आजच्या वेगवान जीवनात, एकाच जागी तासन तास बसून राहणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. कार्यालयात संगणकासमोर बराच वेळ बसणे, घरून काम करणे, टीव्ही पाहणे किंवा मोबाईल फोनवर वेळ घालवणे या बाबी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनल्या आहेत. असे मानले जात होते की, दीर्घकाळ बसून राहिल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. आता, एका नवीन अभ्यासात असेही समोर आले आहे की, न उठता सलग ३० मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ बसून राहिल्याने कर्करोगामुळे मृत्यूचा धोकाही वाढू शकतो.
१२ वर्षांपासून आरोग्याचा मागोवा
ग्लासगो विद्यापीठातील संशोधकांनी केलेला आणि ‘पीएलओएस मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेला हा अभ्यास, यूके बायोबँकमध्ये नोंदणी केलेल्या ९१,००० हून अधिक व्यक्तींच्या माहितीचे विश्लेषण करतो. विशेष म्हणजे सहभागींना केवळ प्रश्नच विचारले गेले नाहीत, तर त्यांना आठवडाभर मनगटावर वापरण्यासाठी ट्रॅकरही देण्यात आले, जे त्यांच्या प्रत्यक्ष शारीरिक हालचाली आणि निष्क्रिय वेळेची नोंद करीत होते. त्यानंतर सुमारे १२ वर्षे त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यात आली.
कोणाला कर्करोगाचा धोका जास्त?
संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक दिवसभरात वारंवार ३० मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ बसून राहतात, त्यांना कर्करोगामुळे मृत्यूचा धोका जास्त असतो. संशोधकांच्या मते, जास्त वेळ बसून राहण्याच्या प्रत्येक अतिरिक्त तासागणिक हा धोका अंदाजे ९ ते १० टक्क्यांनी वाढतो. विशेष म्हणजे दिवसभरात बसून घालवलेल्या एकूण तासांपेक्षा, न उठता बसून घालवलेल्या तासांची संख्या अधिक परिणामकारक ठरली.
आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो?
तथापि, या संशोधनातून काहीशी चांगली बातमीही समोर आली आहे. दीर्घकाळ बसून राहण्याऐवजी अधूनमधून हलका व्यायाम केल्याने धोका कमी होऊ शकतो. अभ्यासानुसार, एक तास सतत बसून राहण्याऐवजी थोडा वेळ चालणे, घरातील छोटी छोटी कामे करणे किंवा नुसतेच इकडे-तिकडे फिरणे यांसारखा हलका शारीरिक व्यायाम केल्यास कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका सुमारे १२ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्याचबरोबर सुमारे ३० मिनिटे वेगाने चालण्यासारख्या मध्यम स्वरूपाच्या व्यायामाने हा धोका सुमारे आठ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. इतकेच नव्हे, तर केवळ पाच मिनिटांच्या जोरदार व्यायामानेही कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका २२ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
सवयीही बदलण्याची गरज
हा अभ्यास ग्लासगो विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ व्याख्याते डॉ. फ्रेडरिक हो यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. त्यांच्या मते, लोकांनी केवळ नियमित व्यायामावरच नव्हे, तर दीर्घकाळ बसून राहण्याच्या सवयीत बदल करण्यावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ते म्हणतात की, जरी कोणी दर अर्ध्या तासाने व्यायामशाळेत (जिममध्ये) जाऊ शकत नसले तरी दर अर्ध्या तासाने काही मिनिटांसाठी उठून चालणे किंवा हलका व्यायाम करणेही फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने स्नायूंची क्रियाशीलता कमी होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते, इन्सुलिन प्रतिरोध वाढू शकतो आणि शरीरातील दाह (सूज) वेगाने वाढू शकतो. तथापि, संशोधकांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, हा अभ्यास केवळ एक सहसंबंध दर्शवतो आणि दीर्घकाळ बसून राहण्यामुळे थेट कर्करोगामुळे मृत्यू होतात हे सिद्ध करीत नाही.
