Sitting For Long Hours Heart Risk : आजकाल आपली जीवनशैली अशी झाली आहे की, दिवसाचा बहुतांश वेळ ऑफिसच्या खुर्चीवरच बसून काम करण्यात जातो. ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करणे, सतत व्हिडिओ कॉल्स घेणे, कारने प्रवास करणे आणि रात्री उशिरापर्यंत फोन वापरणे हा आता आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनला आहे. अनेक लोक तर दिवसातील ८ ते १० तास फक्त एकाच जागी बसून राहतात.
याविषयी चेन्नई येथील कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट (हृदयरोग तज्ज्ञ) डॉ. संजीव व्ही.के यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली की, सतत बसून राहण्याचा परिणाम फक्त तुमच्या पाठीवर किंवा मानेवरच नाही, तर थेट तुमच्या हृदयावरही (Heart) होऊ शकतो.
दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने हृदयावर काय परिणाम होतो?
आपण जेव्हा जास्त वेळ बसून राहतो, तेव्हा आपल्या स्नायूंची (Muscles) हालचाल होत नाही. त्यामुळे शरीर रक्तातील साखर (Blood Sugar) आणि चरबी (Fat) योग्य रीतीने वापरू शकत नाही. परिणामी, हळूहळू रक्तातील शुगर्स आणि ट्रायग्लिसराईड्स (Triglycerides) वाढू लागतात, तर शरीरासाठी चांगले असलेले गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) कमी होऊ लागते. याचा थेट आणि वाईट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.
रक्ताभिसरण (Blood Flow) मंदावू शकते
सतत बसून राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया संथ किंवा मंद होऊ शकते. विशेषतः पायांमध्ये दीर्घकाळ रक्त साचून राहिल्यामुळे रक्ताच्या गाठी (Blood Clots) तयार होण्याचा धोका वाढतो. डॉ. संजीव सांगतात की, आजकाल कमी वयाच्या लोकांमध्येही उच्च रक्तदाब (High BP), वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि सतत थकवा जाणवणे अशा समस्या दिसून येत आहेत. ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्येही सतत बसून राहण्याची ही गंभीर समस्या सामान्य झाली आहे.
तुमचे कामही बसून करण्याचे असेल, तर नक्की काय करावे?
१. दर ३० मिनिटांनी उठून उभे राहा: सतत खुर्चीवर बसून राहण्याऐवजी दर ३० मिनिटांनी किमान ३० सेकंदांसाठी उभे राहा. फोनवर बोलताना बसून राहण्याऐवजी उभे राहून किंवा थोडे चालत बोला.
२. जेवण झाल्यावर ५-१० मिनिटे चाला: दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चालण्याची (Walk) सवय लावा. यासाठी जिमला जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरच्या घरी किंवा ऑफिसच्या परिसरातच काही मिनिटे चालू शकता.
३. आवडत्या शारीरिक हालचालींसाठी आठवड्यातून १५० मिनिटे द्या: आठवड्यातून किमान १५० मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग किंवा इतर कोणताही व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आठवड्यातून ५ दिवस रोज ३० मिनिटे व्यायाम करू शकता.
४. डेस्कवर बसून खाणे टाळा: दर थोड्या वेळाने चहा, कॉफी किंवा पॅकेज्ड स्नॅक्स खाण्याऐवजी सोबत पाण्याची बाटली ठेवा. भूक लागल्यास ड्रायफ्रूट्स (नट्स) किंवा इतर पौष्टिक पदार्थ खा.
५. वर्षातून एकदा तरी हेल्थ चेकअप करा: तुमचे बीपी (BP), ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियमित तपासून घ्या. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ईसीजी (ECG) सारखी चाचणीही करून घ्या.
