला.

मुली गेमच्या खूप जास्त प्रभावाखाली होत्या

तपासादरम्यान पोलिसांना काही विचित्र संकेतही आढळले. अधिकाऱ्यांच्या मते, मुली एका कोरियन टास्क-आधारित ऑनलाइन गेमच्या खूप प्रभावाखाली होत्या. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्या स्वतःला भारतीय न समजता कोरियनच समजू लागल्या होत्या आणि गेमच्या प्रभावामुळे त्या स्वतःला ‘कोरियन प्रिन्सेस’ म्हणून दाखवत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनी रात्री उशिरा मोबाईलवर गेम खेळण्यास मनाई केली होती. त्यामुळे रागावून तिन्ही बहिणींनी हे भयानक पाऊल उचलले.

तज्ज्ञ काय सांगतात?

या प्रकरणाबाबत एबीपी न्यूजने वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा केली. मंडलीय रुग्णालयातील वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राकेश पासवान यांनी सांगितले की, ऑनलाइन गेमिंग आणि मोबाईलचे व्यसन खूप धोकादायक स्तरावर जात आहे.

त्यांनी माहिती दिली की, २०१८ साली मंडलीय रुग्णालयात ऑनलाइन आणि मोबाईल व्यसनावर एक विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे आतापर्यंत अनेक मुलांना आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलण्यापासून वाचवणे शक्य झाले.

पैशांपेक्षा विकृत आनंदाचा विचार

दरम्यान, सायबर तज्ज्ञ साक्षर दुग्गल यांनी सांगितले की, असे काही गेम्स मुलांना आत्महत्येसारख्या कृती करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने तयार केले जातात. असे गेम तयार करणारे लोक पैशांपेक्षा विकृत आनंद मिळवण्याचा विचार करतात आणि त्यांची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची असते.

त्यांनी आठवण करून दिली की, ब्ल्यू व्हेल गेम समोर आल्यानंतर जगभरात मोठा गदारोळ झाला होता आणि अनेक सरकारांनी त्यावर बंदी घातली होती. मात्र, आजकाल इंटरनेटवर एखाद्या गोष्टीवर बंदी घातली, तर ती उद्या वेगळ्या नावाने पुन्हा समोर येते. आजही टेलिग्राम आणि अनेक वेबसाईट्स असे बेकायदा आणि धोकादायक गेम्स डाऊनलोड करण्याचे माध्यम बनत आहेत.

गेमच्या विळख्यातून बाहेर पडणे कठीण होते

सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल यांनी सांगितले की, ऑनलाइन गेम्स अशा पद्धतीने तयार केले जातात की, वापरकर्ता हळूहळू त्याच्या व्यसनात अडकत जातो. या प्रकरणामध्ये फक्त मुलांनाच जबाबदार न धरता, त्यांच्यासह गेम तयार करणाऱ्या कंपन्या, सरकार आणि पालक अशा चौघांनाही जबाबदार धरले पाहिजे, नाही तर असे प्रकार सतत वाढत राहतील.

अनेक ऑनलाइन गेम्स वर्तनशास्त्र लक्षात घेऊन बनवले जातात, जेणेकरून वापरकर्ता पुन्हा पुन्हा गेमकडे परत येईल. त्या गेमची रचनाच अशी केलेली असते की, ते हळूहळू माणसाच्या मेंदूवर परिणाम करू लागतात आणि नंतर त्यातून बाहेर पडणे कठीण होते.